Wed, Mar 20, 2019 12:47होमपेज › Kolhapur › कोल्हापुरातील आजवरचा सर्वात भीषण अपघात

कोल्हापुरातील आजवरचा सर्वात भीषण अपघात

Published On: Jan 28 2018 1:34AM | Last Updated: Jan 28 2018 1:26AMकोल्हापूरः प्रतिनिधी

शुक्रवारी रात्री शिवाजी पुलावर झालेल्या दुर्घटनेत 13 जणांचा बळी गेला. कोल्हापूर शहरात आजवर झालेल्या अपघातात हा सर्वाधिक बळी घेणारा भीषण अपघात ठरला.

चालकाचे नियंत्रण सुटले अन् गाडी नदीत कोसळली
एका एस.टी. बसला ओव्हरटेक करतानाच हा अपघात झाला, स्प्लेंडरवाला दुचाकीस्वार समोर आला, तर कोणी चालकाने मद्यपान केले होते, त्यातून अपघात झाला, अशा अनेक अफवांना ऊत आला होता. मात्र, हा भीषण अपघात नेमका कसा झाला, याचे चित्रण सीसीटीव्हीत कैद झाले आहे. चालकाला डुलकी लागली असावी, त्यातूनच त्याचे नियंत्रण सुटल्याचे प्रथमदर्शनी समोर येत आहे. पंचगंगा पुलावर गाडी येताच दोन वेळा गाडी उजव्या, डाव्या बाजूला हलल्याचे दिसते, यानंतर पुढे येऊन गाडीने अचानक उजव्या बाजूच्या कठड्याला जोराची धडक दिली. ही धडक इतकी जबरदस्त होती की, या धडकेत कठड्याचा सुमारे दहा फुटांचा संपूर्ण भाग तुटून खाली पडला. काही कळण्यापूर्वीच गाडी थेट पंचगंगा नदीत कोसळली. अपघात झाला तेव्हा रात्री 11 वाजून 35 मिनिटे झाल्याची नोंद सीसीटीव्हीवर झाली आहे.

चालकाच्या रक्‍ताचे नमुने घेतले
कोल्हापूरकडे येताना गाडी मार्गावर 15-20 मिनिटे थांबली होती. त्या कालावधीत चालकाने मद्यप्राशन केले असावे, अशी शक्यता व्यक्‍त करण्यात येत होती. यामुळे सीपीआरमध्ये चालकाच्या रक्‍ताचे नमुने, घेण्यात आले. त्यात त्याने मद्यप्राशन केले नसल्याचे प्राथमिकदृष्ट्या समोर येत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. मात्र, त्याचा अंतिम अहवाल आल्यानंतरच चालकाने मद्यप्राशन केले की नाही, हे स्पष्ट होणार आहे.

दुर्दैवी योगायोग
जिल्ह्यात सकाळी आणि रात्री अपघात झाले. या दोन्ही अपघातातील मृत हे पुणे जिल्ह्यातील आहेत. कोल्हापूरहून गणपतीपुळ्याला जाणार्‍या कारला अपघात होऊन, त्यातील लहान मुलांसह स्त्री-पुरुष ठार झाले. तर गणपतीपुळ्याहून कोल्हापूरकडे येणारी ट्रॅव्हलर पंचगंगा नदीत कोसळून लहान मुलांसह स्त्री-पुरुष असे 13 जण ठार झाले. कोल्हापूर-रत्नागिरी या मार्गावरच हे दोन्ही अपघात झाले.
आणखी काहींना वाचवता आले असते

अपघात झाल्यानंतर गाडी हळूहळू पाण्यात जात होती. यावेळी पाठीमागील दरवाजा उघडल्याने काहींना मदतीसाठी हाक देता आली. पाण्यात गळ्यापर्यंत बुडालेल्यांना बाहेर काढता आले. यावेळी आणखी काही जणांना बाहेर काढणे शक्य झाले असते. मात्र, त्याकरिता गाडीच्या दुसर्‍या बाजूला जाण्यासाठी बोटीची आवश्यकता होती. बोट आणखी वेळेत आली असती तरी आणखी काहींना वाचवता आले असते, अशी प्रतिक्रिया मदतकार्य करणार्‍या तरुणांनी दिली.

