Thu, Jul 18, 2019 04:12होमपेज › Kolhapur › वाढदिवस बनताहेत ‘वाददिवस’

वाढदिवस बनताहेत ‘वाददिवस’

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:20AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : गौरव डोंगरे

रात्री-अपरात्री गल्लीत फटाके उडवणे, भरचौकात डॉल्बी लावून धिंगाणा, गर्दीच्या ठिकाणी वाहने आडवी लावून दंगामस्ती करणे... अशाच प्रकारे वाढदिवस साजरे करण्याचे फॅड सध्या शहरात सुरू आहे. वाढदिवस साजरा करण्यापेक्षाही पूर्वीचा वाद उफाळून येण्याच्या घटना गेल्या आठवड्याभरात घडल्या. दसरा चौकातही सोमवारी दुपारी झालेल्या चाकूहल्ल्याने वाढदिवसाचे रूपांतर ‘वाददिवसा’त झाल्याने पोलिसांची डोकेदुखी वाढली आहे. 

सराईत गुंड, गुन्हेगारांनी वाढदिवस साजरे करण्याआधी शहरातील मुख्य चौकात पोस्टर उभारून विद्रुपीकरणाचे लोण पसरवले आहे. शनिवारी रात्री व्हीनस कॉर्नर चौकात तरुणांच्या एका टोळक्याने वाहतुकीला अडथळा निर्माण करत रस्त्यातच वाढदिवस साजरा केला. रस्त्यावर दुचाकी उभ्या करून चाललेल्या या धिंगाण्याची दखल शहर उपअधीक्षकांना घ्यावी लागली. पोलिसांनी याठिकाणी धाव घेत सहा वाहनांसह सात तरुणांना ताब्यात घेतले. कारवाईमध्ये सर्व वाहने जप्त करण्यात आली. सोमवारी सकाळी दसरा चौकात सुरू असलेल्या वाढदिवसाच्या ठिकाणी तरुणांच्या एका गटाने हल्ला केला. चाकू घेऊन दहशत निर्माण करणार्‍या या गटाने केलेल्या हल्ल्यात दोघे जखमी झाले. महाविद्यालयातील किरकोळ वादातून हा प्रकार घडल्याचे बोलले जात असले तरी पूर्ववैमनस्यातून हा प्रकार घडला. वाढदिवस साजरा करण्याच्या नावाखाली मध्यरात्री संबंधितांच्या दारात जाऊन फटाके उडविणे, कर्णकर्कश आवाजात  हॉर्न वाजविणे, उद्याने, मैदानांत धिंगाणा घालणे अशातून सर्वसामान्यांना त्रास सहन करावा लागत आहे.