Fri, Apr 26, 2019 03:57होमपेज › Kolhapur › सगळयाच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर : राजू शेट्टी (व्हिडिओ) 

सगळयाच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर : राजू शेट्टी (व्हिडिओ) 

Published On: Dec 04 2017 8:48PM | Last Updated: Dec 04 2017 8:57PM

बुकमार्क करा

कोल्हापूर : प्रतिनिधी

देशातील 184 शेतकरी संघटनांचा दबाव गट तयार केला असून, त्यांना विचारुन पुढील निर्णय घेतला जाईल. सध्यातरी सर्वच राजकीय पक्षांपासून समान अंतरावर राहण्याची आपण भूमिका घेतली असल्याचे स्पष्टीकरण खा. राजू शेट्टी यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खा. अशोक चव्हाण यांच्या भेटीच्या पार्श्‍वभूमीवर दिले. 

खा. शेट्टी म्हणाले, शेतीची उत्पादकता कमी होऊ लागली आहे. यासाठी भरीव उपायोजना करणे गरजेचे आहे. शेतकर्‍यांना हमीभाव न मिळाल्याने शेती तोट्यात गेली आहे. अनेक राज्य सरकार कर्जमाफीसाठी पुढे सरसावली आहेत. महाराष्ट्र सरकारची ताकद अपुरी पडत असून, यात केंद्र सरकारने हिस्सा उचलण्याची आवश्यकता आहे. कर्जमाफी झालेल्या शेतकर्‍यांना राष्ट्रीयकृत बँका पुन्हा कर्ज देत नाहीत त्यांच्यादृष्टीने ते थकबाकीदारच आहेत. अशा परिस्थितीत शेतकरी कसा सक्षम होणार? त्यांना पतपुरवठा झाला पाहिजे. शेतकर्‍यांचा सातबारा कोरा करणे हे उद्दिष्ट डोळ्यासमोर ठेवले असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले. 

ते म्हणाले, शेतमालावर प्रक्रिया करणार्‍या उद्योगांना चालना मिळाली पाहिजे. मेगा फूड पार्क ऐवजी 10 ते 15 एकरातील मिनी पार्क उभारणे गरजेचे आहे. क्लस्टरला शासनाने भरीव निधी देऊन विकसीत करण्याची धोरण अवलंबिले पाहिजे. राज्यात अनेक शेतकर्‍यांच्या प्रोडयुसर कंपनी आज उभ्या राहत आहेत. सहकाराप्रमाणे शेतकर्‍यांच्या प्रोडयुसर कंपन्यांना आयकरात सूट दिली पाहिजे. दिल्लीत झालेल्या देशव्यापी शेतकरी आंदोलनाला पंतप्रधानांनी प्रतिसाद दिला नाही. कोणत्याही मंत्र्यांनी लक्ष दिले नाही व अधिकार्‍यांनी दखल घेतले नाही हे दुर्देव आहे. 22 राज्यातील दोन लाख शेतकर्‍यांना केंद्र सरकारने अशा प्रकारची वागणूक दिल्याने शेतकरी दुखावले आहेत. आंदोलनामुळे त्यांच्यात नवा आत्मविश्‍वास निर्माण झाला आहे. ही सुरुवात आहे, संपूर्ण देश ढवळून काढणार असून, राज्यकर्त्यांना सोडणार नसल्याचा इशारा खा. शेट्टी यांनी दिला. 

गुजरातमध्ये भाजपचा पराभव व्हावा अशी इच्छा...

कर्जमुक्तीच्या बहाण्याने भाजपने शेतकर्‍यांना फसविले आहे. त्यामुळे आम्ही दुखावलो गेलो आहोत. त्यामुळे गुजरातच्या जनतेचे त्यांना चांगलाच धडा शिकवावा. गुजरात विधानसभा निवडणूकीत भाजपचा दारुण पराभव व्हावा, अशी इच्छा आहे. असे वक्तव्य स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खा. राजू शेट्टी यांनी कोल्हापुरात एका कार्यक्रमादरम्यान केले.