Mon, Jun 24, 2019 16:37होमपेज › Kolhapur › विमानसेवेचा मार्ग मोकळा

विमानसेवेचा मार्ग मोकळा

Published On: Apr 09 2018 1:32AM | Last Updated: Apr 09 2018 1:26AMकोल्हापूर : प्रतिनिधी

कोल्हापूर-मुंबई मार्गावर विमानसेवा देणार्‍या एअर डेक्‍कन कंपनीने रविवारी विमान चाचणी घेतली. दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी कंपनीच्या विमानाचे कोल्हापूर विमानतळावर लँडिंग झाले आणि गेल्या साडेसात वर्षांपासून बंद असलेल्या प्रवासी विमानसेवेचा मार्ग मोकळा झाला. वॉटर शॉवरने (पाण्याचे फवारे) सॅल्यूट देत विमानाचे जल्लोषी स्वागत करण्यात आले. दि. 22 एप्रिलपासून नियमित सेवा सुरू होईल. मुख्यमंत्री, नागरी हवाई वाहतूक राज्यमंत्री यांच्या उपस्थितीत त्याच्या उद्घाटनाचा कार्यक्रम करण्याचे नियोजन असल्याचे खा. धनंजय महाडिक यांनी यावेळी सांगितले.

केंद्र शासनाच्या ‘उडान’ योजनेत कोल्हापूरचा समावेश करण्यात आला आहे. या योजनेंतर्गत एअर डेक्‍कन या कंपनीमार्फत कोल्हापूर-मुंबई अशी प्रवासी सेवा देण्यात येणार आहे. कंपनीच्या वतीने सप्टेंबर 2017 पासून ही सेवा दिली जाणार होती. मात्र, कंपनीला मिळालेली वेळ गैरसोयीची वाटत असल्याने ही सेवा रखडली होती. नागरी विमान वाहतूक मंत्रालयाचा कार्यभार स्वीकारलेल्या सुरेश प्रभू यांनी कंपनीला विमानसेवा सुरू करण्याबाबत नोटीस दिली. या सर्व पार्श्‍वभूमीवर कंपनीने कोल्हापूर-मुंबई सेवा सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे.

त्यानुसार कंपनीच्या वतीने या मार्गावर आज चाचणी घेण्यात आली. आज दुपारी 3 वाजून 11 मिनिटांनी कंपनीचे 18 सीटर विमान कोल्हापूर विमानतळाच्या धावपट्टीवर दाखल होताच, उपस्थितांनी टाळ्यांचा गजर केला. भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि खा. महाडिक यांच्या वतीने विमानाचे पायलट कॅप्टन व्ही. अँड्री, फर्स्ट ऑफिसर के. नवीन आणि केबिन क्रू उमा पांडे यांचे स्वागत करण्यात आले. अँड्री आणि नवीन यांचा फेटा बांधून सत्कार करण्यात आला. विमानतळाच्या इमारतीला फुले आणि फुग्यांची आकर्षक सजावट करण्यात आली होती.

यावेळी खा. महाडिक म्हणाले, विमान कधी येणार म्हणत विरोधक आमच्यावर टीका करत आहेत. आपण गेली चार वर्षे पाठपुरावा करत होतो. आज आनंद आणि अभिमान वाटत आहे. कोल्हापूर हे महत्त्वाचे शहर आहे. औद्योगिक, शैैक्षणिक, व्यापार-व्यवसाय आदी दृष्टीने वेगाने विकसित होत आहे. यामुळे शहराच्या विकासासाठी विमानसेवा नियमित सुरू ठेवा असे आवाहन करत, या विमानसेवेसाठी प्रवासी सहजपणे मिळतील, असा विश्‍वासही त्यांनी व्यक्‍त केला.

लवकरच विस्तार
विमानतळ प्राधिकरणाचे पुणे विभागीय सरव्यवस्थापक एस. के. व्यवहारे म्हणाले, कोल्हापूर विमानतळाचे लवकरच विस्तारीकरण केले जाणार आहे. त्याचे काम सध्या सुरू आहे. विस्तारीकरणात नवी टर्मिनल इमारत होईल, त्यासह धावपट्टीची लांबीही वाढवण्यात येणार आहे.

