Thu, Jul 18, 2019 10:09होमपेज › Kolhapur › कोल्हापूर : खड्ड्यात गेले शहर!

कोल्हापूर : खड्ड्यात गेले शहर!

Published On: Aug 19 2018 1:31AM | Last Updated: Aug 19 2018 1:19AMकोल्हापूर : विजय पाटील 

सर्वाधिक वर्दळीच्या स्टेशन रोडवरून शहरात येताना तुमचे स्वागत खोल खड्डेच करतात. रंकाळा रोडच्या रस्त्याची तर चाळणच झाली आहे. चप्पल लाईनचा रस्ता गायब झाला असून पावसाच्या पाण्याने भरलेले खड्डे म्हणजेच हा मार्ग असे चित्र आहे. न्यू शाहूपुरीतील रस्ते असोत किंवा राजारामपुरीतील खड्डेच खड्डे चोहीकडे अशी रस्त्यांची स्थिती बनली आहे. सावधान..खड्ड्यांतून रस्ता शोधत पुढे जा! असे म्हणण्याची वेळ शहरवासीयांवर आली आहे. 

जून महिन्यांत पाऊस सुरू झाल्यावर शहरातील चकचकीत दिसणार्‍या अनेक निकृष्ट रस्त्यांचे खरे रूप दिसू लागले. रस्त्यांची चाळण झाली. खडी, डांबर पावसाच्या पाण्यातून वाहून गेले. शहरातील सिमेंटचे आणि एखाद-दुसरा अपवाद सोडला तर सगळ्याच रस्त्यांची चाळण झाली आहे. मिरजकर तिकटीकडून बिंदू चौकाकडे असू दे किंवा गंगावेशकडून महापालिकेकडे येणारा रस्ता असू दे खड्डेच खड्डे दिसून येतात. हॉकी स्टेडियमकडून कळंब्याकडे जाणारा रस्ता तसेच मिरजकर तिकटीपासून आयटीआय हे रस्ते तर फक्‍त खड्ड्यांची मालिका बनल्यासारखे आहेत.  

 मातीमुळे घसरतात वाहने 

शुक्रवार पेठ ते शिवाजी पूल, राजारामपुरी आदी रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी मुरूम आणि खडी वापरल्याचे दिसते, पण हे खड्डे भरल्यानंतर ते प्रेस केले नसल्याने ही मुरूममिश्रित लाल माती आणि खडी रस्त्यावर पसरली आहे. यामुळे दुचाकींचे घसरून अपघात वाढत आहेत. मुरूम आणि खडीने खड्डे व्यवस्थित भरत नसल्याने अपघात होतात हे दिसत आहे. त्यामुळे खड्डे भरण्यासाठी नव्या तंत्राचे पर्याय वापरायला हवे. जसे की कोल्डमिक्स, इन्स्टा मिक्स (डांबर), प्लास्टिकच्या गोळ्या करून तयार केलेले मिश्रण यासह इन्स्टंट रिकव्हर सिमेंटचा वापरही यासाठी करता येईल, असे या क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे. याचबरोबर पॉट होल क्रशिंग पॉवरहाऊस या नव्या तंत्रज्ञानात इंटरनेट सेन्सॉरचा वापर करून खड्डे अचूक भरले जातात. लॅरी झॅन्को या शास्त्रज्ञाने तयार केलेली पद्धतही वापरली जाऊ शकते. या पद्धतीत मायक्रोवेव्हचा वापर केला जातो. यामध्ये खड्डे गरम केले जातात. त्यानंतर त्यात मॅग्नेटाईट आणि रिसायकल केलेले डांबर भरून त्यावर स्प्रे करून खड्डा सील केला जातो. 

 कंत्राटदार आणि अधिकार्‍यांची जबाबदारी

 रस्ते शास्त्रीय पद्धतीने बांधले नसल्याचे दिसून येतात. कारण या रस्त्यांवर पावसाचे पाणी साचून राहते. त्यामुळे असे रस्ते खराब झाल्याचे दिसते. यासाठी शास्त्रीय पद्धतीने रस्ते बांधण्याची गरज आहे.  यासाठी कंत्राटदार आणि संबंधित अधिकार्‍यांना जबाबदार धरले पाहिजे.

देशात दररोज 10 बळी

देशभरात खड्ड्यांमुळे 2017 सालात 3597 लोकांना जीव गमवावा लागला. 2016 सालापेक्षा हा आकडा 50 टक्क्यांनी जास्त आहे. यामध्ये महाराष्ट्राची संख्या ही 726 इतकी मोठी आहे. सरासरी दररोज 10 लोकांचा बळी खड्ड्यांमुळे जातो हे भीषण वास्तव डॉ. एस. एस. मंठा (माजी चेअरमन एआयसीटीई एडीजे) यांनी केलेल्या अभ्यासातून समोर आले आहे. शहरात व उपनगरात खड्ड्यांमुळे अपघातांची संख्या वाढत चालली असल्याचे 
दिसते.