Sat, Jul 20, 2019 10:38होमपेज › Kolhapur › एन. डी. पाटील, प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नाने खंडपीठ दृष्टिपथात

एन. डी. पाटील, प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नाने खंडपीठ दृष्टिपथात

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 16 2018 1:05AMकोल्हापूर : प्रतिनिधी

ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील आणि दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे कोल्हापूरसाठी मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ दृष्टिपथात आले असल्याच्या प्रतिक्रिया पश्‍चिम महाराष्ट्रातील ज्येष्ठ वकिलांनी व्यक्त केल्या आहेत. मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी गेल्या तीन दशकांहून अधिक काळ लढा सुरू आहे. केवळ पाठिंबा आणि बातम्या व लेख, अग्रलेख प्रसिद्ध करून न थांबता डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी खंडपीठाच्या मागणीसाठी गेल्या 30-35 वर्षांपासून सक्रिय पुढाकार घेतला आहे. प्रा. एन. डी. पाटील व डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या प्रयत्नामुळे कोल्हापूर खंडपीठ कृती समितीबरोबर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बैठक घेऊन खंडपीठासाठी जागा व 100 कोटींचा निधी जाहीर केला आहे. त्यामुळेच खंडपीठ दृष्टिक्षेपात आल्याचे मत व्यक्त करण्यात आले आहे.

खंडपीठ प्रश्‍न मार्गी लागल्याने सहा जिल्ह्यांतील हजारो पक्षकारांना दिलासा मिळाल्याची भावना व्यक्त होत आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर, सिंधुदुर्ग, रत्नागिरी या सहा जिल्ह्यांतील पक्षकारांना खटल्यासाठी मुंबईला जावे लागे. वेळ आणि पैसा मोठ्या प्रमाणात खर्च होई. गैरसोय होई. आता वेळ आणि पैसा यांची बचत होऊन लवकर न्याय मिळायला मदत होईल, अशाही भावना व्यक्त होत आहेत.

 डॉ. जाधव यांचे 30-35 वर्षांपासून प्रयत्न : अ‍ॅड. आडगुळे
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष, तसेच माजी महापौर अ‍ॅड. महादेवराव आडगुळे म्हणाले, मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ दृष्टिपथात आले असून याचे सर्वस्वी श्रेय दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांना जाते. डॉ. जाधव यांनी वकिलीची सनद घेतली असून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला होणे किती गरजेचे आहे, या प्रश्‍नाची त्यांना पूर्ण जाणीव आहे. त्यामुळेच ते खंडपीठ लढ्यासाठी गेल्या 30-35 वर्षांपासून सक्रिय आहेत. 1994 मध्ये डॉ. जाधव यांनी कराड येथे जाहीर परिषद घेऊन मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला होणे शेजारच्या जिल्ह्यांसाठी किती महत्त्वाचे आहे, हे पटवून दिले होते. कराडनंतर सांगलीतही त्यांनी खंडपीठासाठी परिषद घेतली होती. त्यापूर्वीपासूनच डॉ. जाधव यांनी कोल्हापूर खंडपीठासाठी सातत्यपूर्ण प्रयत्न केले आहेत.

बुधवारी (दि. 14) मुंबईत झालेली मुख्यमंत्र्यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बैठकीत 
डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी मुद्देसूद विवेचन केले. कोल्हापूरला खंडपीठ झाल्याने पश्‍चिम महाराष्ट्र आणि कोकणमधील वकील व पक्षकारांना कसा फायदा होणार आहे, हेसुद्धा स्पष्ट केले. त्यामुळे सरकारने खंडपीठासाठी जागेसह आर्थिक तरतूद करण्याचे ठोस आश्‍वासन दिले. त्यामुळेच कोल्हापूर खंडपीठ आता दृष्टिपथात आले आहे, असे ते म्हणाले.

 डॉ. प्रतापसिंह जाधव यांचा पुढाकार : अ‍ॅड. चव्हाण
महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलचे माजी सदस्य अ‍ॅड. शिवाजीराव चव्हाण म्हणाले, की मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापुरात होण्यासाठी डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पुढाकाराने गेल्या अनेक वर्षांपासून लढा सुरू आहे; पण प्रत्यक्षात बुधवारी  मुंबईत झालेल्या बैठकीनंतर याबाबतची कोंडी फुटली आहे. हा प्रश्‍न सोडविण्यासाठी सरकारने आश्‍वासन दिले होते; पण चर्चा बंद होती. त्या चर्चेची सुरुवात दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्यामुळे झाली आहे. केवळ चर्चेला सुरुवात झाली नाही, तर या बैठकीत खंडपीठासाठी जागा आणि आर्थिक तरतूद करण्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले आहे. खंडपीठ कोल्हापूरला होणे उचित असल्याचे मुख्यमंत्री पहिल्यांदाच बोलले आहेत. त्यामुळेच या लढ्याला आता यश येत असल्याचे स्पष्ट होत आहे. 

