होमपेज › Kolhapur › पुजार्‍यांच्या मुलाखती हे मोठे षड्यंत्र : कृती समिती

पुजार्‍यांच्या मुलाखती हे मोठे षड्यंत्र : कृती समिती

Published On: Jun 20 2018 1:33AM | Last Updated: Jun 20 2018 1:12AMकोल्हापूर : प्रतिनिधी

राज्य शासनाचे कोणतेही आदेश नसताना पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती अंबाबाई मंदिरासाठी पगारी पुजारी कसे नियुक्‍त करू शकते, त्यांना अधिकारच काय, असा सवाल करत पुजार्‍यांच्या मुलाखती घेणे, त्यांना नियुक्‍त करणे हा सर्वच प्रकार बेकायदेशीर आहे. अशा नियुक्त्या करून नंतर त्याबाबत न्यायालयीन वाद निर्माण करण्याचाच घाट घातला जात असून हे मोठे षड्यंत्र असल्याचा आरोप श्री करवीर निवासिनी अंबाबाई पुजारी हटाव कृती समितीच्या वतीने मंगळवारी पत्रकार परिषदेत करण्यात आला.

कृती समितीचे डॉ. सुभाष देसाई, दिलीप देसाई, सचिन तोडकर व डॉ.जयश्री चव्हाण यांनी आज पत्रकार परिषदेत घेत बेकायदेशीर कृत्य करणारी पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समितीच बरखास्त करा, अशी मागणी यावेळी करण्यात आली. याप्रकरणी पावसाळी अधिवेशनात हक्‍कभंग ठराव दाखल करावा म्हणून सर्व आमदारांना निवेदने देण्यात येणार असून प्रसंगी न्यायालयातही जाण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

अंबाबाई मंदिरासाठी स्वतंत्र कायदा झाला. त्यावर राज्यपालांची स्वाक्षरी झाली आहे. या कायद्यानुसार नवी विश्‍वस्त व्यवस्था निर्माण होणे गरजेचे आहे. यानंतर या व्यवस्थेद्वारे पुढील कार्यवाही होणे अपेक्षित असताना देवस्थान समितीने परस्परच पुजारी नेमण्यासाठी मुलाखतीचे आयोजन केेले आहे. याबाबत विचारणा केली तर या मुलाखती तात्पुरत्या स्वरूपातील असल्याचा खुलासा केला जात आहे. मुलाखती तात्पुरत्या असल्या, तरी असे पुजारी नेमण्याचा देवस्थानला कोणी अधिकार दिला? त्याबाबत राज्य शासनाने काही आदेश दिले असतील तर ते देवस्थान समितीने दाखवावेत, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

पश्‍चिम महाराष्ट्र देवस्थान समिती स्वत:कडील मंदिरासाठी पुजारी नेमणार असेल, तर आमचे काहीच म्हणणे नाही, असे सांगत अंबाबाई मंदिरात देवस्थानचे चार पगारी पुजारी आहेतच. नवीन पुजारी येईपर्यंत ते देवीची पूजा करतील. तात्पुरते नवे पुजारी नेमण्याचा उद्देश काय, असा सवाल यावेळी करण्यात आला. पुजारी नेमण्यासाठी कोणतेही आदेश नाहीत, निवड समिती कशी असावी, त्यात कोणाची नेमणूक करावी, त्याबाबतचेही आदेश नाहीत, निवड समिती सदस्यांनाही तसे आदेश नाहीत. शंकराचार्य पीठातील प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे पत्र देण्यात आले आहे. शिवाजी विद्यापीठाच्या विश्रामगृहात मुलाखती घेतल्या जात आहेत, हा सर्वच प्रकार संशयास्पद तर आहेच; पण त्याबरोबर बेकायदेशीर आहे. तोंडी आदेश दिल्याचे काही जण सांगत आहेत, मग सरकार तोंडी आदेशावर चालणार का हे स्पष्ट करावे, अशी मागणीही यावेळी करण्यात आली.

आम्हाला भीती वाटते

मुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्यावर आमचा विश्‍वास होता. यामुळे आम्ही वारंवार त्यांच्याशी पत्रव्यवहार करत होतो. पण, कोणत्याही पत्राला उत्तर मिळालेले नाही. कोठे तरी कार्यक्रमातील वक्‍तव्ये ऐकायला मिळतात, आम्हाला भीती वाटते, असा खोचक टोलाही यावेळी कृती समितीने लगावला.

अध्यक्षांना कायद्याचे ज्ञान हवे

पुजारी नियुक्‍तीची माहिती मिळाल्यानंतर देवस्थानचे अध्यक्ष दररोज वेगळे वक्‍तव्य करत आहेत. आम्हाला तोंडी आदेश आहेत, बैठकीचे इतिवृत्त गोपनीय आहे असे सांगणारे अध्यक्ष नंतर या निवडी तात्पुरत्या आहेत, असे आता सांगू लागले आहेत. अचानक पुजारी काढले तर पूजा कोण करणार म्हणून आम्ही हे करत आहोत, असेही सांगत आहेत. मुळात देवस्थानचा अध्यक्ष हा वकील असावा, असा नियम आहे. यामुळे विद्यमान अध्यक्षांना किमान कायद्याचे तरी ज्ञान हवे, असा टोला यावेळी कृती समितीने लगावला.