Thu, Apr 18, 2019 16:26होमपेज › Kolhapur › वळिवाने झोडपले (Video)

वळिवाने झोडपले (Video)

Published On: Apr 17 2018 7:13PM | Last Updated: Apr 17 2018 7:33PMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिवसभर उष्म्याने हैराण झालेल्या नागरिकांना मंगळवारी सायंकाळी जोरदार पावसाच्या सरी कोसळल्याने काही काळ दिलासा मिळाला. सायंकाळनंतर शहरासह जिल्ह्यातील बहुतांश भागात वादळी वारा आणि विजेच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडला. शहरातील सखल भागात पाणीच पाणी साचले होते. रात्री उशिरापर्यंत पाऊस सुरू होता. दरम्यान, शाहूवाडी, पन्हाळा, आजरा, भुदरगड, गगनबावडा आदी तालुक्यांसह जिल्ह्यातील सर्वच भागांत जोरदार वळिवाने दमदार हजेरी लावली. दरम्यान, वादळी वार्‍यामुळे फुलेवाडी नाका येथे वडाचे झाड कोसळले. त्यामुळे या मार्गावरील वाहतूक रात्री उशिरापर्यंत खोळंबली होती.

गेल्या आठवड्यापासून दररोज उकाड्याची तीव्रता वाढत होती. मागील दोन दिवसांत तर उष्म्याने उच्चांक गाठला होता. आज सकाळी नऊ वाजल्यापासूनच उकाडा जाणवत होता. दुपारी बारानंतर तर असह्य उष्मा जाणवू लागला. उन्हाची तीव्रता जास्त असल्याने दुपारनंतर रस्त्यावर नेहमीपेक्षा वर्दळ कमी दिसत होती. छोटे विक्रेते आणि

हातगाडीवाले झाडांच्या सावलीखाली व्यवसाय करत असल्याचे चित्र दिसून आले. ताक, लस्सी, लिंबू सरबत पिण्यासाठी दुकानांमध्ये मोठी गर्दी झाली होती. दुपारी चारनंतर मात्र वातावरण ढगाळ होऊ लागले. यावेळी सोसाट्याचा वारा सुटला. विजांचा कडकडाट सुरू झाला. त्यामुळे वळीव कोसळणार असे दिसू लागले. सायंकाळी साडेपाचनंतर तर काळोख पडू लागला. अखेर सायंकाळी  पावणेसातच्या सुमारास पावसाला सुरुवात झाली. पावसाच्या जोरदार सरी पडल्याने रस्ते व गटारींतून पाण्याचे पाट वाहू लागले. पावसामुळे रस्त्याकडेला आणि झाडांखाली अनेकांनी आसरा शोधण्याचा प्रयत्न केला. दुचाकीस्वार रस्त्याकडेला पाऊस जाण्याची वाट बराच वेळ पाहत होते. पावसामुळे परगावी जाणार्‍या प्रवाशांचे मात्र हाल झाले. त्यामुळे एस.टी. स्टँड, रेल्वेस्टेशन परिसरात प्रवासी पाऊस जाण्याची वाट पाहत तिष्ठत उभे होते. फोर्ड कॉर्नर, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, व्हीनस कॉर्नर आदी परिसरात रस्त्यावर पाणी साचले. या पाण्यातून वाट काढत वाहतूक सुरू होती.

दरम्यान, पावसामुळे उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांतून मात्र समाधान व्यक्‍त करण्यात आले. गेल्या आठवड्यात गारांसह धुवाँधार पाऊस पडला होता. आता पुन्हा आठवडाभरात जोरदार वळीव कोसळला. पावसामुळे काही ठिकाणी दक्षता म्हणून, तर अनेक ठिकाणी विजेच्या तारांवर झाडे कोसळल्याने वीजपुरवठा खंडित झाला होता. त्यामुळे काही ठिकाणी अंधाराचे साम्राज्य होते. सम्राटनगर येथे झाड कोसळल्याने स्थानिक नागरिकांची तारांबळ उडाली. यावेळी तत्काळ अग्‍निशमन दलाच्या जवानांनी झाड बाजूला केले.