होमपेज › Kolhapur › लोकसभा निवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरू

लोकसभा निवडणुकीची प्रशासनाची तयारी सुरू

Published On: Dec 20 2017 1:55AM | Last Updated: Dec 20 2017 1:15AM

बुकमार्क करा

कोल्हापूर : अनिल देशमुख

गुजरातच्या विधानसभा निवडणुकीनंतर सर्वत्र 2019 मध्ये होणार्‍या लोकसभा निवडणुकीच्या चर्चेने वेग घेतला आहे. दीड वर्षावर आलेल्या या निवडणुकीसाठी राजकीय पक्षांनी अद्याप तयारी सुरू केली नसली तरी प्रशासनाने मात्र, लोकसभा निवडणुकीची तयारी सुरू केली आहे. निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार निवडणूक विभागातील रिक्त पदांची तातडीने भरती करण्यात येणार आहे. 

गुजरात विधानसभेची निवडणूक म्हणजे, लोकसभेची सेमीफायनल असे निर्माण झालेले राजकीय चित्र प्रशासनासाठी मात्र; वस्तुस्थिती ठरणार आहे. लोकसभा निवडणुकीसाठी  दीड वर्षाचा अवधी आहे, त्यादृष्टीने निवडणूक आयोगाने आतापासूनच तयारी सुरू केली आहे. राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी अश्‍विनीकुमार यांनी सर्व जिल्हाधिकार्‍यांची बैठक घेऊन कामकाजाबाबतच्या सूचना केल्या आहेत.

मतदार यादी पुनरीक्षणाचा कार्यक्रम सध्या सुरू आहे. आगामी लोकसभा निवडणुकीसाठी अद्ययावत मतदार यादी तयार करण्याचे आयोगाचे प्रयत्न सुरू आहेत. यासह निवडणूक विभागातील कामकाज गतीने व्हावे याकरिता विभागातील रिक्त पदे तातडीने भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत. जिल्ह्यात 12 पैकी 8 तालुक्यांतील निवडणूक नायब तहसीलदार हे महत्त्वाचे पदच रिक्त आहे. यासह निवडणूक उपजिल्हाधिकार्‍यांचा कार्यभारही गेल्या अनेक महिन्यांपासून अतिरिक्त आहे. 

जिल्ह्यातील निवडणूक नायब तहसीलदारांची पदे तातडीने भरण्यात येणार आहेत. जिल्ह्यातील नायब तहसीलदारांच्या 58 पदांपैकी 15 पदे रिक्त आहेत. यापैकी 8 पदे निवडणूक नायब तहसीलदारांची आहेत. उर्वरित 43 नायब तहसीलदारांकडे अन्य पदांचा कार्यभार देण्यात आला आहे. मात्र, आता निवडणूक नायब तहसीलदार ही पदे प्रामुख्याने भरली जाणार आहेत. त्याकरिता सध्या असलेल्या नायब तहसीलदारांची निवडणूक नायब तहसीलदार म्हणून बदली केली जाणार आहे, तर त्यांच्या मूळ पदाचा कार्यभार अतिरिक्त कार्यभार म्हणून सोपवला जाणार आहे. याबाबतची प्रक्रिया जिल्हा प्रशासानने सुरू केली आहे. येत्या तीन-चार दिवसांत जिल्ह्यातील निवडणूक नायब तहसीलदार पदे भरली जाण्याची शक्यता आहे. निवडणूक उपजिल्हाधिकारी पदावरही नियुक्ती होण्याची शक्यता आहे.