Tue, Jul 23, 2019 04:44होमपेज › Kolhapur › वर्षांनुवर्षे सडताहेत ओढून आणलेली वाहने

वर्षांनुवर्षे सडताहेत ओढून आणलेली वाहने

Published On: Dec 06 2017 2:02AM | Last Updated: Dec 05 2017 11:33PM

बुकमार्क करा

कुडित्रे: प्रतिनिधी 

जिल्ह्यातील सहकारी बँकांनी नजरगहाण म्हणून दिलेल्या वाहन तारण कर्जाचे हप्ते थकल्यामुळे बँकांनी कर्जदारांकडून ओढून आणलेली वाहने बँकांच्या दारात सडत पडलेली आहेत. यामध्ये कर्जदार, बँका याचबरोबर देशाच्या मालमत्तेचेही नुकसान होत आहे. या कार्यपद्धतीत सुधारणा करून अशा वाहनांची निर्गत त्वरित लावण्याची मागणी होत आहे. जिल्ह्यातील सहकारी बँका या चांगले कर्जदार शोधून टेम्पो, ट्रॅक्टर, टेम्पो ट्रॅव्हलर, रिक्षा यांसारखी वाहन तारणे कर्जे देत असतात. त्याला जामीन रितसर घेतलेला असतो. पहिले काही वर्षे या कर्जाची हप्ते रितसर भरले जातात; पण पुढे व्यवसाय कमी झाल्यामुळे किंवा वाहन धारकाने व्यवसायाकडे दुर्लक्ष केल्यामुळे हे कर्ज फिटत नाही.

व्याज आणि मुद्दल यांचा बोजा इतका वाढतो की त्या अ‍ॅसेटच्या किंमतीपेक्षा दीडपट, दुप्पट कर्ज होते. या परिस्थितीत तो कर्जदार बँकेकडे फिरकतही नाही. त्यामुळे कायदेशीर नोटीस, सूचना, पत्रे पाठवूनही अगोदरच मेटाकुटीला आलेला तो कर्जदार बँकेला दाद देत नाही. त्यामुळे अखेरचा उपाय म्हणून बँक संबंधित कर्जदाराचे वाहन ओढून आणते. पुढे ते वाहन ठेवायचे कुठे हा बँकांपुढे प्रश्‍न निर्माण होतो. मुळात बँकेच्या कार्यालयासाठी जागा मिळत नाही. मग अशा ओढून आणलेल्या वाहन ठेवायला जागा कोठून आणणार. हे ओढून आणलेले वाहन विक्री करून त्यातून कर्ज वसुली करणे हा बँकेपुढे मार्ग असतो. त्याला पण कालावधी जातो. दरम्यान, तो वाहनधारक आपल्या ओढून आणलेल्या वाहनाची विक्री करण्यास न्यायालयातून मनाई आणतो. त्यामुळे ही बाब न्यायप्रविष्ठ झाल्यामुळे अनेक वर्षे ते वाहन बँकेच्या दारातच गंजत पडते.

वाहनांची देखभाल हाच व्यवसाय! नजरगहाण दिलेली कर्जे थकल्यामुळे ओढून आणलेली वाहने ठेवायची कुठे हा गंभीर प्रश्‍न बँकांपुढे असतो. ग्रामीण भागात बँकांना कुठेतरी जागा मिळू शकते किंवा अशी वाहने रस्त्याच्या कडेला लावली जातात. ती रहदारीला तर अडथळा करतातच पण चक्क सडून जातात. शहरांमध्ये बँकांच्यापुढे अशी वाहने लावण्याचा गंभीर प्रश्‍न निर्माण होतो. यावर उपाय म्हणून शहरात काही व्यावसायिकांनी अशी ओढून आणलेली वाहने भाडे तत्त्वावर जोपासण्याचा व्यवसायच सुरू केला आहे.