Tue, May 21, 2019 18:34होमपेज › Kolhapur › बदली झाली, आता कारवाईची धास्ती

बदली झाली, आता कारवाईची धास्ती

Published On: Jun 16 2018 1:29AM | Last Updated: Jun 16 2018 1:02AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षकांच्या ऑनलाईन बदली प्रक्रियेत अन्याय झाल्यामुळे बदल्यांना स्थगिती देण्याच्या याचिकेवर उच्च न्यायालयाने स्थगिती देण्यास असहमती दर्शविली. त्यामुळे याचिका दाखल केलेले 234 शिक्षक बदली झाल्याच्या ठिकाणी हजर होऊ लागले आहेत. शिक्षकांच्या ऑनलाईन बदलीची प्रक्रिया जवळपास पूर्णत्वास आली आहे. आतापर्यंत 4 हजार 200 शिक्षकांच्या बदल्या झाल्या असून 55 शिक्षक विस्थापित आहेत.  त्यांनाही सोमवारपर्यंत बदलीचे आदेश मिळण्याची शक्यता आहे.

दरम्यान, बदली झालेल्या ठिकाणी हजर होण्यासाठी सात दिवसांची मुदत शिक्षकांना दिली आहे. मुदतीत बदलीच्या ठिकाणी हजर न होणार्‍या शिक्षकांवर शासनाच्या नियमानुसार कारवाई करण्यात येणार असल्याचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांनी सांगितले.

जिल्हा परिषदेतील शाळांमधील शिक्षकांच्या बदल्या यावर्षी खूपच गाजल्या. प्रथमच ऑनलाईन पद्धतीने शिक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या. नव्या बदल्यांच्या प्रक्रियेत बदलीचे स्थानिक पातळीवरील सर्व अधिकार शासनाने काढून घेतले. या ऑनलाईन प्रक्रियेला शिक्षकांनी ‘खो’ घालण्याचा खूप प्रयत्न केला, मात्र त्याचा काही उपयोग झाला नाही. पूर्वी बदली झालेल्या शिक्षकंची यादी प्रथम प्रसिद्ध केली जायची. नंतर आदेश दिले जायचे. त्यामुळे  बदलीचे आदेश निघण्यापूर्वी शिक्षकांना कोठे बदली झाली हे समजत असत. त्यात बदल करण्यासाठी शिक्षकांना संधी मिळायची आणि वाटेल ती किंमत मोजून ते सोयीच्या ठिकाणी बदली करून घेण्याचा प्रयत्न करत असत. मात्र, ऑनलाईन प्रक्रियेमुळे शिक्षकांना बदलीच्या ऑर्डर हातात मिळाल्यानंतरच बदलीचे ठिकाणी कळाले आणि बदली प्रक्रियेतील जिल्हा परिषदेचे सर्व अधिकार शासनाने काढून घेतल्यामुळे शिक्षकांची अडचण झाली. त्यामुळे 234 शिक्षकांनी बदलीला स्थगिती मिळावी म्हणून उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर दोन्ही बाजूच्या वकिलांनी आपले म्हणणे ऐकून घेतल्यानंतर न्यायालयाने बदल्यांना स्थगिती देण्यास नकार दिला. यावर पुन्हा 19 जून रोजी सुनावणी होणार आहे. 

 स्तनदा माता व गरोदर शिक्षिकेंचा तसेच पती, पत्नी एकत्रीकरणाबाबत प्रशासन सहानुभूतीपूर्वक विचार करत आहे.  शाळा सुरू झाल्याने त्याबाबत लवकर निर्णय होणे आवश्यक आहे. त्याद‍ृष्टीने प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत.  जिल्हा परिषदेत काम करणार्‍या पती, पत्नींची गैरसोय झाल्याच्या तक्रारी आहेत. यासंदर्भात माहिती घेण्याचे काम सुरू आहे. माहिती संकलीत झाल्यानंतर त्यांच्याबाबत योग्य निर्णय घेण्यात येईल, असे डॉ. खेमनार यांनी सांगितले.