Sun, Apr 21, 2019 02:10होमपेज › Kolhapur › दानोळीचा वारणा काठ विद्युत मोटारींच्या विळख्यात

दानोळीचा वारणा काठ विद्युत मोटारींच्या विळख्यात

Published On: Feb 13 2018 2:04AM | Last Updated: Feb 13 2018 12:16AMदानोळी : मनोजकुमार शिंदे

वारणा नदीतून शेतीला पाणी उपसाचे ग्रहण लागले आहे. त्यामुळे सुजलाम सुफलाम भागाचे भविष्यात वाळवंट होते कि काय ? हा प्रश्‍न येथील शेतकरी आणि नागरिकांत खदखदत आहे. सध्या पाणी उपशाच्या मोटारीने दानोळी वारणा काठ  विळख्यात सापडल्याचे चित्र आहे. वारणा नदी ही प्रामुख्याने बारमाही आणि शुद्ध पाणी यासाठी ओळखली जाते. त्यामुळे किनार्‍यावरील शेतकरी आणि नागरिकांना नेहमीच प्रशासन आणि लोकप्रतिनिधींच्या योजनांची झळ सोसावी लागली आहे. कोणताही प्रकल्प राबवला कि पहिला सुपिक आणि पिकाऊ जमीन म्हणून येथील शेती आणि जमिनी ह्या आरक्षित केल्या जातात. मग प्रकल्पग्रस्तांना जमिनी द्यायच्या असोत अगर दुष्काळ ग्रस्तांना पाणी.  यासाठी नेहमीच या परिसरातील शेती किंवा पाणी हे प्रशासन आणि लोकप्रतिनिधींना दिसते.  

पण ज्यांच्या चांगल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना जाऊन क्षारपड अगर कोरडवाहू जमिनी राहून जी कुटुंबे देशोधडीला लागली, चांगल्या जमिनी प्रकल्पग्रस्तांना जाऊन ज्यांना दुसर्‍याच्या बांधावर मजुरीसाठी जावे लागले त्यांचे काय? ज्या शेतकर्‍याच्या जमीनी नदीत गेल्या त्यांना यातून नेमके काय मिळाले याचा विचार होत नाही.  आज वारणेचे पाणी इचलकरंजी नगरपालिका मागत आहे.  जयसिंगपूर आणि सांगली या शहरानीही येथून पाणी नेण्याचा ठराव केला आहे.   गत वर्षी लातूरला वारणेचे पाणी रेल्वेने पाठवले. तेथे दुष्काळी परिस्थिती निर्माण झाल्याने ते रास्त असल्याने कोणीही विरोध केला नाही.

पण कोठेही दुष्काळ पडल्यावर आपला उभा ऊस तोडून तेथील जनावरांना चारा पाठवणार्‍या या वारणा काठच्या शेतकर्‍यांना वार्‍यावर सोडून लवादात शासनाने फसगत केल्याने भरमसाट कर्जे काढून शेतीला पाण्यासाठी पाईपलाईन केल्या आहेत. पाणी  कमतरतेमुळे कर्जे न फिटल्यास आत्महत्या करण्याची वेळ येऊ देऊ नये ही माफक अपेक्षा येथील शेतकरी वर्गातून व्यक्त केली  जात आहे. आणि मऊ लागले म्हणून कोपराने खांडनारी ही रित वारणा काठचा शेतकरी खपवून घेणार नाही अशी भावना येथील लोकांतून वक्त होत आहे. 

वारणेतुन इचलकरंजी आणि इतर शहरांना पाणी गेल्यास येथे पिण्याच्या पाण्याचा प्रश्‍न निर्माण होणार असून भविष्यात ‘वारणा नदी उशाला आणि कोरड घशाला’ अशी स्थिती निर्माण होऊन पाण्याची गळती आणि उपसा यामुळे दुष्काळी परिस्थिती निर्माण होऊन वारणा काठावरील सर्वच गावांना याची झळ सोसावी लागणार आहे.  त्यामुळे योग्य निर्णय घेऊन मोठ्या शहरांबरोबरच त्या शेजारील इतर खेड्यांचाही  पणी प्रश्‍न कायम स्वरूपी निकालात काढावा अशी मागणी वारणा काठावरील लोकांतून होत आहे.  सध्या दानोळीचा वारणा काठ हा पाणीउपश्याच्या मोटारीनी माखला असून, भविष्यात येणार्‍या मोटारी आणि जॅकवेल आणि इंटकवेल, पंप हाऊस यांच्या विळख्यात राहणार हे मात्र नक्की.