होमपेज › Kolhapur › भाईगिरी फोफावतेय

भाईगिरी फोफावतेय

Published On: Mar 07 2018 1:52AM | Last Updated: Mar 07 2018 12:01AMकोल्हापूर : दिलीप भिसे

वर्चस्ववादातून सराईत टोळ्यांतर्गत कलह, दिवसागणिक जीवघेण्या हल्ल्यांसह गर्दी मारामारी, भरचौकात तलवारी फिरवून दहशत माजविण्याच्या घटनांमुळे दौलतनगर, जवाहरनगर, राजेंद्रनगर, यादवनगरसह उपनगरेही अशांत टापू बनू लागली आहेत. गुन्हेगारीवरील यंत्रणेचा धाक काही अंशी कमी होऊ लागल्याने ‘फाळकुटा’च्या कारनाम्याची झळ सर्वच घटकांना डोकेदुखी ठरू लागली आहे. परिणामी, ‘फाळकूटदादांना आवरा’ अशी हाक देण्याची वेळ आली आहे.

शहरासह उपनगरे, जिल्ह्यात काही दिवसांत खुनी हल्ल्यांसह गर्दी मारामारी, वर्चस्वातून तलवार हल्ले, युवतींच्या छेडछाडीसह भरचौकात धमकाविणे अशा काही गंभीर घटना घडल्या आहेत. राजारामपुरी, जुना राजवाडा, शाहूपुरी पोलिस ठाण्यासह इचलकरंजी, शहापूर, शिरोळ, जयसिंगपूर, गगनबावडा, पन्हाळा परिसरातील या घटना सामाजिक स्वास्थ्य बिघडविणार्‍या आहेत.

डोळ्यांदेखत घडणार्‍या घटनांमुळे भीतीची छाया 
दौलतनगर, यादवनगर परिसरातील सराईतांनी वर्चस्ववादातून पोलिस यंत्रणेला आव्हान दिले आहे. प्रत्येक दिवसाला घडणारी गुंडागर्दी, डोळ्यांदेखत तलवार हल्ल्यांच्या घटनांमुळे मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणारी अनेक गोरगरीब कुटुंबे भीतीच्या छायेखाली वावरत आहेत.

कोवळी गोरगरीब मुले गुन्हेगारीच्या विळख्यात
  ज्यांची गुन्हेगारी पार्श्‍वभूमी नाही. अशा अनेक गरीब घरांतील मुलांना गुन्हेगारी जाळ्यात ओढण्याचा प्रकार सुरू आहे. पंधरा-वीस वयोगटातील पोरं रेकॉर्डवर येऊ लागली आहेत. कामधंदा न करता विनासायास मिळणार्‍या पैशामुळे ती आपसूकच गुन्हेगारी चक्रात अडकू लागली आहेत. अलीकडच्या काळात पोलिस रेकॉर्डवरील मुलांच्या वयोमानावर नजर 
टाकल्यास धक्कादायक चित्र दिसून येते.

म्होरक्यांविरुद्ध प्रभावी कारवाईची मात्रा लागू करा
 दोन दिवसांपूर्वी उद्यमनगरात एका कंपनीत नोकरी करणार्‍या तरुणीला मद्यधुंद अवस्थेतील तरुणांनी भरचौकात अडविले. अश्‍लील शेरेबाजी करीत तिला धमकावले. तिच्या मदतीसाठी धावून आलेल्या अन्य कर्मचार्‍यांनाही संशयितांनी धक्काबुक्की केली. कोल्हापुरात आणि भरचौकात अशा घटना घडू लागल्याने सर्वसामान्यांची काय अवस्था? कागदी घोडे नाचविण्याऐवजी ‘फाळकुटा’ची दहशत मोडीत काढण्यासाठी प्रभावी मात्रा लागू करण्याची आवश्यकता आहे.

रिमोट कंट्रोलसारखा तरुणांचा वापर
  टोळ्यांचे वर्चस्व, किंबहुना परिसरातील दहशत कायम ठेवण्यासाठी ‘फाळकुटदादां’कडून तरण्या पोरांचा रिमोट कंट्रोलप्रमाणे वापर सुरू झाला आहे. मनसोक्त खा, पाहिजे ती प्या... खर्चाला चिरमिरी घ्या; पण टोळीची दहशत निर्माण करा, असा  हुकूमच त्यांच्या माथी मारला जातोय... हा प्रकार भविष्यात फारच घातक ठरू शकतो. त्यातून एखादा मोठा गुन्हेगार म्हणूनही रेकॉर्डवर येऊ शकतो. शहरासह परिसरातील टोळ्यांच्या म्होरक्यांची वाटचाल त्याच दिशेने सुरू आहे.