निवासी उपजिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी, विमानतळ सुरू होणे कोल्हापूरच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण आहे. विमानतळ सुरू झाल्याने विकासाला गती येणार आहे, असे सांगितले. प्राधिकरणाचे सिव्हिल व्यवस्थापक राजेश अय्यर यांनी प्रास्ताविक केले. विमानतळ व्यवस्थापक पूजा मूल यांनी आभार मानले. यावेळी समीर शेठ, गोकुळचे संचालक रामराजे कुपेकर, कंपनीचे व्यवस्थापक गुरव आदींसह कंपनीचे व विमानतळ प्राधिकरणाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.

जूनपासून बंगळूर, हैदराबाद,तिरूपती मार्गावर विमानसेवा
‘उडान’च्या पहिल्या टप्प्यातील कोल्हापूर-मुंबई ही सेवा लवकरच सुरू होत आहे. त्यापाठोपाठ जून महिन्यापासून ‘उडान’च्या दुसर्‍या टप्प्यातील कोल्हापूर-बंगळूर आणि कोल्हापूर-हैदराबाद-तिरूपती अशी विमानसेवा सुरू होणार आहे. एलायन्स एअर कंपनीच्या वतीने कोल्हापूर-बंगळूर तर गो इंडिगो कंपनीच्या वतीने कोल्हापूर-तिरूपती ही सेवा सुरू केली जाणार आहे. या दोन्ही कंपनीच्या अधिकार्‍यांनी विमानतळाची पाहणी केली असल्याचेही यावेळी सांगण्यात आले.

विमान उतरेपर्यंत खात्री नव्हती : खा. महाडिक
कोल्हापूरच्या विमानसेवा सुरू होण्याच्या तारखा अनेकदा जाहीर झाल्या. मात्र, त्याला काही मुहूर्त लागला नाही. यामुळे नव्या तारखेबाबत कोणीच खात्री देत नव्हते. पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनीही विमान प्रत्यक्ष सुरू होईल त्याचवेळी आपण सांगू, असे सांगितले होते. आज खा. महाडिक यांनीही विमान मुंबईतून टेक ऑफ झाले, त्यानंतर ते कोल्हापुरात उतरेपर्यंत खात्री नव्हती, असे सांगितले. आता खात्री झाली असून यापुढे ही सेवा नियमित सुरू राहील, त्यासाठी प्रसंगी स्वत: प्रयत्न करू, किमान पहिली सहा महिने विमान फुल्ल राहील याची काळजी घेऊ, असेही त्यांनी सांगितले.

कोल्हापूर विमानसेवेची वचनपूर्ती : पालकमंत्री
विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात दिलेल्या वचनाची पूर्ती झाली असून, विकासाला नवी चालना मिळेल, अशी प्रतिक्रिया पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी व्यक्‍त केली. पालकमंत्री म्हणाले, कोल्हापूर विमानसेवा बंद करून गेल्या सरकारने जिल्ह्याच्या विकासाला ‘खो’ घालण्याचे काम केले. भाजपचे सरकार आल्यानंतर विकासाची कवाडे उघडली. पंतप्रधान नरेंद्र मोदी व भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी उडान योजना देशात सुरू केली आणि या अंतर्गत कोल्हापूर-मुंबई  विमानसेवेचा समावेश करण्यात आला. एअर डेक्‍कनने काही कारणासाठी विलंब लावला. परंतु, केंद्रीय नागरी उड्डाणमंत्री सुरेश प्रभू यांनी त्वरित विमानसेवा सुरू करण्यासंदर्भात सूचना केली. त्यानुसार रविवारी चाचणी घेण्यात आली असून, ती यशस्वी झाली. ही सेवा पूर्ववत सुरू होईल आणि सर्वांगीण विकास साधला जाईल.