Mon, Jul 22, 2019 01:13होमपेज › Kolhapur › जवान अनंत धुरी यांना साश्रुनयनांनी निरोप

जवान अनंत धुरी यांना साश्रुनयनांनी निरोप

Published On: Jan 21 2018 2:47AM | Last Updated: Jan 21 2018 2:05AMचंदगड : प्रतिनिधी

‘अमर रहे, अमर रहे’ ‘अनंत धुरी अमर रहे’, ‘वीर जवान तुझे सलाम’अशा गगनभेदी घोषणांनी बेळेभाट येथील जवान अनंत जानबा धुरी (वय 38) यांना शनिवारी साश्रूनयनांनी निरोप देण्यात आला. मराठा लाईट इन्फंट्रीच्या विशेष पथकाने बंदुकीच्या हवेत फैरी झाडून अखेरची मानवंदना दिली. आठ वर्षांची मुलगी ॠतुजा हिने पार्थिवाला भडाग्नी दिला. अनंत धुरी यांच्या पार्थिवाचे  दर्शन घेण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यासह सीमा भागातील नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती. पार्थिव त्यांच्या निवासस्थानी आल्यानंतर आई अनुसया, वडील जानबा, भाऊ अंकुश व परशराम, पत्नी मनीषा, मुली ॠतुजा व श्‍वेता यांनी केलेला आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता. 

श्रीनगर येथील गुलमर्ग येथे सेवा बजावत गुरुवारी पहाटे पाच वाजता त्यांचा बर्फात गुदमरून मृत्यू झाला होता. आज संपूर्ण चंदगड तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आला. तालुक्यातील सर्वच रस्त्यांवर शुकशुकाट होता. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी बेळगाव येथे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन पुष्पचक्र अर्पण करून आदरांजली वाहिली. शवपेटी समवेत कर्नल कावेरियाप्पा, राजेंद्र निट्टूरकर, जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी विलासराव घाटगे, सैनिक कल्याण विभाग पुणेचे दीपक शेळके व विष्णू बडे, ब्रिगेडियर कमांडंट मराठा एलआयआरसी प्रवीण शिंदे, डेप्युटी कमांडंट मराठा एलआयआरसी एस. के. बरूआ, कर्नल जॉनी जोसेफ आले होते. गावातील घरासमोर रांगोळ्या रेखाटल्या होत्या. तसेच पताका व तिरंगी ध्वज लावले होते. पुष्पहारांनी सजवलेल्या सैन्य दलाच्या वाहनातून अंत्ययात्रा काढली. यावेळी आ. संध्यादेवी कुपेकर, आ. अमल महाडिक, भरमूअण्णा पाटील, गोपाळराव पाटील, राजेश पाटील, संग्रामसिंह कुपेकर, प्रा. सुनील शिंत्रे, नितीन पाटील, जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार, पोलिस अधीक्षक संजय मोहिते, उपविभागीय पोलिस अधिकारी आर. आर. पाटील, प्रांताधिकारी संगीता चौगुले-राजापूरकर, तहसीलदार शिवाजीराव शिंदे आदी उपस्थित होते.