होमपेज › Kolhapur › कर्जमाफीचे लेखापरीक्षण रखडले

कर्जमाफीचे लेखापरीक्षण रखडले

Published On: Sep 13 2018 1:44AM | Last Updated: Sep 13 2018 1:25AM कोल्हापूर ः निवास चौगले

शासनाच्या कर्जमाफी योजनेतील लाभार्थ्यांच्या खात्याचे लेखापरीक्षण रखडणार आहे. यासंदर्भात आदेश देणारे अधिकारी निवृत्त झाले, तर नव्या अधिकार्‍यांनी याचा पाठपुरावाच केलेला नाही. या लेखापरीक्षणासाठी सुमारे 100 अधिकार्‍यांना तीन दिवसांचे प्रशिक्षण दिले होते; पण पुढे काहीही झाले नाही. 

राज्य शासनाने गेल्यावर्षी छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेखाली कर्जमाफी जाहीर केली. योजना जाहीर झाल्यापासूनच ती या ना त्या कारणाने वादग्रस्त ठरत गेली. सुरुवातीला त्यातील निकषांवर टीका झाली. त्यानंतर व्यक्‍ती की कुटुंब घटक यावर वाद झाला. योजना जाहीर झाल्यापासून जवळपास 11 अध्यादेश काढून त्यात वेळोवेळी बदल करण्यात आला. 

ऑनलाईन माहिती, त्यात सातत्याने बदल, चुकीची दुरुस्ती आदी कारणांनी या योजनेचे काम करणारे अधिकारीही वैतागले होते. अशातच या लाभ मिळालेल्या खात्यांचे लेखापरीक्षण करण्याची टूम सहकार विभागाच्या तत्कालीन प्रधान सचिवांनी काढली. 

या लेखापरीक्षणात संबंधित खातेदाराने कधी कर्ज घेतले, त्याचे पुनर्गठन झाले आहे का, कर्ज घेताना काही बनवेगिरी केली का, याची माहिती घेण्यात येणार होती. यावरूनही विरोधकांनी सरकारला धारेवर धरले. हा शेतकर्‍यांवर दाखवलेला अविश्‍वास असल्याची टीका झाली; पण तरीही जिल्हा पातळीवरील अधिकार्‍यांना हे लेखापरीक्षण करण्यासाठी अधिकार्‍यांची नियुक्‍ती करण्याचे आदेश दिले. त्याप्रमाणे सुमारे 100 हून अधिकारी, सनदी लेखापरीक्षकांना याचे तीन दिवसांचे प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण देऊनही आता सहा महिने होत आले, तरी प्रत्यक्षात लेखापरीक्षण सुरूच झालेले नाही. तोपर्यंत नव्या अधिकार्‍यांनी या योजनेच्या उर्वरित पूर्ततेसाठी नवे सॉफ्टवेअर आणले आहे. त्याचे प्रशिक्षण सध्या जिल्हा पातळीवर दिले जात आहे. त्यामुळे खात्यांचे लेखापरीक्षण आता होणार नाही, हे जवळपास स्पष्ट आहे.