 डॉ. जाधव यांचा सक्रिय सहभाग : अ‍ॅड. शिंदे
कोल्हापूर जिल्हा बार असोसिएशन आणि कोल्हापूर खंडपीठ कृती समितीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रशांत शिंदे म्हणाले, की सहा जिल्ह्यांतील वकिलांचा खंडपीठ मागणीसाठी लढा सुरू आहे. या लढ्यासाठी  
दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी प्रथमपासूनच पुढाकार घेतला आहे. एवढेच नव्हे, तर बुधवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याबरोबर झालेल्या बैठकीत कोल्हापूर खंडपीठ दृष्टिपथात आल्याचे स्पष्ट झाले. डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी गेल्या 30-35 वर्षांपासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ कोल्हापूरला होण्यासाठीच्या लढ्यात सक्रियपणे सहभाग घेतला आहे. गेल्या पंधरा वर्षांपासून खंडपीठ मागणीचे आंदोलन तीव्र झाले आहे. नव्या सरकारसमोर पुन्हा आंदोलन करायचे की चर्चेतून प्रश्‍न सोडवायचा हा प्रश्‍न होता. सहा जिल्ह्यातील वकिलांच्या विचारविनिमयातून आम्ही चर्चेचा मार्ग निवडला. याला सरकारने सकारात्मक साथ दिली. खंडपीठासाठी कोल्हापूरच योग्य असल्याचा ठराव सरकारकडून मिळविणे आवश्यक होते. बुधवारी मुंबईत पार पडलेल्या बैठकीत शेंडा पार्कातील 75 एकर जागेचा प्रस्ताव, 100 कोटींची अर्थसंकल्पात ठोक तरतूद व शासनाकडून मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांना खंडपीठाबाबत ठराव, अशा तीन गोष्टी साध्य झाल्या आहेत. हे आजपर्यंतचे मोठे यश आहे. यामध्ये डॉ. जाधव यांनी दिलेले योगदान मोलाचे आहे.

 डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे  योगदान मोठे : अ‍ॅड. हिंगमिरे
सांगली, कोल्हापूर, सातारा, सोलापूर, रत्नागिरी व सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी कोल्हापूर येथे खंडपीठ सुरू करावे, अशी मागणी या सहा जिल्ह्यांतील सर्व राजकीय पक्ष, संघटना,  पक्षकार व वकील गेली 25 वर्षे करीत आहेत. शासनाने या मागणीकडे गांभीर्याने बघितलेले नव्हते; परंतु  ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या पाठपुराव्यामुळे शासनाने या मागणीची दखल घेतली आहे. त्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फ डणवीस, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील व खंडपीठ कृती समितीच्या सर्व पदाधिकार्‍यांचे आभार. आता मुख्यमंत्र्यांनी लवकरात लवकर खंडपीठाचे उद्घाटन करून न्यायालयीन कामकाज सुरू करावे, अशी आमची मागणी आहे, असे सांगली वकील संघटनेचे अध्यक्ष अ‍ॅड. शैलेंद्र हिंगमिरे यांनी सांगितले.

 डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे  आभार : अ‍ॅड. श्रीकांत जाधव
कोल्हापूर खंडपीठसाठी सांगली, कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील वकील, पक्षकार व सर्व राजकीय पक्ष, संघटना यांनी सातत्याने तीव्र आंदोलन केले आहे. त्यासाठी वकील व राजकीय पक्षांच्या अनेक नेत्यांसह शेकडो जणांवर गुन्हे दाखल झाले आहेत. खंडपीठ आंदोलनासाठी दैनिक ‘पुढारी’ने सर्वसामान्य लोकांची खंडपीठाची मागणी शासनापर्यंत पोहोचवली. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी  पुढाकार घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना या मागणीचे कारण पटवून दिले. प्रा. एन. डी. पाटील, डॉ. जाधव यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली. मुख्यमंत्र्यांनी खंडपीठ मंजुरी, निधी व जागा देण्याचे जाहीर केले. त्याबद्दल सर्वांचे आभार, असे महाराष्ट्र-गोवा बार असोसिएशनचे  माजी सदस्य अ‍ॅड. श्रीकांत जाधव यांनी सांगितले.

