Tue, Apr 23, 2019 23:33होमपेज › Kolhapur › कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रात भरा बिल

कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रात भरा बिल

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 12:26AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : सुनील सकटे 

वीज भरण्यासाठी ग्राहकांना धावाधाव करण्याची यापुढे गरज नाही. ग्रामीण असो अथवा शहरी कोणत्याही ग्राहकास जिल्ह्यात कुठल्याही वीज बिल भरणा केंद्रात वीज बिल भरता येणार आहे. महावितरण कंपनीने दिलेल्या ऑनलाईन सेवेमुळे ही सुविधा उपलब्ध झाली आहे. ही सुविधा सोमवारपासून सुरू झाली आहे. 

वीज बिल भरण्यासाठी यापूर्वी केवळ आपल्या उपविभागांतील वीज बिल भरणा केंद्रामध्येच बिल भरण्याची सोय होती. कोल्हापुरात शहरी ग्राहकांना मात्र शहरातील कोणत्याही वीज बिल भरणा केंद्रात बिल भरता येत असे. याचा फटका ग्रामीण भागातील ग्राहकांना बसत असे. एखाद्या गावातील बिल भरणा केेंद्र बंद असेल तर अथवा काही कामानिमित्त शहरात, तालुक्याच्या ठिकाणी किंवा इतर गावात गेल्यास त्याच ठिकाणच्या बिल भरणा केंद्रात आता बिल भरता येणार आहे.  महावितरण कंपनीने जिल्ह्यातील सर्व बिल भरणा केंद्रांना एकच सॉफ्टवेअर दिले आहे. या सॉफ्टवेअरमध्ये सर्व ग्राहकांची यादी असून कोणताही ग्राहक आल्यास त्याची त्या-त्या केंद्रात माहिती उपलब्ध होणार आहे. 

या सॉफ्टवेअरमुळे संबंधित बिल भरणा एजन्सीला महावितरणकडे ऑनलाईन पैसे भरावे लागणार आहेत. त्यामुळे ज्याक्षणी ग्राहक बिल भरेल त्याच क्षणीच बिल भरल्याची नोंद महावितरण कंपनीकडे होणार आहे. याचा फायदा ग्राहकांना होणार आहे. पूर्वी संबंधित एजन्सी दोन ते तीन दिवसांनी कंपनीकडे पैसे भरणार करीत असे. त्यामुळे पैसे भरूनही कंपनीकडे तो ग्राहक थकबाकीदार दिसत होता. परिणामी, महावितरण कंपनीच्या थकबाकीदार सर्वेक्षणात अशा ग्राहकांचीही नावे येत असत. पैसे भरूनही ग्राहकांचा थकबाकीसाठी विद्युतपुरवठा खंडित करण्याचे प्रकार घडले आहेत. यामुळे ग्राहक आणि वीज कर्मचार्‍यांत सातत्याने वादावादी प्रसंगी मारामारीचे प्रकार घडले आहेत. नव्या सॉफ्टवेअरमुळे अशा प्रकारांना आता पायबंद बसणार आहे.  सहकारी पतसंस्था बँका महावितरण कर्मचार्‍यांचे भरणा केंद्र अशा मिळून महावितरण कंपनीतर्फे जिल्ह्यात सातशे ते आठशे एजन्सी (बिल भरणा केंद्र) कार्यरत आहेत. तर कोल्हापूर शहरात 42 केंद्रे आहेत. शहरात एकूण एक लाख 78 वीज ग्राहक असून जिल्ह्यात तब्बल साडेसात लाख वीजग्राहक आहेत. या सुविधेमुळे ग्राहकांची चांगली सोय झाली असून कंपनीला त्याचा उपयोग होणार असल्याचे कार्यकारी अभियंता सुनील माने यांनी सांगितले.