Tue, Apr 23, 2019 23:55होमपेज › Kolhapur › कोल्हापूरच्या सायकलपटूची गिनिज बुक विक्रमासाठी तयारी

कोल्हापूरच्या सायकलपटूची गिनिज बुक विक्रमासाठी तयारी

Published On: Jan 11 2018 1:07AM | Last Updated: Jan 10 2018 11:28PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी 

पर्यावरणाचे रक्षण आणि विश्‍वबंधुत्वाच्या जनजागृतीच्या उद्देशाने जगभरातील 15 देशांची सायकल सफर करण्याचा निर्धार कोल्हापूरच्या रणरागिणीने केला आहे. वेदांगी कुलकर्णी या 19 वर्षीय युवतीने नव्या पिढीत साहस व आत्मविश्‍वास निर्माण करण्याच्या उद्देशाने ही मोहीम आखली आहे. 

कोल्हापुरातील हनुमान नगर (पाचगाव) येथे राहणार्‍या वेदांगीने 100 दिवसांत (15 जून ते 22 सप्टेंबर 2018) दररोज 320 कि.मी. याप्रमाणे 15 देशांचा प्रवास ती करणार आहे. या उपक्रमाची नोंद गिनिज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये करण्याचा तिचा मानस आहे. उद्योजक वडील विवेक कुलकर्णी व शिक्षिका आई अपर्णा कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली वेदांगीने मोहिमेची तयारी चालविली आहे. वेदांगी सध्या इंग्लंडमधील साऊथ वेस्टमधील बोर्नमथ युनिव्हर्सिटीत बीएससी स्पोर्टस् मॅनेजमेंटमध्ये शिक्षण घेत आहे. सायकलिंगच्या आवडीमुळे मनाली येथे अ‍ॅडव्हेंचर सायकलिंगचे धडे तिने घेतले. 

नवा विश्‍वविक्रम करण्यासाठी वेदांगीने इंग्लंडमध्ये जय्यत तयारी चालविली आहे. दररोज 10 ते 12 तास सायकलिंग, संतुलित आणि पौष्टिक आहार, आठवड्यातून एकदा 500 कि.मी. आंतराची मोठी रेस अशाप्रकारे तिचा सराव सुरू आहे. या विक्रमासाठी तिला तब्बल 50 ते 60 लाख रुपयांचा खर्च येणार आहे. परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज व कोल्हापूरचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील याच्या माध्यमातून उपक्रमास मदतीसाठीचे प्रयत्न सुरू आहेत.