Mon, May 27, 2019 01:04होमपेज › Kolhapur › कोल्हापूरचा ‘बिहार’ होण्याची भीती

कोल्हापूरचा ‘बिहार’ होण्याची भीती

Published On: Dec 29 2017 1:34AM | Last Updated: Dec 28 2017 11:52PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : दिलीप भिसे

वाहनांची डिकी फोडून रोख रकमेसह किमती ऐवज भरदिवसा लुटणार्‍या टोळ्यांनी शहरासह जिल्ह्यात दहशत निर्माण केली आहे. दोन महिन्यांतील घटनांमध्ये चोरट्यांनी लाखो रुपयांचा ऐवज लुटून मोठे आव्हान निर्माण केले असतानाही, पोलिस दल निष्क्रिय ठरले आहे. कोल्हापूर, जयसिंगपुरातील घटनांमुळे असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ लागली आहे. बिहारसारखे जंगलराज कोल्हापुरातही सुरू झाले की काय, अशी भीती नागरिकांतून उपस्थित केली जात आहे.

सरत्या वर्षात पार्किंग वाहने फोडून किमती ऐवजांवर चोरट्यांनी डल्ला मारल्याच्या अनेेक घटना घडल्या आहेत. प्रामुख्याने जयसिंगपूर, इचलकरंजीसह कोल्हापुरातील घटनांचा समावेश आहे. आर.के.नगर ते राजेंद्रनगर नाकादरम्यान मार्गावर महिलेच्या मोपेडच्या डिकीमधील  साडेतीन लाखांच्या दागिन्यांवर टोळीने हातोहात डल्ला मारला. बँक लॉकरमधील दागिने घेऊन जाताना पाठलाग झाला. नेमकी संधी साधत चोरट्यांनी डाव साधला.निवृत्त अधिकारी श्रीकांत गुजर यांनी जयसिंगपुरातील बँकेतून तीन लाख रुपयांची रक्‍कम काढली. रक्‍कम मोपेडमध्ये ठेवली.  

घरालगत चोरट्यांनी हिसडा मारून रोकड घेऊन धूम ठोकली. शाहूनगर या गजबजलेल्या वस्तीमध्ये भरदुपारी घटना घडली. याअगोदर जुना नांदणी जकात नाक्यावर एका तरुणाकडील लाखाची रोकड चोरट्यांनी लंपास केली. नांदणीतील शेतकरी सुकुमार पाटील यांनाही आर्थिक फटका सोसावा लागला. पंचायत समितीसमोर मोटारीची काच फोडून दोन लाखांची रोकड, एक लाख रुपये किमतीच्या लॅपटॉपची चोरी झाली. त्यानंतरही इचलकरंजी परिसरात काही घटना घडल्या. स्थानिक गुन्हेगारांसह काही परप्रांतीय टोळ्या लुटमारीच्या गुन्ह्यात सक्रिय झाल्याची भीती खुद्द पोलिस अधीक्षक संजय मोहिते यांनी व्यक्‍त केली होती; मात्र त्याची अधिकार्‍यांनी फारशी गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून येत नाही. या घटनांमुळे सर्वसामान्यांना त्याची मोठी किंमत  मोजावी लागत आहे.