 डॉ. जाधव यांचा सातत्याने पाठपुरावा : अ‍ॅड. चिप्रे 
कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांतील पक्षकारांना उच्च न्यायालयाच्या कामकाजासाठी मुंबईला जाणे परवडणारे नाही. म्हणून येथील पक्षकार, वकील व सर्वच राजकीय पक्षांनी कोल्हापूर येथे खंडपीठ किंवा सर्किट बेंचची मागणी केली होती. प्रा. एन. डी. पाटील, दैनिक ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. मुख्यमंत्र्यांनीदेखील या मागणीकडे सकारात्मक दृष्टिकोनातून बघून खंडपीठाचे  कामकाज लवकरात लवकर सुरू व्हावे व सर्व सामान्यांची मागणी पूर्ण करावी अशी अपेक्षा आहे, असे सांगलीचे जिल्हा सरकारी वकील, अ‍ॅड.  उल्हास चिप्रे यांनी सांगितले.

 पक्षकारांच्या वेळेची बचत :  अ‍ॅड. देशमुख
सहा जिल्ह्यांतील लोकांच्या न्याय्य मागणीसाठी दैनिक ‘पुढारी’ने ठोस व निर्भीड लिखाण केले. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी खंडपीठ चळवळीत सहभागी होऊन पुढाकार घेतला. मुख्यमंत्र्यांकडून खंडपीठ  मंजूर करून घेतले. त्याबद्दल त्यांचे, महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, प्रा. एन. डी. पाटील व खंडपीठ कृती समितीच्या पदाधिकार्‍यांचे आभार, असे  सांगली वकील संघटनेचे माजी अध्यक्ष अ‍ॅड. अरविंद देशमुख यांनी सांगितले.

 लढ्याला यश : अ‍ॅड. धैर्यशील पाटील
पश्‍चिम महाराष्ट्रात उच्च न्यायालयाचे कोल्हापुरात सर्किट बेंच होणे, ही काळाची गरज आहे. प्रा. एन. डी. पाटील, ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनी कोल्हापूर येथे सर्किट बेंच होण्यासाठी लढा उभारला. या लढ्याला यश आले.  मुख्यमंत्र्यांनी केलेली घोषणा स्वागतार्ह आहे. मात्र, ही केवळ घोषणा राहू नये. शासनाने आता प्रत्यक्षात कोल्हापूर सर्किट बेंचचा सात-बारा तयार करावा, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ विधिज्ञ धैर्यशील पाटील यांनी व्यक्त केली.

 सर्वसामान्यांचा खर्च  वाचणार : अ‍ॅड. कुलकर्णी
कोल्हापूर येथे तत्काळ सर्किट बेंच सुरू झाल्यास न्याय दारात आल्यासारखी भावना होईल. सर्वसामान्यांचा खर्च वाचण्यास मदत होणार असून पश्‍चिम महाराष्ट्रातील अशिलांना त्याचा मोठा फायदा होणार आहे, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा सरकारी वकील अ‍ॅड. महेश कुलकर्णी यांनी व्यक्त केली.

 ‘पुढारी’ची साथ : अ‍ॅड. बेबले
कोल्हापूर येथे सर्किट बेंच व्हावे, यासाठी सहा जिल्ह्यांतील वकिलांनी दिलेला लढा व त्याला दै.‘पुढारी’ची मिळालेली साथ यामुळे हे शक्य होत आहे. त्यासाठी प्रा. एन. डी. पाटील व ‘पुढारी’कार डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे विशेष आभार. मुख्यमंत्र्यांनी निधीचा व जागेचा मार्ग मोकळा केला. आता प्रत्यक्ष कार्यवाहीनंतर न्यायदानाच्या कामकाजात निश्‍चित गतिमानता येणार आहे, अशी प्रतिक्रिया अ‍ॅड. चंद्रकांत बेबले यांनी व्यक्त केली.

 अशिलांना मोठा  दिलासा : अ‍ॅड. काटकर
सहा जिल्ह्यांतून मुंबईला जाण्यासाठी खूप वेळ जातो व त्यामुळे अशिलांना खर्चाचा भुर्दंड पडतो. कोल्हापूर हे मध्यवर्ती ठिकाण असल्याने पाचही जिल्ह्यांतून अवघ्या दोन तासांत तेथे पोहोचता येणार आहे. कोल्हापूर येथे प्रत्यक्ष सर्किट बेंचच्या कामकाजाला सुरुवात झाल्यानंतर या परिसरातील अशिलांना मोठा दिलासा मिळणार आहे, अशी प्रतिक्रिया सातारा जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. वैभव काटकर यांनी व्यक्त केली.

