Thu, Jul 18, 2019 16:56होमपेज › Kolhapur › अमृत योजना उद्घाटनाचा प्रयत्न दानोळीकरांनी पाडला हाणून

अमृत योजना उद्घाटनाचा प्रयत्न दानोळीकरांनी पाडला हाणून

Published On: May 02 2018 11:56AM | Last Updated: May 02 2018 11:56AMदानोळी/जयसिंगपूर : प्रतिनिधी

पोलिस बळाचा वापर करीत इचलकरंजीच्या अमृत योजनेचे उद्घाटन करू पाहणार्‍या प्रशासनाला उद्घाटन न करताच नरमाईची भूमिका घेत माघार घ्यावी लागली. ‘पाणी आमच्या हक्‍काचे, नाही कुणाच्या बापाचे,’ ‘परत जा...परत जा,’ अशा घोषणा देऊन संतप्त दानोळी (ता. शिरोळ) येथील ग्रामस्थांनी उद्घाटनाचा कार्यक्रमच बुधवारी हाणून पाडला. 

तब्बल साडेचार तास प्रशासकीय अधिकारी व ग्रामस्थ भर उन्हात रस्त्यावर उभे होते. प्रचंड फौजफाट्यामुळे दानोळीला पोलिस छावणीचे स्वरूप आले होते. दडपशाही करणार असाल, तर एक थेंबही पाणी मिळणार नाही, असा इशारा वारणा बचाव कृती समितीने दिला. गावातील सर्व व्यवहार ठप्प होते. महिलाही रस्त्यावर उतरल्या होत्या.

इचलकरंजी अमृत योजनेचे उद्घाटन होणार असल्याने सकाळपासूनच दानोळीत तणाव होता. दानोळी-जयसिंगपूर मार्ग, वारणा   नदीकडे जाणारा रस्ता मोठे दगड टाकून अडविण्यात आला होता. तसेच या मार्गावर टायरी पेटवून दिल्याने धुराचे लोट उठले होते. 

छत्रपती शिवाजी चौकात सुमारे 2 हजारांचा जमाव सकाळपासूनच हजर होता. दुपारी एकच्या सुमारास  फौजफाट्यासह प्रशासकीय अधिकारी दानोळीत दाखल झाले. मात्र, छ. शिवाजी चौकातच घोषणा देत ग्रामस्थांनी  फौजफाटा अडविला. कोणत्याही परिस्थितीत उद्घाटनासाठी नदीकडे जाऊ देणार नाही, अशी भूमिका घेत रस्त्यावर ठाण मांडले.  तणावपूर्ण वातावरणातच चर्चेच्या फेर्‍या सुरू होत्या.

इचलकरंजीचे प्रांताधिकारी समीर शिंगटे, शिरोळचे तहसीलदार गजानन गुरव, इचलकरंजीचे मुख्याधिकारी  प्रशांत रसाळ, अप्पर  जिल्हा पोलिस अधीक्षक श्रीनिवास घाडगे, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे व कृष्णात पिंगळे यांच्यासह सुमारे 400 पोलिसांची कुमक तैनात होती. चौकात वारणा बचाव कृती समितीचे अध्यक्ष महादेवराव धनवडे, उपाध्यक्ष केशव राऊत, सर्जेराव शिंदे, मानाजीराव भोसले,  पै. केशव राऊत, सरपंच सुजाता शिंदे, रंजना राऊत, रुक्साना नदाफ यांच्यासह शेकडो महिला व ग्रामस्थ उपस्थित होते. 

रस्ता अडविल्यानंतर चौकातच धनवडे यांनी भूमिका स्पष्ट केली. ते म्हणाले, प्रशासन दबावाखाली काम करीत आहे. आमच्या हक्‍काचे पाणी कोण चोरणार असेल, तर ते खपवून घेणार नाही. जमिनी, घरे गेलेल्या 29 पैकी 27 धरणग्रस्त वाड्यावस्त्यांना अद्याप पाणी मिळाले नाही. लाभ क्षेत्रातील 281 पैकी फक्‍त 82 गावांना पिण्याच्या पाण्याची सक्षम व्यवस्था आहे.  उपसा आणि सिंचन ही आकडेवारी बोगस दाखविण्यात आलेली आहे. दोन योजना करून इचलकरंजीला तिसरी योजना कशासाठी आहे, याचा विचार इचलकरंजीच्या नेत्यांनी करावा. पंचगंगा कोण प्रदूषित केली, कृष्णा योजनेला 15 वर्षांत गळती का लागली, याची कारणे शोधा. आमच्या नैसर्गिक हक्‍काच्या विरोधात कोण दडपशाही करीत असेल, तर वारणा काठ ही कृती खपवून घेणार नाही.

नदीकडे जाण्याचा बेत फसल्यानंतर सव्वाचारच्या सुमारास प्रांताधिकारी  शिंगटे व अप्पर पोलिस अधीक्षक घाडगे यांनी वरिष्ठांना माहिती दिली. त्यानंतर लगेच जलद कृती दलासह सर्व पोलिस कर्मचार्‍यांना  आपापल्या वाहनात बसण्याचा आदेश देण्यात आला. त्यापाठोपाठ  शिंगटे व अधिकारी  शिवाजी चौकातून माघारी फिरले. पत्रकारांशी बोलताना समीर शिंगटे म्हणाले, लोकभावनेचा आदर करून आम्ही चर्चा केली. कृती समितीशी प्रशासकीय अडचणींसंदर्भात व तांत्रिक मुद्द्यांवरही चर्चा झाली. सर्व मुद्दे वरिष्ठांना कळवू. त्या मुद्द्यांचे निरसण करून लवकरच योजनेचे उद्घाटन केले जाईल.

रणरागिणींचा हिसका

पोलिसांची कुमक असूनही अधिकारी जमावासमोर हतबल ठरले. वरिष्ठांना फोनवरून घटनेची माहिती कळविली जात होती. तब्बल चार तासांनंतर वारणा बचाव आणि अधिकार्‍यांची बैठक सुरू होती. किमान नदीकाठची पाहणी काही मोजके अधिकारी करतील, असे ठरले. त्यावेळी सोबत वारणा बचाव कृती समितीचे काही पदाधिकारी असावेत, असे ठरले. पोलिसांच्या गाडीत महादेवराव धनवडे, सर्जेराव शिंदे, रावसाहेब भिलवडे, उपाध्यक्ष केशव राऊत  बसले. पण, गाडीत बसलेल्या पोलिस अधिकारी आणि समितीच्या पदाधिकार्‍यांना महिलांनी रोखले.  आम्ही पाणी देणार नाही, मग नदी कशाला बघता, असे म्हणत त्यांच्या गाड्या अडविल्या. सर्वांनाच गाडीतून उतरणे भाग पडले. त्यामुळे वारणाकाठच्या रणरागिणींनी अमृत योजनेच्या उद्घाटनासाठी आलेल्या अधिकार्‍यांना पाणीही पाहू न देता वारणाकाठचा हिसका दाखविला.

Tags : kolhapur, danoli villagers, against, amrut skim, Inauguration, kolhapur news