Wed, Mar 27, 2019 02:18होमपेज › Kolhapur ›

 जिल्हा परिषद देणार गरजूंना मदतीचा हात

 जिल्हा परिषद देणार गरजूंना मदतीचा हात

Published On: Apr 05 2018 2:13AM | Last Updated: Apr 05 2018 12:52AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गरीब, होतकरू, रुग्ण यांना संकटकाळी मदतीचा हात देण्यासाठी सुरू असलेल्या मुख्यमंत्री सहाय्यता निधीच्या धर्तीवर आता कोल्हापूर जिल्हा परिषदही स्वतंत्र अध्यक्ष सहाय्यता निधी उभारणार आहे. ट्रस्टच्या माध्यमातून याची लवकरच धर्मादाय आयुक्तांकडे नोंदणी होणार आहे. त्यासाठी जिल्हा परिषदेत स्वतंत्र कक्ष स्थापन करण्याचा निर्णय बुधवारी झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात आला. 

मुख्यमंत्री सहाय्यता निधीपासून वंचित असणार्‍या पण जिल्हा परिषद कार्यक्षेत्रात असणार्‍या गरजूंना आपत्कालीन परिस्थितीत मदत देताना अडचणी येत होत्या. जिल्हा परिषदेकडे यासंदर्भात गरजूंचे अर्ज येत होते; पण निधी नसल्याने देणे शक्य होत नव्हते. परवाच झालेल्या अर्थसंकल्पीय सर्वसाधारण सभेत यासंदर्भात जि.प. सदस्य राजवर्धन निंबाळकर यांनी अध्यक्ष सहाय्यता निधी सुरू करावा, अशी सूचना केली होती. त्याला अध्यक्षांसह इतर सर्व सदस्यांनी अनुमोदन देत लवकरच त्याबाबत निर्णय घेण्याचेही आश्‍वासित केले होते. 

त्यानुसार बुधवारी जि.प. अध्यक्ष शौमिका महाडिक यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या स्थायी समितीच्या बैठकीत या विषयावर पुन्हा एकदा सविस्तर चर्चा झाली. या चर्चेचा वृत्तांत देताना मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले की, हा निधी ट्रस्टच्या माध्यमातून उभा केला जाणार आहे, त्यासाठीची नोंदणी धर्मादाय आयुक्तांकडे केली जाणार आहे. याबाबत स्थायीच्या बैठकीत चर्चा झाली. ट्रस्टला मान्यता मिळाल्यानंतर जिल्हा परिषदेतच यासाठी स्वतंत्र कक्ष उभारला जाणार आहे. एक क्लार्क व एक शिपाई अशा दोन पदावरच हे कार्यालय चालेल. शिवाय जि.प. अध्यक्षांच्या मान्यतेने या संदर्भातील समितीही गठित केली जाणार आहे. या ट्रस्टच्या माध्यमातून निधी उभारण्यासाठी मदतीचे आवाहन केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचारी, पदाधिकारी, सदस्य, ग्रामपंचायत आदींकडून स्वेच्छेने निधी संकलित होणार आहे. साधारपणे हा निधी किमान 60 लाखांपर्यंत होईल, असे नियोजन करण्यात येणार आहे. हा निधी संकलित झाल्यानंतर दानशूरांकडे या ट्रस्टसाठी मदत करण्याचे आवाहन केले जाणार आहे. 
 

Tags : kolhapur Zilla Parishad