होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरातील निर्माल्यापासून सुगंधी द्रव्ये

अंबाबाई मंदिरातील निर्माल्यापासून सुगंधी द्रव्ये

Published On: Jun 22 2018 2:08AM | Last Updated: Jun 22 2018 1:55AMकोल्हापूर : अनिल देशमुख

करवीरनिवासिनी श्री अंबाबाई चरणी अर्पण केली जाणारी फुले, हार, वेण्या आता वाया जाणार नाहीत. अशा निर्माल्यापासून सुगंधी द्रव्ये, वस्तू तयार करण्याचा राज्य शासनाचा विचार आहे. कोल्हापूरच्या अंबाबाईसह राज्यातील मुंबईतील सिद्धीविनायक संस्थान, शिर्डीतील साईबाबा संस्थान व तुळजापूरचे तुळजा भवानी मंदिर या चार मंदिरात प्रकल्प राबविण्यात येणार आहे. यातून परिसरातील महिलांना रोजगार उपलब्ध करून दिला जाणार आहे. या सर्व उपक्रमासाठी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांना राज्यस्तरीय नोडल अधिकारी म्हणून नियुक्त करण्यात आले आहे.

राज्यातील अनेक मोठ्या मंदिरात मोठ्या प्रमाणात निर्माल्य जमा होत असते. दररोज जमा होणार्‍या या निर्माल्याचे काय करायचे, हा प्रश्‍न व्यवस्थापनासमोर नेहमीच असतो. आता मात्र या प्रश्‍नावर उत्तर शोधले आहे. जमा होणार्‍या निर्माल्याची योग्यप्रकारे विल्हेवाट लावण्याबरोबर त्यातून रोजगार निर्मिती करण्याचा विचार सुरू आहे. उत्तर प्रदेशात वृंदावन मंदिरात फुलांच्या निर्माल्यापासून सुगंधी द्रव्ये, जल, गुलाल, धूपबत्ती, अगरबत्ती अशी पर्यावरणपूरक उत्पादने बनवण्यासाठी पुढाकार घेतला आहे. सर्वोच्च न्यायालयानेही याबाबत आदेश दिले आहेत. राष्ट्रीय महिला आयोगानेही याबाबत काय करू शकता, अशी विचारणा राज्य शासनाला केली आहे.

सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार राज्यातील मंदिरात असे प्रयोग करणे शक्य आहे का, याबाबत राज्य सरकारने पडताळणी सुरू केली आहे.

ज्या मंदिरात मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी येतात, त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात फुले अर्पण केली जातात. त्या मंदिरातील फुलांच्या निर्माल्याचा पुनर्वापर करण्यात येईल. त्यातून सुगंधी द्रव्ये, धूपबत्ती, अगरबत्ती, गुलाल आदी पर्यावरणपूरक उत्पादने बनवता येतील, हे काम मंदिर परिसरातील महिलांना देता येईल, त्यासाठी त्यांना प्रशिक्षित करता येईल, यादृष्टीने राज्य शासनाने प्रयत्न सुरू केले आहेत. महिला आर्थिक विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांची समन्वय अधिकारी म्हणून याकरिता नियुक्ती करण्यात आली आहे. या उपक्रमासाठी राज्यातील चार देवस्थानांची निवड करण्यात आली आहे. या मंदिरात दररोज फुलांचे निर्माल्य किती जमा होते, त्याची विल्हेवाट कशी लावली जाते, निर्माल्यावर प्रक्रिया करणारा कोणता प्रकल्प कार्यान्वित आहे का, तसा कोणता प्रकल्प सुरू करण्याचा देवस्थानचा विचार आहे का? याबाबत समन्वय अधिकारी प्रत्यक्ष भेट देऊन सर्वेक्षण करणार आहे. यानंतर याबाबत अहवाल राज्य शासनाला सादर केल्यानंतर असा प्रकल्प सुरू करण्याबाबत राज्य शासन अंतिम निर्णय घेणार आहे.