Fri, May 24, 2019 08:45होमपेज › Kolhapur › शिक्षक समायोजनाचा तिढा सुटता सुटेना

शिक्षक समायोजनाचा तिढा सुटता सुटेना

Published On: Feb 09 2018 2:00AM | Last Updated: Feb 09 2018 2:00AMकोल्हापूर : प्रतिनिधी

शिक्षक समायोजनावरून गेल्या चार-पाच महिन्यांपासून माध्यमिक शिक्षण विभाग व संस्थाचालकांमध्ये निर्माण झालेला तिढा सुटण्याऐवजी वाढतच चालला आहे. शिक्षण सचिवांकडून आदेश आणून माध्यमिक शिक्षणाधिकार्‍यांनी संस्थाचालकांना वेसण घालण्याचा प्रयत्न केला खरा; पण संस्थाचालकांनी त्याला दाद दिली नाही. त्यामुळे 96 पैकी अजूनही 65 शिक्षक शाळेत हजरच होऊ शकलेले नाहीत. 

दरम्यान, आता यातील आठ ते दहा जणांना कोर्टात पाठवून स्थगिती मिळवण्यासाठी संस्थांनी आटापिटा सुरू केला आहे. संस्थांच्या या तिरक्या चालीने माध्यमिक शिक्षण विभाग त्रस्त झाला आहे. 

माध्यमिक शिक्षण विभागाने अतिरिक्त 129 पैकी 96 शिक्षकांची समायोजन प्रक्रिया राबवली होती.  पण आजतागायत यापैकी केवळ 31 शिक्षकांनाच प्रत्यक्ष शाळेत हजर करून घेतले आहे, उर्वरित 65 जण अजूनही प्रतीक्षेत आहेत. यासंदर्भात माध्यमिक शिक्षणाधिकारी किरण लोहार यांनी कठोर भूमिका घेतली.     

तरीही काही परिणाम न झाल्याने संस्थांचे वेतनेतर अनुदान रोखण्यात आले. तरीदेखील पाच-सहा शिक्षकांचा अपवाद वगळता हजर करून घेण्याच्या शिक्षकांत वाढ झाली नाही.

अखेर शासन निर्णय व वरिष्ठांच्या सूचनेनुसार हजर न करून घेणार्‍या शाळेतील रिक्त पदेच रद्द करण्याची नोटीस संस्थाचालकांना काढण्यात आली. त्यानंतर या संस्थाचालकांची मागील आठवड्यात देशभूषण हायस्कूलमध्ये बैठक घेऊन शिक्षणाधिकार्‍यांनी निर्वाणीचा इशाराही दिला. 

आठ दिवसानंतर आता शिक्षणाधिकार्‍यांनी कारवाईही सुरू केली आहे. तसेच ज्या संस्था हजर करून घेण्यास तयार असतानाही जे शिक्षक हजर झाले नाहीत, त्यांचा पगार थांबविण्यात येणार आहे. त्यामुळे संस्थाचालकांनी काही शिक्षकांना कोर्टात पाठवले आहे.