Wed, Mar 27, 2019 02:15होमपेज › Kolhapur › टीम तयार करण्याच्या कामाला लागा

टीम तयार करण्याच्या कामाला लागा

Published On: Mar 09 2018 1:34AM | Last Updated: Mar 09 2018 1:18AMकोल्हापूर : प्रतिनिधी

भाजप आघाडीच्या सत्तास्थापनेच्या वर्षपूर्तीस अजून 14 दिवसांचा अवधी बाकी असतानाच जिल्हा परिषदेत विद्यमान पदाधिकारी बदलाच्या दिशेने वारे जोरात वाहू लागले आहेत. बुधवारी स्थायी समिती सभागृहात झालेल्या पार्टी मिटिंगमध्येही चेष्टामस्करीत का होईना पण खुद्द अध्यक्षा शौमिका महाडिक यांनी आता तुम्ही वर बसणार, आम्हाला येथून पुढे खालीच बसायचे आहे. तुम्ही टीम तयार करण्याच्या कामाला लागा, असे गटनेते अरुण इंगवले यांना उद्देशून सांगत या बदलाच्या चर्चेला पुन्हा एकदा सुरुवात केली आहे.

शुक्रवारी जिल्हा परिषदेची सर्वसाधारण सभा होत आहे, तत्पूर्वी सत्तारुढ गटाच्या सदस्यांची बुधवारी जिल्हा परिषदेत पार्टी मिटिंग झाली. तब्बल दोन ते अडीच तास चाललेल्या या बैठकीत अधिकार्‍यांची वर्तवणूक, औषध घोटाळा, निधीचे वाटप आदी विषयांवरून थोडीशी आक्रमक पण खेळीमेळीत चर्चा झाली. येत्या 21 मार्चला विद्यमान सभागृहाला एक वर्ष पूर्ण होत असल्याने सध्या सत्ताधारी सदस्यांमध्ये पदाधिकारी बदलाच्या चर्चेने वेग घेतला आहे. या बदलाच्या अनुषंगाने या पार्टी मिटिंगमध्ये विशेष चर्चा झाली नाही, पण व्यासपीठावर बसण्याचा मान देण्यावरून सदस्य व अध्यक्षांमध्ये झालेल्या शाब्दिक कोट्यातून याचे संकेत मात्र मिळाले आहेत. या संकेतामुळे निधी नसल्यामुळे नाराज असलेल्या सदस्यांमध्ये कमालीचा उत्साह संचारला आहे. खरं तर या पार्टी मिटिंगमध्ये निधीचाच विषय अजेंड्यावर होता. सदस्यांनी तसे बोलूनही दाखवले होते, पण पदाधिकारी बदलाचे सुतोवाच मिळाल्याने येत्या दोन महिन्यांत बदल होणार आहेत तर कशाला कुणाला अंगावर घ्या असे म्हणत प्रत्येक सदस्याने सबुरीनेच घेतले. 

या बैठकीसंदर्भात विचारले असता अध्यक्षा महाडिक यांनी याला दुजोरा देताना चेष्टामस्करीत विषय झाल्याचे सांगितले. याशिवाय, निधीच्या बाबतीत ठोस निर्णय घेतल्याचेही त्यांनी सांगितले. 
रस्ते दुरुस्तीसाठीचा 25:15 चा 2 कोटींचा निधी आला असून ज्या सदस्यांंनी प्रस्ताव दिले आहेत त्यांना प्रत्येकी 5 लाख रुपये दिले जाणार आहेत. डीपीडीसीकडून आलेल्या 10 कोटी निधीतील प्रत्येकी 10 लाख रुपये सर्व सदस्यांना समान पद्धतीनेच दिले जाणार आहेत. गौण खनियाच्या रॉयल्टीतील 4 कोटी रुपये मंजुरीच्या प्रक्रियेत असून फक्त सत्ताधारी सदस्यांनाच 10 लाखाप्रमाणे त्याचे वाटप होणार आहे. याशिवाय 80 लाखांचा निधी पदाधिकार्‍यांसह सत्ताधारी सदस्यांमध्ये समान पातळीवर वाटण्याचाही निर्णय घेण्यात आला.