Sat, May 25, 2019 23:11होमपेज › Kolhapur › वाहनांच्या गर्दीत आजही अडकली अ‍ॅम्ब्युलन्स

वाहनांच्या गर्दीत आजही अडकली अ‍ॅम्ब्युलन्स

Published On: May 12 2018 1:28AM | Last Updated: May 12 2018 1:28AM
कोल्हापूर : विजय पाटील 

क्षणभराचा उशीर झाला तर कुणाचा जीव जाऊ शकतो आणि थोडंसं लवकर पोहोचलं, तर लाखमोलाचा जीव वाचू शकतो. त्यामुळे सायरन वाजत येणार्‍या अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून द्यायला हवी; परंतु शुक्रवारी दुपारी सायरन वाजवत रुग्णालयात पेशंटला घेऊन जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स पुन्हा वाहनांच्या गर्दीत अडकली. बर्‍याच वेळानंतर अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मिळाली व ती भुर्रकन हॉस्पिटलच्या दिशेने गेली. 

कोल्हापुरातील रंकाळा रोडवरील वाहनांच्या कोंडीमुळे एक अ‍ॅम्ब्युलन्स गर्दीत अडकली. कोंडीमुळे अ‍ॅम्ब्युलन्सला दवाखान्यात पोहोचण्यास उशीर झाला. या विलंबामुळे अ‍ॅम्ब्युलन्समधील तीन वर्षांच्या चिमुकल्याला प्राण गमवावे लागले. हॉस्पिटलच्या दारातच ‘सोनू’ नावाच्या या बालकाने त्याच्या वडिलांच्या मांडीवरच मान टाकली. ही अत्यंत दुर्दैवी आणि हृदयद्रावक घटना नुकतीच घडून गेली; पण या निमित्ताने अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याचा प्रश्‍न ऐरणीवर आला. कारण, अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणारा रुग्ण हा कोणाचा तरी कणखर बाप असू शकतो. कुणाची तरी कनवाळू माय असू शकते. असू शकते कोणा माता-पित्याला जीव लावणारी गोड छकुली किंवा खोडकर पिंट्या.  याहीपेक्षा जीवनाशी संघर्ष करणारा कोणीही ‘माणूस’ उपचारासाठी असू शकतो यामध्ये. शेवटी माणूस महत्त्वाचा.

त्याचे आयुष्य तर अनमोल. लाखमोलाचं. 
शुक्रवारी दुपारी एकच्या सुमारास भाऊसिंगजी रोडवर पुन्हा सायरन वाजवत हॉस्पिटलकडे जाणारी अ‍ॅम्ब्युलन्स वाहनांच्या गर्दीत अडकली. सायरन वाजत असतानाही काही वेळ अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मिळत नव्हती. सीपीआरसमोरच हा प्रकार दिसून आला.  अ‍ॅम्ब्युलन्समध्ये असणार्‍या पेशंटच्या जीवन-मरणाशी संघर्ष सुरू असताना वाहतूक कोंडीमुळे विलंब होणे म्हणजे विनाकारण एखाद्याचा जीव घालवण्यासारखे आहे. त्यामुळे काहीही झाले तरी सायरन वाजवत पाठीमागून येणार्‍या किंवा समोरून आलेल्या अ‍ॅम्ब्युलन्सला वाट मोकळी करून देण्याची जबाबदारी सगळ्यांची आहे. ही जबाबदारी जशी वाहनधारकांची आहे. तशीच पादचार्‍यांची आहे. त्या पटीतच रस्त्यावर टवाळक्या पीटत घोळके करून वाट अडवणार्‍यांचीसुद्धा आहे. 

‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या’ जनचळवळ
‘आधी अ‍ॅम्ब्युलन्सला वाट द्या, असे आवाहन करणारी लोकचळवळ शुक्रवारपासून शहरात विविध संघटनांच्या वतीने सुरू झाली. ही जनजागृती शहरासह आता तालुक्याच्या ठिकाणी आणि महामार्गांपर्यंत केली जाणार आहे. यासाठी अनेक संस्था, संघटनांनी उत्स्फूर्त पुढाकार घेतला आहे. ग्रामीण भागातही याबाबतचे मार्गदर्शन मेळाव्यांचे आयोजन करण्यात आले आहे. कोल्हापुरातून सुरू झालेल्या या चळवळीचे लोण आता इतर जिल्ह्यांतही वेगाने पसरत आहे. त्यामुळे आता सर्वांनीच याबाबत गांभीर्याने दक्ष राहून वाहतूक नियमांचे पालन करण्याची गरज आहे.