Tue, Mar 26, 2019 01:41होमपेज › Kolhapur › सिगारेटच्या धुरात कोंडतोय चिमुकल्यांचा श्‍वास

सिगारेटच्या धुरात कोंडतोय चिमुकल्यांचा श्‍वास

Published On: Dec 05 2017 1:47AM | Last Updated: Dec 05 2017 12:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : पूनम देशमुख

सिगारेटच्या धुराच्या संपर्कात येणार्‍या लहान मुलांना आणि अर्भकांना अस्थमा, कानातील संसर्ग, कमी वजन अशा घातक परिणामांचा सामना करावा लागतो. वैद्यकीय परिभाषेत ‘सेकंड हॅड स्मोकिंग’ अथवा पॅसिव्ह म्हणून ओळखल्या जाणार्‍या धुम्रपानामुळे कोवळ्या जीवांवर प्रतिकूल परिणाम होत आहेत. सर्वेक्षणानुसार देशात 13 ते 15 वयोगटातील किमान 21 टक्के मुले घरातच सेकंड हॅड स्मोकिंगच्या संपर्कात येतात.

तंबाखू विरोधातील जनजागृती मोहीम सुरू असताना पॅसिव्ह स्मोकिंग म्हणजे सेकंड हॅड स्मोकिंगच्या विरोधातही तीव्र मोहीम सुरू केली आहे. तंबाखू तुमच्या मुलाला जिवंतपणीच फस्त करतो हे घोषवाक्य घेऊन राज्याच्या आरोग्य खात्याने तंबाखू व त्याच्या धुराच्या संपर्कात आल्यावर होणारे दुष्परिणाम या विरोधात मोहीम सुरू केली आहे. यामुळे लहान मुलांचे शरीर खिळखिळे करून टाकणारा अस्थमा, अतिशय वेदनादायक कानाचा संसर्ग, न्युमोनिया, नवजात अर्भकाचे वजन कमी होणे असे दुष्परिणाम दिसून  येतात.

ग्लोबल युथ टोबॅको सर्व्हे इंडियानेही याबाबत पाहणी केली, त्यानुसार 13 ते 15 वयोगटातील किमान 21 टक्के मुले घरात तर किमान 36 टक्के मुले बाहेर सेकंड हॅड स्मोकिंगच्या संपर्कात येतात. धुम्रपान करणारे लोक लहान मुलांचा जीव धोक्यात टाकतात. त्यामुळे त्यांनी व्यसनापासून दूर रहावे अशी जनजागृतीही करण्यात येत आहे. जागतिक पातळीवर पॅसिव्ह स्मोकिंगवर संशोधन सुरू आहे.त्यानुसार जगात 40 टक्के मुले या स्मोकिंगच्या संपर्कात येतात. तर 50 टक्के मुले सार्वजनिक ठिकाणी सिगारेटच्या धुराने प्रदूषित झालेली हवा नाकावाटे शरीरात घेतात.

सिगारेटमधील विघातक घटक : 

सिगारेटमध्ये तंबाखूव्यतिरिक्‍त उंदीर मारण्याचे औषध, कार्बन मोनाक्साईड, लायटरमध्ये वापरला जाणारा ब्युटेन गॅस, फरशी पुसण्यासाठी वापरले जाणारे रसायने, मेणबत्तीमधील मेण अशा घटकांचा वापर केला जातो. 

प्रतिबंधित वस्तू राजरोसपणे उपलब्ध होतात. यामुळे राज्य शासनाची बंदी कुचकामी ठरली असल्याचे निदर्शनास येते. तीस वर्षाची व्यक्‍ती दिवसाला पाच सिगारेट ओढत असेल तर 60 व्या वर्षापर्यंत सिगारेटचे व्यसन आणि त्याजोडीने येणार्‍या आजारांमुळे एका व्यक्‍तीला तब्बल 1 कोटी रुपयांचा खर्च होऊ शकतो, असा धक्‍कादायक निष्कर्ष ईटी वेल्थच्या अभ्यासातून समोर आला आहे. म्हणजेच एका सिगारेटमुळे 12 मिनिटाचे आयुष्य गमावले जाते. सिगारेटचे व्यसन असणार्‍या व्यक्‍तीच्या कुटुंबालाही या व्यसनाचे परिणाम भोगावे लागतात. विशेषत: लहान मुलांना सिगारेटच्या धुराचा फटका बसतो. 
 - डॉ. रेश्मा पवार, कॅन्सरतज्ज्ञ