Sun, Mar 24, 2019 23:37
    ब्रेकिंग    होमपेज › Kolhapur › अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी; मार्चपूर्वी अध्यादेश?

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी; मार्चपूर्वी अध्यादेश?

Published On: Jan 15 2018 7:54PM | Last Updated: Jan 15 2018 7:54PM

बुकमार्क करा
कोल्हापूर : प्रतिनिधी

श्री अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमण्याबाबत मार्चपूर्वी अध्यादेश काढू, अशी ग्वाही पालकमंत्री आणि महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोमवारी दिली. अंबाबाई मंदिरामध्ये पगारी पुजारी नेमावेत, या मागणीसंदर्भात सोमवारी सर्किट हाऊस येथे पालकमंत्री पाटील आणि अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती यांच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी ज्येष्ठ नेते एन. डी.पाटील, आ. राजेश क्षीरसागर उपस्थित होते.

पालकमंत्री म्हणाले, अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी या एकाच मुद्द्याने कायदा करणे शक्य नाही. तर त्या कायद्यामध्ये देवस्थानशी संलग्‍न जमिनी, देवस्थानांचे उत्पन्‍न, पुजार्‍यांचा पगार या सर्वांचाच विचार होणे आश्यक आहे. देवस्थान समितीकडे 3 हजार 200 मंदिरे आहेत. त्यातील सगळ्या पुजार्‍यांचा पगार देवस्थानला द्यावा लागेल. त्याचबरोबर देवस्थानकडे जवळपास 47 हजार एकर जमीन आहे. त्यासाठीही वेगळा कायदा करावा लागले. या कायद्याबाबतचा अहवाल विधी न्याय खात्याकडे असून, येत्या दोन दिवसांमध्ये या खात्याच्या सचिवांशी याबाबत चर्चा करू. प्रसंगी मार्चपूर्वी पगारी पुजारी कायद्याबाबत अध्यादेश काढण्याचीही शासनाची तयारी आहे.

अंबाबाई मंदिरात पगारी पुजारी नेमताना त्यांचा पगार, त्याबाबतचे नियम, सर्व्हिस कंडिशन, निवृत्तीनंतरची नियमावली याचाही अभ्यास कायदा करण्यापूर्वी करावा लागणार आहे. विधी व न्याय विभागाच्या सचिवांशी चर्चा करून येत्या उन्हाळी अधिवेशनापूर्वी अंबाबाई मंदिर पगारी पुजारीविषयी अध्यादेश काढण्याची कार्यवाही करावी अशी विनंती करू, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीदरम्यान अंबाबाई मंदिर पुजारी हटाव संघर्ष समिती सदस्यांनी केवळ अंबाबाई मंदिर, जोतिबा मंदिरासाठी वेगळा कायदा करावा, अशी मागणी पालकमंत्री पाटील यांच्याकडे केली होती. या बैठकीला देवस्थान समिती अध्यक्ष महेश जाधव, संजय पवार, आर, के. पोवार, दिलीप पाटील, आनंद माने, माजी आमदार सुरेश साळोखे, आर. के. पोवार, वसंतराव मुळीक, इंद्रजित सावंत, अ‍ॅड. चारुलता चव्हाण, दीपा पाटील, बाबा पार्टे, स्वप्निल पार्टे, भाजपचे संदीप देसाई यांच्यासह भक्‍त समिती सदस्य उपस्थित होते.