Thu, Jul 18, 2019 04:26होमपेज › Kolhapur › ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने

ठिकठिकाणी रास्ता रोको, निदर्शने

Published On: Jan 03 2018 1:12AM | Last Updated: Jan 03 2018 12:33AM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

भीमा कोरेगाव येथे झालेल्या घटनेचे शहरासह जिल्ह्यात मंगळवारी पडसाद उमटले. आंबेडकरी समाज, पक्ष, संघटनांच्या कार्यकर्त्यांनी बिंदू चौक, दसरा चौक, ताराराणी चौक, विचारेमाळ येथे रास्ता रोको व निदर्शने केली. शिवाजी रोडवरील दगडफेकीच्या तुरळक घटनेमुळे तणाव निर्माण झाला. आंबेडकरी समाज व सर्वच संघटनांच्या वतीने बुधवारी शहर, जिल्ह्यात बंद पाळण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला.

बिंदू चौकात मोठ्या संख्येने एकत्रित आलेल्या कार्यकर्त्यांनी घोषणा देत ‘कोल्हापूर बंद’चा इशारा दिला. प्रमुख मार्गावर रॅली काढून सर्व व्यवहार बंदचा निर्धार केला. खबरदारीसाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा पाचारण करण्यात आला.

पोलिस उपअधीक्षक डॉ. प्रशांत अमृतकर, पोलिस निरीक्षक तानाजी सावंत, अनिल गुजर, अशोक धुमाळ यांनी आंदोलकांची समजूत घालून तणाव निवळण्याचा प्रयत्न केला. मात्र, कार्यकर्ते आक्रमक झाले होते. पोलिस अधिकार्‍यांसमोरच त्यांनी बिंदू चौकात टायर पेटवून रास्ता रोको सुरू केला. तीन तासांहून अधिककाळ बिंदू चौक परिसरातील वाहतूक विस्कळीत झाली होती.

रिपब्लिकन पार्टीचे पश्‍चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रा. शहाजी कांबळे, जिल्हाध्यक्ष उत्तम कांबळे व अन्य पदाधिकार्‍यांनी बिंदू चौकाकडे धाव घेतली.  संतप्त कार्यकर्त्यांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. तथापि, कार्यकर्ते ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हते. शहर, जिल्हा बंद अथवा अन्य कोणती कृती घाईघाईने न करता टाऊन हॉल उद्यानामध्ये एकत्रित बैठक घेण्यावर सर्वांचे एकमत झाले. प्रमुख नेत्यांसह कार्यकर्ते घोषणा देत शिवाजी रोडवरून जात असताना भारतीय कम्युनिस्ट पक्ष कार्यालयासमोरील दोन दुकानांसह दोन मोपेडवर दगडफेक झाली. त्यामुळे तणावात आणखी भर पडली. पोलिस अधिकार्‍यांनी कार्यकर्त्यांना समज देऊन परिस्थिती नियंत्रणाखाली आणली.

कार्यकर्त्यांच्या घोषणाबाजीमुळे बिंदू चौक, शिवाजी रोड, भाऊसिंगजी रोड, महापालिका कोपरा, सीपीआर चौक येथील व्यापार्‍यांनी सर्व व्यवहार बंद ठेवले. टाऊन हॉल उद्यानात आंबेडकरी पक्ष व सर्वच संघटनांच्या प्रमुखांची सायंकाळी व्यापक बैठक झाली. त्यात भीमा कोरेगाव येथील घटनेच्या निषेधार्थ बुधवारी शहरासह जिल्ह्यात कडकडीत बंद पाळण्याचा निर्णय जाहीर करण्यात आला. बंदमधून अत्यावश्यक सेवा वगळण्यात येत आहेत, असेही पदाधिकार्‍यांनी स्पष्ट केले. आंबेडकरवादी समाज, सर्वच संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला बुधवारी सकाळी नऊ वाजता बिंदू चौकात जमा होतील, त्यानंतर शहरातील प्रमुख मार्गावरून मोर्चा काढण्यात येईल, दुपारी दसरा चौकात समारोप होईल, असेही जाहीर करण्यात आले. यावेळी बुधवारच्या बंदला मुस्लिम सेनेच्या वतीने पाठिंबा देण्यात आल्याचे जाहीर करण्यात आले.

