Sun, Aug 18, 2019 20:35होमपेज › Kolhapur › ‘कले’वर वशिल्याने मात

‘कले’वर वशिल्याने मात

Published On: Feb 17 2018 2:06AM | Last Updated: Feb 16 2018 11:39PMकोल्हापूर : प्रतिनिधी

बरेच दिव्य पाडल्यानंतर जिल्ह्यातील 60 कलाकारांना यावर्षी मानधन मंजूर झाले; पण आता ही निवडलेली कलाकारांची यादीच वादात सापडली आहे. मोठ्या प्रमाणावर वशिलेबाजी झाल्याने कलेवर वशिल्याने मात केल्याची कलाकारांत जोरदार चर्चा सुरू आहे. खरे कलाकार डावलले गेल्याने गाणं म्हणणारा राहिला बाजूला आणि तुणतुणं वाजवणार्‍याला मानधन मिळाल्याच्या अस्सल रांगड्या प्रतिक्रिया कलाकारांतून उमटू लागल्या आहेत. जिल्हा परिषदेच्या समाजकल्याण विभागाकडे अशा तक्रारी करणार्‍यांचा ओघ वाढला आहे. प्रस्ताव चांगला असताना का डावलले गेले, याचा जाब हे कलाकार स्वत: जिल्हा परिषदेत येऊन अधिकार्‍यांना विचारू लागले आहेत. 

राज्याच्या समाजकल्याण विभागामार्फत कलाकारांना अ, ब, क या वर्गवारीनुसार 2100, 1800, 1500 रुपये मासिक मानधन तहहयात मिळते. त्यासाठी जिल्हा परिषदेकडून शासनाने ठरवून दिलेल्या वार्षिक 60 कलाकारांची निवड समितीकडून होते. यावर्षी साडेचारशेहून अधिक प्रस्ताव आलेले असताना त्यापैकी वैशाली नायकवडी यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 60 कलाकारांची निवड केली. यातील यशवंत भालकर यांचा एक 1800 रुपयांचा मानधन प्रस्ताव वगळता उर्वरित 59 कलाकार हे स्थानिक पातळीवरील आहेत. ही निवड यादी नुकतीच प्रसिद्ध केली असून, ती आयुक्तांकडे अंतिम मंजुरीसाठी पाठवली जाणार आहे. 

दरम्यान, ही यादी प्रसिद्ध झाल्यानंतर निवड झालेल्या कलाकारांविषयी स्थानिक कलाकारांतूनच विरोध होऊ लागला आहे. जे खरेखुरे आणि पात्र लाभार्थी आहेत, आणि ज्यांनी वर्षानुवर्षे मानधनासाठी प्रतीक्षा केली, त्यांना या मानधन यादीत स्थानच दिले नसल्याच्या तक्रारी आहेत. यातील काही कलाकार स्वत: जिल्हा परिषदेत येऊन समाजकल्याण अधिकार्‍यांसमोर आपली कैफियत मांडत आहेत. शिवाय बरेच वृद्ध कलाकार असल्यामुळे जिल्हा परिषदेत येता नसल्याने ते शासनाकडून अन्याय झाल्याची भावना बोलून दाखवत आहेत. 

मानधन यादीत करवीरचे सर्वाधिक कलाकार
यावर्षी मानधनासाठी निवड झालेल्या यादीत करवीरमधील सर्वाधिक 18 कलाकार आहेत. याउलट गगनबावडा तालुक्यातून एकाही कलाकाराची निवड झालेली नाही. आजरा, चंदगड, भुदरगड, पन्हाळा तालुक्यातून प्रत्येकी 3 कलाकार मानधनासाठी निवडले गेले आहेत. हातकणंगले व राधानगरीचे प्रत्येकी 7, कागलचे 4, गडहिंग्लज व शाहूवाडीचे प्रत्येकी  2 तर शिरोळमधून 8 जणांची निवड झाली आहे.