Sat, Jul 20, 2019 08:36होमपेज › Kolhapur › आयुक्तांसह अधिकार्‍यांवर फौजदारी

आयुक्तांसह अधिकार्‍यांवर फौजदारी

Published On: | Last Updated:

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर शहरात डेंग्यूचा मोठ्या प्रमाणात प्रसार होत आहे. यामुळे शहरवासीय भीतीच्या छायेत वावरत आहेत. येत्या दहा दिवसांत डेंग्यू आटोक्यात न आणल्यास आयुक्तांसह अधिकार्‍यांवर फौजदारी गुन्हे दाखल करू, असा इशारा महापौर हसिना फरास यांनी मंगळवारी दिला. आयुक्त डॉ. अभिजित चौधरी, उपमहापौर अर्जुन माने प्रमुख उपस्थित होते. 

शहरात डेंग्यूच्या रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्‍वभूमीवर महापौरांनी पदाधिकारी व प्रशासनाची बैठक घेतली. आरोग्याधिकारी डॉ. अरुण वाडेकर यांनी शहरात केवळ 14 रुग्ण असल्याचे सांगितल्यावर पदाधिकार्‍यांनी त्यांना फैलावर घेतले. महापौर फरास यांनी, माझ्या प्रभागातच 10 रुग्ण आढळल्याचे सांगून तुम्ही चुकीची माहिती सांगत आहात, असे म्हणत त्यांना चांगलेच सुनावले. भाजप गटनेता विजय सूर्यवंशी यांनी लोकांत भीतीचे वातावरण असल्याने खासगी डॉक्टर थेट आयसीयूमध्येच रुग्णांना ठेवत असल्याचे सांगितले. सचिन चव्हाण यांनी कळंबा फिल्टर हाऊसमध्ये डेंग्यूच्या अळ्या असून, अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोप केला. किरण नकाते यांनी, जीव गेल्यावर प्रशासन खडबडून जागे होऊन काय उपयोग, अशी विचारणा केली. वाडेकर यांनी, रुग्ण आढळल्यावर त्या परिसरातील शंभर घरांतील लोकांची तपासणी करत असल्याचे सांगितले. त्यावरून आतापर्यंत किती घरातील लोकांची तपासणी केली, असे म्हणून नगरसेवकांनी वाडेकर यांना प्रा. जयंत पाटील यांच्यासह नगरसेवकांनी  फैलावर घेतले. आदिल फरास म्हणाले, माणसे मरत आहेत आणि प्रशासन ढिम्म आहे. लोकांच्या जीवाचा प्रश्‍न असूनही प्रशासन चुकीची व दिशाभूल करणारी माहिती देत आहे.

प्रशासनाच्या माहितीनुसार शहरात 32 डेंग्यूचे रुग्ण असून, 46 पॉझिटिव्ह रुग्ण असल्याचे सांगण्यात आले. डेंग्यूचे एकूण 78 रुग्ण असून, गेल्या तीन महिन्यांत चौघांचा डेंग्यूने मृत्यू झाला असल्याचे आरोग्याधिकारी वाडेकर यांनी सांगितले. मुख्य आरोग्य निरीक्षक डॉ. विजय पाटील यांना नगरसेवकांनी धारेवर धरले. दीपा मगदूम यांनी तुमच्या घरात मनपाचे किती कर्मचारी काम करतात, अशी विचारणा केली. राहुल चव्हाण यांनी पाटील यांना तुम्हाला काम जमत नसेल तर राजीनामा द्या, असे सुनावले. काँग्रेस गटनेता शारंगधर देशमुख, मुरलीधर जाधव, सचिन चव्हाण, अश्‍विनी बारामते, स्मिता माने, अशोक जाधव, शमा मुल्ला, रूपाराणी निकम यांनी चर्चेत भाग घेतला.