Mon, Mar 25, 2019 13:13होमपेज › Kolhapur › प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, दडपलेल्या गुन्ह्यांसह काहीही...

प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, दडपलेल्या गुन्ह्यांसह काहीही...

Published On: Jun 14 2018 1:33AM | Last Updated: Jun 13 2018 11:40PMकोल्हापूर : प्रतिनिधी 

गिरगाव, मोरेवाडीसह कात्यायणी, शेंडा पार्क शहराच्या दक्षिणेकडे विस्तारणारा परिसर, अलीकडच्या काळात दाट नागरी वस्त्यांचा घटक बनतो आहे. टोलेजंग इमारतीमुळे परिसराचं काहीसं रूपडं बदलत असलं तरी उपनगरालगतची निर्जन ठिकाणे, माळरानासह झाडा- झुडपांनी वेढलेला डोंगराळ भाग धोकादायक बनू लागला आहे. प्रेमीयुगुलांचे चाळे, ओपन बार, लूटमारीसह गंभीर गुन्ह्यांतील पुरावे दडपण्यासाठी निर्जन ठिकाणांचा वापर होऊ लागला आहे. किंबहुना निर्जन परिसर समाजकंटकांच्या हालचालींची केंद्रे बनू लागली आहेत.

उजळाईवाडी विमानतळालगत खणीसह मोरेवाडी येथील चित्रनगरीच्या पिछाडीस माळरानावर विहिरीत दोन मृतदेह आढळून आले. दोन वर्षांपूर्वी पुण्यातील नामचिन गुन्हेगार लहू ढेकणेने उचगावातील एका निष्पापाचा मुंडके तोडून अमानुष खून केला. विद्यापीठ परिसरासह शेंडापार्क, गिरगाव मार्गावर भामट्या पोलिसाने तीसवर वाहनधारकांना शस्त्रांचा धाकावर लुटले. प्रेमीयुगुलांचा अड्डा बनलेल्या परिसरातील अनेक निर्जन ठिकाणावर लुटारू टोळ्यांचा तळ पडलेला दिसून येतो.

मोरेवाडीतील स्मशानभूमी, चित्रनगरीची पूर्व बाजू, शेंडापार्क, कात्यायनी परिसरातील निर्जन ठिकाणी सकाळपासून सायंकाळपर्यंत प्रेमीयुगुलांचा तळ पडलेला असतो. झाडा-झुडपांच्या आडोशाला इष्कात बुडालेल्या युगुलांना मारहाण करून त्यांना लुटण्याचे प्रकार वाढले आहेत. किंबहुना तरुणींच्या असहाय्यतेचा गैरफायदा घेऊन बळजबरीचाही प्रयत्न होत असल्याच्या घटना घडताहेत. बदनामीच्या धास्तीने या  घटना पोलिस ठाण्यापर्यंत पोहोचत नाहीत. त्याचा गैरफायदा घेत सराईत टोळ्या आणखीन सोकावू लागल्या आहेत.