Tue, Jun 02, 2020 19:43होमपेज › Kolhapur › जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

जिल्ह्यात अनेक ठिकाणी पावसाची जोरदार हजेरी

Published On: May 16 2018 1:38AM | Last Updated: May 16 2018 1:28AMकोल्हापूर : प्रतिनिधी

दिवसभराच्या उकाड्यानंतर मंगळवारी रात्री पावसाने शहरासह जिल्ह्याच्या काही भागाला झोडपले. शहरात काही ठिकाणी सुमारे पंधरा ते वीस मिनिटे जोरदार पाऊस झाला. काही भागात मात्र जोरदार वारे वाहत राहिल्याने हवेत रात्री चांगलाच गारवा निर्माण झाला होता.

जयसिंगपूर : जयसिंगपूर व परिसरात मंगळवारी रात्री पावणेआठ वाजता विजांचा कडकडाट व ढगांच्या गडगडाटासह पावसाने हजेरी लावली. सव्वा आठनंतर पावसाचा जोर वाढला. त्यामुळे सखल भागात पाणी साचले होते. 

आंबा, काजूचे नुकसान
चंदगड :  वादळी वारा आणि मेघ गर्जनेसह चंदगडला मंगळवारी जोरदार पाऊस झाला. वादळी वार्‍याने बागिलगे येथे शेकडो वर्षांची साक्ष देणारा आणि गावकर्‍यांना सावली देणारा महादेव देवालयनजीकचा महाकाय पिंपळ वृक्ष कोसळला. वादळी वार्‍याने आंबा, काजू  गळून मोठे नुकसान झाले.  

इचलकरंजीला झोडपले 
इचलकरंजी शहर व परिसराला मंगळवारी वळीव पावसाने झोडपून काढले. यावेळी गारांचाही वर्षाव झाला. सर्वाधिक धावपळ मंगळवारच्या आठवडा बाजारात उडाली. विक्रेते व ग्राहकांची मोठी तारांबळ उडाली. पावसाने भाजीपाल्याचे नुकसान झाले.   

यड्रावला पुन्हा वादळाचा तडाखा 
यड्राव :  यड्रावसह परिसराला मंगळवारी रात्री 8 च्या सुमारास पुन्हा एकदा वळीव पावसाने झोडपून काढले. यावेळी मोठ्या प्रमाणात गारांचा वर्षाव झाला. सखल भागात प्रचंड पाणी साचले होते.