टाऊन हॉल उद्यानात झालेल्या संयुक्त बैठकीत प्रा. शहाजी कांबळे, उत्तम कांबळे, डी. जी. भास्कर, प्रा. विश्‍वास देशमुख, विद्याधर कांबळे, प्रा. डॉ. अनिल माने, सोमनाथ घोडेराव, नंदकुमार गोंधळी,  सुशील कोल्हटकर, सुरेश सावर्डेकर, भाऊसाहेब काळे, गुणवंत नागटिळे, राहुल कांबळे, जितेंद्र कांबळे, दिगंबर सकट, प्रिया कांबळे, रमेश पाचगावकर, अब्बास शेख, समीर पटेल, आदम मुजावर, मन्वत पटेल, प्रदीप मस्के, अंकुश वराळे, राजेंद्र ठिकपुर्लीकर, विनोद सडोलीकर, लखन कांबळे, अविनाश शिंदे, दत्ता मिसाळ, अनिल म्हमाणे, सतीशचंद्र कांबळे, सतीश माळगे, सुखदेव बुद्धीहाळकर, बी. के. कांबळे, प्रकाश सातपुते, राजू वसगडेकर, जयसिंग पाडळीकर आदींनी भाग घेतला.

संभाजी भिडे, मिलिंद एकबोटेंवर गुन्हा दाखल करा : कार्यकर्त्यांची मागणी

शिवप्रतिष्ठानचे संस्थापक संभाजी भिडे (गुरुजी), हिंदुत्ववादी कार्यकर्ते मिलिंद एकबोटे यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांच्या तत्काळ अटकेचीही मागणी कार्यकर्त्यांनी यावेळी केली.

संयमामुळे अनुचित प्रकार टळला!

संतप्त कार्यकर्त्यांच्या रोषाला रिपब्लिकन चळवळीतील विविध संघटनांच्या नेत्यांनाही सामोरे जावे लागले होते. काही कार्यकर्ते अगदीच आक्रमक झाले होते. खबरदारीचा उपाय म्हणून पोलिसांनी अग्निशमन दलाचे बंबही पाचारण केले होते. शासकीय यंत्रणेसह पोलिस अधिकार्‍यांना उद्देशून घोषणाबाजी झाली. पोलिस अधिकारी सावंत, धुमाळ, गुजर आदींनी संयम पाळून परिस्थितीवर नियंत्रण ठेवल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही.

दसरा चौकात अर्धा तास

वाहतूक खोळंबली

दसरा चौकात दुपारी बाराच्या सुमारास पीपल्स रिपब्लिकन पार्टीच्या वतीने रास्ता रोको करण्यात आला. व्हीनस कॉर्नरकडून दसरा चौकाकडे येणारी वाहतूक काही काळ विस्कळीत झाली. आंदोलकांनी मुख्य रस्त्यावरच ठिय्या मारला. यानंतर जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. याचवेळी दसरा चौकातून पुढे जाणारी वाहतूक अन्य मार्गाने वळविण्यात आली.

यावेळी डी. जी. भास्कर, नंदकुमार गोंधळी, विद्याधर कांबळे, सोमनाथ घोडेराव, सुरेश सावर्डेकर, रमेश पाचगावकर, अब्बास शेख, निवास सडोलीकर, आर. बी. कोसंबी, रतन कांबळे, शैलेंद्र कांबळे, संदीप जिरगे, सिद्धार्थ माने, संतोष कांबळे, तानाजी कांबळे आदी उपस्थित होते.

ताराराणी चौकात रास्ता रोको

मंगळवारी सकाळी अकराच्या सुमारास विचारेमाळ परिसरातील तरुणांनी ताराराणी चौकात रास्ता रोको केला. अर्ध्या तासाहून अधिक वेळ हे आंदोलक रस्त्यावर थांबून होते. राष्ट्रीय महामार्गावरून शहरात येणारी वाहतूक रोखण्यात आल्याने मार्केट यार्डपर्यंत वाहनांची रांग लागली होती. शहर वाहतूक शाखेच्या पोलिसांनी शहराबाहेर जाणारी वाहतूक पर्यायी मार्गाने वळविली. या ठिकाणीही घोषणाबाजी करण्यात आली.