होमपेज › Kolhapur › तामगावसाठी पर्यायी रस्ता देणार

तामगावसाठी पर्यायी रस्ता देणार

Published On: Jun 09 2018 1:34AM | Last Updated: Jun 09 2018 12:53AMकोल्हापूर : प्रतिनिधी

उजळाईवाडी-तामगाव या मार्गाचा काही भाग विमानतळ विस्तारीकरणात संपादित केला आहे. विस्तारीकरणामुळे विमानतळ हद्दीतील हा रस्ता बंद होणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय होऊ नये याकरिता पर्यायी रस्ता देण्याचा निर्णय शुक्रवारी विमानतळ सल्लागार समितीच्या बैठकीत झाला. खा. धनंजय महाडिक व खा. राजू शेट्टी यांच्या उपस्थितीत विमानतळावर समितीची पहिली बैठक झाली. विमानतळाचा नियोनबद्ध विकासासाठी विविध विषयांवर या बैठकीत चर्चा करण्यात आली.

विमानतळ विस्तारीकरणासाठी 274 कोटी रुपयांचा आराखडा मंजूर झाला आहे. यापैकी 30 टक्के रक्कम राज्य शासनाने भारतीय विमानतळ प्राधिकरणाकडे वर्ग केली आहे. विमानतळ संरक्षक भिंतीचे 16 कोटी रुपयांचे काम सध्या सुरू आहे. 80 कोटी रुपये खर्चून धावपट्टी विस्तारित केली जाणार आहे. त्याचीही निविदा प्रक्रिया पूर्ण झाली आहे. सप्टेंबरपासून या कामाला प्रारंभ होणार आहे. 

विमानतळ विस्तारीकरणासाठी संपादित केलेल्या जागेत उजळाईवाडी-नेर्ली-तामगाव या रस्त्याचा काही भाग येत आहे. या रस्त्याच्या बाजूने कंपाऊंड वॉल बांधण्याचे काम सुरू आहे. हा रस्ता लवकरच बंद केला जाणार आहे. त्यामुळे नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी विमानतळाच्या कंपाऊंडच्या बाजूने रस्ता देण्याचा विचार सुरू आहे. यासह गोकुळ शिरगावच्या दिशेला थेट महामार्गाला जोडणारा रस्ता करता येईल का, याबाबतही चर्चा झाली. या परिसरातील पाणंद रस्ते, गाव रस्ते आदींचा सर्व्हे करण्याचेही आदेश या बैठकीत अधिकार्‍यांना दिले. प्राधिकरणाच्या माध्यमातून या परिसरात नवे डी.पी. रोड करण्याबाबत चर्चा झाली.

विमानतळ परिसरातील  महावितरणचे टॉवर टॉवर स्थलांतरित करण्याचे आदेश दिले. तसेच मंदिरही स्थलांतरित करण्याचा निर्णय झाला. प्रवासी कक्ष, प्रतीक्षा कक्ष अद्ययावत करण्याबरोबर तो वातानुकूलित करण्याची सूचना यावेळी केली.

बैठकीला आ. अमल महाडिक, आयुक्त अभिजीत चौधरी, निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे, करवीरचे प्रांत सचिन इथापे, मनपा नगररचना विभागाचे सहायक संचालक धनंजय खोत, विमानतळ व्यवस्थापक पूजा मूल, सल्लागार समितीचे समीर शेठ, विमानतळ प्राधिकरणाचे एजीएम टी. एन. कांबळे आदी उपस्थित होते.

नियोजनबद्ध विकास : खा. महाडिक

विमानतळाचा नियोजनबध्द विकास केला जाणार आहे. टर्मिनस् बिल्डिंगसाठीही लवकरच निविदा प्रक्रिया सुरू होईल असेही खा. महाडिक यांनी सांगितले.
विमान कंपनीत नोकरी देणार्‍या एजंटापासून सावध रहा : खा. शेट्टी
विमानसेवा देणार्‍या कंपनीत नोकरी देतो असे सांगून काहीजण लोकांची फसवणूक करीत आहेत. अशा एजंटापासून सावध रहा, असे आवाहन खा. शेट्टी यांनी केले.