होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात डेंग्यूचा फैलाव; चिकुनगुनियाचेही संकट

कोल्हापुरात डेंग्यूचा फैलाव; चिकुनगुनियाचेही संकट

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : राजेंद्र जोशी

जिल्ह्यामध्ये डेंग्यूचा फैलाव झाला आहे. राजर्षी छ. शाहू महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या प्रयोगशाळेत तपासलेल्या 80 रुग्णांच्या रक्त नमुन्यांपैकी 30 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले असून, जिल्ह्यात चिकुनगुनियाबाधित रुग्णांची संख्याही वाढत असल्याचे चित्र पुढे आले आहे. वैद्यकीय परिभाषेत ही स्थिती अत्यंत गंभीर समजली जाते. कोणतेही दुर्लक्ष जिल्ह्यात मोठी चिंताजनक परिस्थिती निर्माण करू शकते, असा इशारा वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञांनी दिला आहे.

कोल्हापूर शहरात डेंग्यूने चार बळी गेले आहेत. एप्रिलपासून 9 महिन्यांत शहरात 190 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट होत असले, तरी शहरातील खासगी रुग्णालयांमध्ये डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या मोठी आहे. यामुळे डेंग्यूबाधित रुग्णांची संख्या यापेक्षा अधिक असल्याची शक्यता वर्तविली जाते. केंद्र शासनाने डेंग्यू हा सूचित करता येण्याजोगा रोग (नोटिफाएबल डिसीज) असल्याचे राजपत्रातच प्रसिद्ध केल्याने खासगी रुग्णालयांनीही दाखल झालेल्या रुग्णांची माहिती शासकीय यंत्रणेला कळवणे बंधनकारक आहे. ही माहिती योग्यवेळी पोहोचल्यास या साथीवर नियंत्रण आणणे शक्य असल्याचे सहा. संचालक (हिवताप) डॉ. महेश खलिपे यांनी सांगितले. नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यात जवाहरनगर, मंगळवार पेठ, सुभाषनगर, जुना बुधवार पेठ, शेंडापार्क, विडी कामगार वसाहत, शिवाजी पेठ, कणेरकरनगर, यादवनगर व सायबर चौक या 10 ठिकाणी डेंग्यूचा उद्रेक झाल्याचे शासकीय यंत्रणेने जाहीर केले होते. मंगळवारी शासकीय अहवालात यामध्ये शुक्रवार पेठ, महाडिक माळ या परिसरातही उद्रेक झाल्याचे स्पष्ट झाले. कसबा बावड्यामध्ये चिकुनगुनियाचे 2 रुग्ण सापडल्याने तेथेही उद्रेक जाहीर केला आहे.

प्रसारमाध्यमांतून मनपा प्रशासन जाहिरातबाजी करणेे आणि काही मोटारसायकलस्वारांमार्फत शहरात धूर फवारणी करणे या उपाययोजनांपलीकडे गेलेले नाही. या रोगाचा उद्रेक हा बीजगणितीय पद्धतीने रुग्णसंख्येत वाढ करू शकतो. याची दखल घेऊन नागरिकांनी घराभोवती असलेले स्वच्छ पाण्याचे साठे नष्ट करण्याची मोहीम हाती घेण्याची गरज आहे. 

शहरात  वर्षभरात शासकीय रुग्णालयांमार्फत 484 रुग्णांच्या रक्त नमुन्यांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी 110 रुग्णांना डेंग्यूची लागण झाल्याचे स्पष्ट झाले, तर शहरातील रुग्णांची संख्या 
190 असल्याचे शासकीय अहवाल सांगतो आहे. याचा अर्थ खासगी रुग्णालयांत डेंग्यूची बाधा झालेल्या रुग्णांची संख्या केवळ 80 असल्याचे अनुमान निघत असले, तरी प्रत्यक्षात ही संख्या कितीतरी पटीने अधिक असल्याचे वरिष्ठ वैद्यकीय अधिकार्‍यांचे मत आहे. महापालिका वगळता जिल्ह्यामध्ये आजपर्यंत 165 रुग्णांना डेंग्यूची बाधा झाली आहे. प्रामुख्याने जुलैपासून ही संख्या वेगाने वाढत असून, त्यावरील उपाययोजनांकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसत आहे.