Thu, Jun 20, 2019 00:55होमपेज › Kolhapur › गोरगरीब हृदयरुग्णांच्या जीवनदानासाठी दाता मिळेल?

गोरगरीब हृदयरुग्णांच्या जीवनदानासाठी दाता मिळेल?

Published On: Mar 17 2018 1:15AM | Last Updated: Mar 16 2018 10:02PMकोल्हापूर : राजेंद्र जोशी

सर्वसामान्य गोरगरीब हृदयरुग्णांना संजीवनी देण्यासाठी कोल्हापुरातील सीपीआर रुग्णालयाच्या मागे एक दातृत्त्ववान दाता उभारण्याची गरज आहे. हृदयरुग्णांच्या जोखमीच्या शस्त्रक्रियेसाठी उपयुक्‍त असे एक यंत्र सध्या जुनेपुराणे झाले आहे. हे यंत्र रुग्णाला दान करण्याचे औदार्य जर या दात्याने दाखविले, तर पश्‍चिम महाराष्ट्रात हृदयरुग्णांवर उपचारासाठी अतिशय बहुमोल योगदान देणार्‍या या रुग्णालयाच्या प्रगतीचा वेग दुप्पटीहून अधिक वाढू शकतो.

सीपीआर रुग्णालयात सन 1999 मध्ये हृदय शस्त्रक्रिया विभागाची उभारणी झाली. तत्कालीन आरोग्यमंत्री दिग्विजय खानविलकर यांच्या परिश्रमपूर्वक प्रयत्नातून उभ्या राहिलेल्या या विभागातून केवळ कोल्हापूरच नव्हे, तर पश्‍चिम महाराष्ट्र, कोकण आणि उत्तर कर्नाटकातील हजारो हृदयरुग्णांना लाभ मिळाला आहे. या रुग्णालयात प्रामुख्याने हृदय शस्त्रक्रिया व चिकित्सा याकरिता जी यंत्रसामग्री उभारण्यात आली होती. त्यामध्ये इंट्रा अ‍ॅव्हॉर्टिक बलून पंप नावाचे सुमारे 75 लाख रुपये किमतीचे एक यंत्र उपलब्ध करून देण्यात आले होते. हे यंत्र सध्या त्याचा वापर आणि वयोमानामुळे सतत नादुरुस्त होते आहे. यामुळे हृदय शस्त्रक्रिया विभागात वेगाने सुरू असलेल्या प्रगतीमध्ये अडथळे येत आहेत. केंद्र शासनाने जीएसटी प्रणाली लागू केल्यानंतर या यंत्राची किंमत 20 लाख रुपयांनी कमी होऊन ती 55 लाख रुपयांच्या आसपास खाली आली आहे.

एवढी रक्‍कम देणारा एखादा दाता अथवा कॉर्पोरेट सोशल रिस्पॉन्सिबिलिटी अंतर्गत एखादा उद्योग उभा राहिला, तर हे अडथळे दूर होतील. शिवाय, अनेक रुग्णांच्या जीवाला संजीवनी मिळू शकते. हृदयशल्य विज्ञानाच्या परिभाषेत इंट्रा अ‍ॅव्हॉर्टिक बलून पंप या यंत्राला संक्षिप्तरीत्या आयएबीपी या नावाने ओळखले जाते. हृदय शस्त्रक्रियेवेळी हृदयाची कार्यक्षमता वाढविण्यासाठी त्याचा मोठा उपयोग होतो. सीपीआर रुग्णालयात हृदयाची अत्यंत कमकुवत क्षमता असलेले आणि जोखमीची शस्त्रक्रिया आवश्यक असलेले अनेक रुग्ण दाखल होतात. विशेषतः बायपास सर्जरीमध्ये अथवा हृदयाचा झटका आलेल्या रुग्णांसाठी हे यंत्र संजीवकाची भूमिका बजावत असते. या यंत्राची शासनाकडून खरेदी प्रक्रिया करण्यासाठी कागदोपत्री सोपस्कार आणि निधीची उपलब्धता यामुळे लागणारा एकूण वेळ आणि हृदयरुग्णांची परवड लक्षात घेऊन दात्याने औदार्य दाखवले, तर त्याची पुण्याची ओंजळ भरू शकेल.

सीपीआर रुग्णालय हे सध्या राज्यातील हृदयरुग्णांवर उपचार करणारे दुसर्‍या क्रमांकाचे केंद्र समजले जाते. या रुग्णालयात पूर्णवेळ 4 हृदयशल्यविशारद व 4 हृदयरोगतज्ज्ञ कार्यरत आहेत. यामुळे तेथे दररोज शस्त्रक्रिया व कॅथलॅबमध्ये मोठे काम सुरू असते. एवढे असूनही सध्या तेथे काही सुविधांच्या कमतरतेमुळे विशेषतः अतिरिस्त्र ऑपरेशन थिएटर, भूलतज्ज्ञ आणि तंत्रज्ञ यांच्या अभावाने रुग्णालयात उपचाराकरिता प्रौढांसाठी एक महिन्याची, तर बालकांसाठी 4 महिन्यांची प्रतीक्षा यादी आहे. ही यादी कमी करण्यासाठी रुग्णालयीन प्रशासनाने कोल्हापूरच्या दातृत्वाला साद दिली आहे.