 पाठपुराव्याबाबत आभार : अ‍ॅड. शहानूरकर
मुंबई उच्च न्यायालयाचे कोल्हापूर खंडपीठ मुख्यमंत्र्यांनी मंजूर केलेले आहे. दै. ‘पुढारी’ने कोल्हापूर खंडपीठासाठी दिलेले योगदान अतिशय उल्लेखनीय असून ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांनीही व्यक्तिगत पातळीवर याकरिता प्रयत्न केले आहेत. त्यामुळे पंढरपूर वकील संघाच्या वतीने दै. ‘पुढारी’चे आम्ही आभार मानतो, अशी प्रतिक्रिया पंढरपूर वकील संघाचे अध्यक्ष अ‍ॅड. अल्ताफ शहानूरकर यांनी व्यक्त केली.

 ‘पुढारी’चे खास  अभिनंदन : अ‍ॅड. वाघमोडे
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ होणार असून तो प्रश्‍न मार्गी लागल्याबद्दल व याकामी सातत्याने आवाज उठवल्याबद्दल दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे अभिनंदन. कोल्हापूर येथे होणार्‍या खंडपीठामुळे सर्वसामान्य पक्षकारांची सोय होणार असल्याचे मत माळशिरस बार असोशिएनचे अध्यक्ष अ‍ॅड. आप्पासाहेब वाघमोडे यांनी व्यक्त केले.

 ‘पुढारी’चे पाठबळ :  अ‍ॅड. खांडेकर
कोल्हापूर येथे मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ मुख्यमंत्र्यांनी मंजूर केले आहे. याकरिता गेल्या 30 वर्षांपासून व्यापक आंदोलन करावे लागले आहे. दै. ‘पुढारी’ने  या आंदोलनास कायम पाठबळ दिले आहे. त्यामुळे सांगोला वकील संघ ‘पुढारी’चा ऋणी राहील, अशी प्रतिक्रिया सांगोला बार असो.च्या अध्यक्षा अ‍ॅड. खांडेकर यांनी व्यक्त केली.

 हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा ः अ‍ॅड. दिलीप नार्वेकर
कोल्हापूर खंडपीठासाठी 100 कोटी रुपये ठोस निधीतून देऊन विधी व न्याय विभागाला तत्काळ खंडपीठाचे कामकाज सुरू करण्याबाबत आदेश देण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आश्‍वासन दिल्याने कोल्हापूर खंडपीठ लवकरच सुरू होईल, असा विश्‍वास सिंधुदुर्ग जिल्हा बार असोसिएशनचे अध्यक्ष अ‍ॅड. दिलीप नार्वेकर यांनी व्यक्त केला. हा दिवस सुवर्णाक्षरांनी लिहिला जावा, असा असून या खंडपीठासाठी दै. ‘पुढारी’ने सातत्याने पुढाकार घेतला. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापूरसह सहा जिल्ह्यांचे नेतृत्व उजळून निघाल्याची प्रतिक्रिया अ‍ॅड. नार्वेकर यांनी दिली.

 कृती समितीचे प्रयत्न  यशाच्या दिशेने : अ‍ॅड. वायकूळ
ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व  दै. ‘पुढारी’चे मुख्य संपादक डॉ. प्रतापसिंह जाधव यांच्या नेतृत्वाखालील कृती समितीचे प्रयत्न यशाच्या दिशेने जात असल्याबाबत मनापासून अभिनंदन. ही खंडपीठ मागणी करणार्‍या कृती समितीत आपणही होतो, याचा आता या निमित्ताने अभिमान वाटतो. दीर्घ काळपासून प्रलंबित असणारी मागणी पूर्णत्वाच्या दिशेने जात असल्याचा आनंद मिळवून देणार्‍या ज्येष्ठ नेते प्रा. एन. डी. पाटील व डॉ. प्रतापसिंह जाधव यांचे शतश: आभार, असे  रत्नागिरीचे ज्येष्ठ वकील अ‍ॅड. अजित वायकूळ यांनी सांगितले. 

  ‘पुढारी’ च्या पाठपुराव्याला यश : अ‍ॅड. भोसले
फार पूर्वीपासून कोकण आणि कोल्हापूरचे व्यापारी यांचे संबंध आहेत. आता खंडपीठाच्या स्थापनेनंतर न्यायालयीन कामकाजासाठी हे संबंध अधिक घट्ट होणार आहेत. खंडपीठासाठी दैनिक ‘पुढारी’चे योगदान आदर्शवत आहे. हा विषय दै. ‘पुढारी’ने उचलून धरला. यामुळे या विषयाला गती मिळाली. न्यायालयीन कामकाजासाठी मुंबईवर अवलंबून राहावे लागत होते. कोल्हापूर खंडपीठ झाल्यानंतर जवळचा पर्याय असेल. दै. ‘पुढारी’ने भक्कम पाठिंबा दिला. याबद्दल मन:पूर्वक अभिनंदन, असे अ‍ॅड. आनंदराव भोसले (खेड) यांनी सांगितले.