मोबाईलच्या उजेडात प्रारंभी मदतकार्य
घटनास्थळी पूर्ण अंधार होता. त्याकडे जाणारा मार्गही दिसत नव्हता. अशावेळी अनेक तरुण एकापाठोपाठ एक उभे राहिले. हातात मोबाईल धरून, त्यावरील बॅटरीच्या उजेडात मार्गावर प्रकाश निर्माण केला. या मोबाईलच्या उजेडात प्रारंभी मदतकार्य करण्यात आले. दरम्यान, तहसील कार्यालय, आपत्ती व्यवस्थापन कक्ष आदी ठिकाणाहून ‘आस्का लाईट’ आणण्यात आली.  यानंतर मदतकार्याला आणखी वेग आला.

अवघे दहा फूट ट्रॅव्हलर पुढे आली असती तर...
ज्या ठिकाणाहून गाडी नदीत कोसळली, त्या ठिकाणापासून अवघी आठ-दहा फूट गाडी पुढे आली असती, तर हा भीषण अपघात टळला असता. आठ-दहा फुटाच्या अंतरानंतर पूल संपतो. या ठिकाणी मोठे उंच खडक असल्याने गाडी जरी धडकली असती, तरी ती धडकून पुन्हा रस्त्यावरच आली असती. याचीही घटनास्थळी चर्चा सुरू होती.

कुटुंब एकत्र आले आणि काळाने घाला घातला
भरत केदारी आणि त्यांचे कुटुंबीय वारकरी संपद्रायातील. कामशेत, खुजगाव येथे असलेली शेती, हाच कुटुंबाचा मुख्य व्यवसाय. मोठा मुलगा दिलीप पीएमटीमध्ये सुरक्षारक्षक म्हणून, तर लहान मुलगा सचिन खासगी वाहनावर चालक म्हणून काम करत होता. मुलगी छाया नांगरे शिक्षिका होती, तर दुसरी मुलगी मनीषा वरखेडे खासगी कंपनीत नोकरी करत होती. सचिनला सात वर्षांनी मुलगा झाला. त्यासाठी बोललेले नवस फेडायचे, तसेच सुट्ट्या असल्याने भाऊ-बहीण असे सर्व कुटुंब एकत्र आले आणि काळाने त्यावर घाला घातला.

अन् दिलीप केदारी सुन्‍न झाले
अपघात झाल्याची माहिती मिळाल्यानंतर भरत केदारी आणि त्यांचा मुलगा दिलीप पुण्याहून सीपीआरमध्ये आले. आपला भाऊ, त्याचे सर्व कुटुंब, आपली पत्नी व दोन्ही मुले अपघातात गेल्याचे तसेच बहीण, भावोजी, भाचे-भाचाही मृत झाल्याचे कळताच दिलीप केदारी अक्षरश: सुन्‍न झाले. काही काळ ते कोणाशीही न बोलताना सुन्‍नपणे बसून होते.
 
24 तासांत 20 ठार
जिल्ह्यासाठी शुक्रवार ‘घात’वार ठरला. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 20 ठार झाले. कोल्हापूर-रत्नागिरी मार्गावर सकाळी 11 वाजता झालेल्या अपघातात पुणे जिल्ह्यातील सहा जण ठार झाले. यानंतर रात्री 11.30 वाजता शिवाजी पुलावरून ट्रॅव्हलर कोसळून पुण्यातीलच 13 जण ठार झाले. तर मुंबईहून बेळगावला संशयित आरोपींना घेऊन जाणार्‍या पोलिसांच्या खासगी वाहनाला अपघात झाला. त्यात वाहनचालक जागीच ठार झाला.