Thu, Feb 21, 2019 02:57होमपेज › Kolhapur › सर्किट बेंचसाठी सर्वस्व पणाला लावू

सर्किट बेंचसाठी सर्वस्व पणाला लावू

Published On: Jun 18 2018 1:32AM | Last Updated: Jun 18 2018 1:25AMकोल्हापूर : प्रतिनिधी 

सहा जिल्ह्यांतील पक्षकारांच्या हितासाठी सर्किट बेंचची स्थापना होणे गरजेचे आहे. सर्किट बेंचसाठी सर्वस्व पणाला लावू. खंडपीठ कृती समितीच्या माध्यमातून सहा जिल्ह्यांतील वकिलांची पुन्हा मोट बांधण्यासाठी प्रयत्न सुरू करण्यात येणार आहेत. सर्किट बेंचसाठी शासन सकारात्मक असले, तरी जागेचा शोध घेऊन शासनाच्या बजेटमध्ये तरतूद होण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे  जिल्हा बार असोसिएशनचे नूतन अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत चिटणीस यांनी सांगितले. 

मुंबई उच्च न्यायायलात 18 ऑगस्टला मुख्य न्यायमूर्तींची नेमणूक होणार आहे. नेमणुकीनंतर तत्काळ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करून न्यायमूर्तींची भेट घेण्यात येणार असल्याचेही अ‍ॅड. चिटणीस म्हणाले. सर्किट बेंचसाठी 100 कोटींचा निधी देण्याचे शासनाने आश्‍वासन दिले असून दै.‘पुढारी’चे संपादक पद्मश्री डॉ. प्रतापसिंह जाधव व पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या पुढाकाराने जागेचा शोध सुरू आहे. यामुळे तांत्रिक अडचणी दूर करून सर्किट बेंचचा मार्ग सुकर करू.

जिल्हाधिकार्‍यांना भेटणार

खंडपीठ कृती समितीमध्ये सहा जिल्ह्यांतील वकिलांचा समावेश आहे. येत्या काही दिवसांत सहा जिल्ह्यांतील बैठक घेऊन पुढील दिशा ठरविण्यात येणार आहे. दरम्यान, मंगळवारी (दि. 19) शेंडा पार्क येथील जागेसंदर्भात जिल्हाधिकारी डॉ. अविनाश सुभेदार यांची भेट घेऊन चर्चा करण्यात येणार असल्याचे अ‍ॅड. चिटणीस यांनी सांगितले. 

वकिलांच्या हिताचे निर्णय

बार असोसिएशनच्या निवडणुकीत मतदार वकिलांनी दाखविलेला विश्‍वास सार्थ ठरविण्यासाठी वकिलांसाठी कल्याणकारी योजना आखण्यात येणार आहेत. यामध्ये मुख्यत्वे आपत्कालीन निधीची उभारणी करणे, ज्येष्ठ वकिलांचे सत्कार समारंभ, महिला वकिलांसाठी जागा उपलब्ध करून देणे, अद्ययावत ग्रंथालय, पिण्याचे पाणी, पार्किंग सुविधा यासाठी प्रयत्न करणार असल्याचे अ‍ॅड. चिटणीस यांनी सांगितले.