Sat, Jun 06, 2020 09:54होमपेज › Kolhapur › प्राधिकरणाने जनतेचा विनाश

प्राधिकरणाने जनतेचा विनाश

Published On: Sep 04 2018 1:17AM | Last Updated: Sep 04 2018 12:59AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर विकास प्राधिकरणामुळे त्यामध्ये समाविष्ट असलेल्या 42 गावांमधील जनतेचा सर्वनाश अटळ आहे, अशा तीव्र भावना प्राधिकरणविरोधी कृती समितीतील संतप्‍त सदस्यांनी आजच्या बैठकीत व्यक्‍त केल्या. यावेळी राजेंद्र सूर्यवंशी यांनी, प्राधिकरण समिती सदस्यपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. 

प्राधिकरणाला विरोध असलेल्या गावांचे ठराव पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना पुढील आठवड्यात देण्याचा निर्णयही आजच्या बैठकीत घेण्यात आला.

कोल्हापूर विकास प्राधिकरणविरोधी कृती समितीच्या वतीने आंदोलनाची पुढील दिशा ठरविण्यासाठी सोमवारी करवीर पंचायत समितीच्या राजर्षी शाहू सभागृहात बैठक आयोजित केली होती. अध्यक्षस्थानी प्राधिकरणविरोधी समितीचे निमंत्रक व करवीरचे सभापती राजेंद्र सूर्यवंशी होते.

वडणगेचे सरपंच सचिन चौगुले  म्हणाले, गेल्या दोन महिन्यांपासून प्राधिकरणाविरोधात आंदोलन सुरू आहे. तरीही शासनाने त्याची अद्याप गांभीर्याने दखल घेतली नाही. त्यामुळे आंदोलन तीव्र करणे आवश्यक आहे. आजपर्यंत प्राधिकरण पडीक जमिनीवर स्थापन करण्यात आले आहे. कोल्हापूर प्राधिकरणात मात्र शेतजमिनीचा समावेश अधिक असल्याने शेतकर्‍यांना भूमिहीन करणारे हे प्राधिकरण आहे. याच्याविरोधात शेतकर्‍यांनी आपली ताकद दाखवावी.

निगवेचे सरपंच दिनकर आडसूळ यांनी आक्रमक भाषेत काही प्रक्षोभक विधाने केली. ते म्हणाले, या भागातील शेतकर्‍यांच्या चांगल्या पिकाऊ शेतजमिनी प्राधिकरणाकडे हस्तांतरित होऊन अनेक शेतकरी भूमिहीन होण्याचा धोका आहे. 42 गावांमधील नागरिकांनी या प्राधिकरणाला जोरदार विरोध केला पाहिजे. 

नेर्लीचे सरपंच प्रकाश पाटील म्हणाले, संपूर्ण राज्याचा आणि औरंगाबाद, नागपूर आदी शहरांचा विचार करता प्राधिकरण ही अपयशी झालेली योजना आहे. त्यामुळे प्राधिकरण झाल्यास 42 गावांचा विनाश अटळ आहे.

वाशीचे संदीप पाटील म्हणाले, प्राधिकरणासाठी आयआरबीला दिलेल्या जागेवर त्यांनी बांधलेली इमारत कार्यालयासाठी घेण्याच्या हालचाली सुरू आहेत. त्यासाठी जिल्हा परिषदेकडील वीस कर्मचारी नियुक्‍त करण्यात येणार आहेत. याला विरोध केला पाहिजे. यासंदर्भात न्यायालयीन लढाईचादेखील विचार करावा.

निवृत्त नगररचनाकार कुलकर्णी यांनी, प्राधिकरण राहू दे; पण नगररचना योजना राबविण्याबाबत आपण विचार करावा, असे मत मांडले. त्यांच्या या भूमिकेला सर्वच सदस्यांनी आक्षेप घेतल्याने बैठकीत काही काळ गोंधळ निर्माण झाला. नागदेववाडीचे माजी सरपंच शरद निगडे यांनी, आंदोलनाची व्याप्‍ती वाढविण्यासाठी 42 गावांंमध्ये जनजागृती मोहीम राबविण्याची सूचना केली. कळंब्याचे प्रताप साळोखे म्हणाले, ग्रामीण भागात नोकरी करणार्‍यांची संख्या फार कमी आहे. दुसरीकडे शेतकर्‍यांच्या मालाला भाव सरकार देत नसल्याने शेतकरी कशीबशी सध्या ग्रामपंचायतीची पाणीपट्टी, घरपट्टी भरतो. प्राधिकरणामध्ये गावे गेल्यास शेतकर्‍यांचे जगणे अवघड होणार आहे. त्यामुळे शासनाला जर या भागाचा मनापासून विकासच करायचा असेल, तर तो स्वखर्चाने करावा. बी. जी. मांगले म्हणाले, प्राधिकरणाचा धोका गावकर्‍यांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रथम गावांमध्ये जागृती निर्माण करण्यासाठी 42 गावांचा संपर्क दौरा निश्‍चित करावा. उत्तम पाटील यांनी, कोणाच्या हद्दीतून किती मीटरचा रस्ता जातो, आरक्षण कशाचे आहे याची माहिती असणारे नकाशे 42 गावांमध्ये लावण्याची सूचना केली. कोणत्याही परिस्थितीत प्राधिकरण हाणून पाडण्याचा निर्धार या बैठकीत व्यक्‍त करण्यात आला.

सभापती राजेंद्र सूर्यवंशी यांनी, पुढील आठवड्यात पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांना भेटून 42 गावांतील प्राधिकरणाला विरोध करणारे ठराव देण्यात येतील. सर्व ग्रामपंचायतींनी आपले ठराव पंचायत समिती कार्यालयात जमा करावेत. प्राधिकरणाच्या नावाखाली ग्रामीण भागातील जनतेला जीवनातून उठविण्याचा डाव आहे. अशा प्राधिकरण समितीच्या सदस्यपदाचा मी राजीनामा देत आहे.

बैठकीस शशिकांत खवरे, कृष्णात धोत्रे, सर्जेराव पाटील, बबन पाटील, राजाराम पाटील, विश्‍वास कांबळे, अमर मोरे, विठ्ठल खोत, प्रल्हाद जाधव, शरद निगडे, बाजीराव ढेरे, सतीश दिंडे, अमर पाटील आदी उपस्थित होते.