Sat, Aug 24, 2019 21:12होमपेज › Kolhapur › ‘वॉर’फुटवर होणार विमानतळाचा विकास

‘वॉर’फुटवर होणार विमानतळाचा विकास

Published On: May 19 2018 1:32AM | Last Updated: May 19 2018 12:47AMकोल्हापूर : अनिल देशमुख

कोल्हापूर विमानतळाचा विकास ‘वॉर’फुटवर होणार आहे. यासह जिल्ह्यातील महामार्गासाठी करण्यात येणार्‍या भूसंपादनालाही गती येणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील रखडलेल्या प्रकल्पासाठी ‘वॉर’ रूम स्थापन केली आहे. त्यामध्ये जिल्ह्याच्या या दोन प्रकल्पांचा समावेश करण्यात आला आहे.

राज्यात विविध प्रकल्पांची कामे सुरू आहेत. मात्र, अनेक प्रकल्पांचा योग्य पद्धतीने पाठपुरावा होत नाही. यामुळे  वेळेत पूर्ण होणारे अनेक प्रकल्प रखडत चालले आहेत. परिणामी विकासावर त्याचा परिणाम होत आहे. योग्य नियोजनाअभावी प्रकल्प पूर्णत्वाकडे जात नसल्याने, त्याचा जनतेलाही फायदा होत नसल्याचे अनेक ठिकाणी चित्र आहे.

या सर्व पार्श्‍वभूमीवर रखडलेल्या महत्त्वाच्या प्रकल्पावर मुख्यमंत्र्यांनीच लक्ष केंद्रित केले आहे. याकरिता अधिकार्‍यांचे पथक तयार करण्यात आले असून, त्याद्वारे रखडलेल्या प्रकल्पांना गती देण्यात येणार आहे. हे अधिकारी या प्रकल्पासाठी आवश्यक विविध परवानग्या, ना-हरकत, संपादन, निधी आदी विविध टप्प्यावर संबंधित विभागात पाठपुरावा करणार आहेत. याद्वारे हे प्रकल्प निर्धारित वेळेत मार्गी लावण्यासाठी या पथकाचे प्रयत्न राहणार आहेत. 

या ‘वॉर’ रूमसाठी जिल्ह्यातील महत्त्वाचे आणि वर्षभरात पूर्ण होणार्‍या प्रकल्पाची माहिती जिल्हा प्रशासनाकडे मागवण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा प्रशासनाने कोल्हापूर विमानतळ विकास आणि जिल्ह्यातील महामार्गासाठी जमीन संपादन या दोन प्रकल्पांची माहिती या ‘वॉर’रूमला सादर केली आहे.  या प्रकल्पांची सद्यस्थिती, त्यातील अडचणी, प्रकल्प प्रत्यक्ष मार्गी लागावा यासाठी कराव्या लागणार्‍या उपाययोजना याबाबत चर्चा होईल, त्यानंतर या प्रकल्पांच्या पूर्ततेसाठी आवश्यक बाबींसाठी पाठपुरावा सुरू केला जाणार आहे.