Wed, Jun 26, 2019 12:11होमपेज › Kolhapur › पर्यायी पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर

पर्यायी पुलाच्या कामाची वर्क ऑर्डर

Published On: May 15 2018 1:36AM | Last Updated: May 15 2018 1:16AMकोल्हापूर : प्रतिनिधी

येथील पंचगंगेवरील गेले दीड वर्ष रखडलेले पर्यायी शिवाजी पुलाचे काम आठवड्याभरात सुरू होत आहे. काम सुरू करण्याचा आदेश (वर्क ऑर्डर) ठेकेदाराला सोमवारी देण्यात आला. प्रभारी कार्यकारी अभियंता रमेश पन्हाळकर यांनी सोमवारी सायंकाळी कृती समितीच्या शिष्टमंडळाला ही माहिती  दिली.

पर्यायी पूल बांधण्यासाठी गेल्या दशकापासून मागणी वाढली होती. अखेर तत्कालीन खासदार कै. सदाशिवराव मंडलिक यांनी संसदेत सातत्याने आवाज उठवत या पुलाला मंजुरी मिळविली. पुलासाठी सुमारे पंधरा कोटी रुपयांचा निधी प्राप्‍त झाला. त्यानुसार 14 मार्च 2013 ला या पुलाचे काम सुरू झाले. 

काम रखडले
सुमारे 136 मीटर लांबीच्या आणि तीन गाळे असलेल्या या पुलाचे काम अत्यंत गतीने सुरू होते, अशातच कोल्हापुरातील काही तथाकथित पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी या पुलाच्या कामाबाबत कोल्हापूर महापालिकेकडे तक्रार केली. पुलाच्या कामासाठी तोडली जाणारी झाडे आणि पुरातत्त्व खात्याची परवानगी न घेताच पूल बांधला जात असून ते काम थांबवावे, अशी मागणी या कार्यकर्त्यांनी केली. त्यानुसार कोल्हापूर महापालिकेने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग शाखेला काम थांबविण्याबाबत पत्र दिले.

एका गाळ्याचे काम अपुरे
परवानगी घेतल्याशिवाय काम करू नये, असे स्पष्ट आदेश कोल्हापूर महापालिकेने दिल्याने सार्वजनिक बांधकाम खात्याच्या महामार्ग शाखेने 10 डिसेंबर 2015 रोजी पुलाचे काम थांबविले आणि झाडे तोडण्यासाठी महापालिकेच्या वृक्ष प्राधिकरणाकडे आणि पुरातत्त्व खात्याकडेही काम सुरू करण्यासाठी फेब्रुवारी 2016 मध्ये परवानगी मागितली. हे काम मुंबईची बंका कन्स्ट्रक्शन कंपनी करीत होती. काम थांबल्यानंतरही जवळपास वर्षभर कंपनीने वाट पाहिली. परंतु, काम सुरू करण्याबाबत परवानगी मिळेल, याची शाश्‍वती नसल्याने कंपनीने आपला गाशा गुंडाळला. मोठमोठी यंत्रसामग्री आणि कामगारवर्गही हलविला. त्यानंतर आजतागायत नवा पूल अर्धवट अवस्थेतच उभा आहे. पंचगंगेवरील 136 मीटर लांबीच्या या पुलाला तीन गाळे आहेत. पैकी प्रत्येकी 47 मीटरचे दोन गाळे पूर्ण झाले आहेत. कोल्हापूरच्या बाजूचे 40 मीटरचे काम रखडले आहे. हा शेवटचा गाळा आहे. तो पूर्ण झाला तर लगेचच वाहतूक सुरू होणार आहे.

अवजड वाहतुकीसाठी शिवाजी पूल धोकादायक

पंचगंगेवरील ब्रिटिशकालीन शिवाजी पुलाचे आयुर्मान जवळपास 140 वर्षे झाले आहे. हा पूल अरुंद आहेच, शिवाय वाढत्या वाहतुकीचा ताण सहन करू शकत नाही. स्ट्रक्‍चरल ऑडिट झाल्यानंतरही या पुलावरून अवजड वाहतूक सुरू ठेवणे धोक्याचे असल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. जोतिबा आणि पन्हाळ्यासह रत्नागिरीकडे जाणार्‍या महामार्गावरील अत्यंत महत्त्वाचा हा पूल आहे. त्यावरून दररोज शेकडो वाहनांची ये-जा होत असते. म्हणून तो तातडीने पूर्ण करण्यासाठी कृती समितीच्या माध्यमातून जोरदार आंदोलन सुरू झाले. त्याचदरम्यान या पुलाचा कठडा तोडून 31 डिसेंबर 2017 रोजी मिनीबस नदीत कोसळून 13 जणांचा बळी गेला. त्यानंतर तर आंदोलनाची धार अधिकच तीव्र झाली.

आंदोलन इतके तीव्र झाले, की तेथील झाडे आणि शाहूकालीन पाण्याचा हौद महापौरांसह सर्वपक्षीय आंदोलकांनी तोडला. त्यानंतर पालकमंत्री चंद्रकांत पाटील, खा. धनंजय महाडिक, खा. संभाजीराजे यांनी पुरातत्त्व खात्याच्या परवानगीसाठी सातत्याने प्रयत्न केले. या पुलाच्या निमित्ताने पुरातत्त्व खात्याचा कायदा बदलण्याचा ठराव लोकसभेत झाला; पण तो राज्यसभेत व्हायचा आहे. पावसाळा जवळ आल्याने पुलाचे काम तातडीने सुरू करण्यासाठी गेल्या महिनाभरापासून कृती समितीचे निमंत्रक आर. के. पोवार आणि सदस्यांनी सातत्याने आंदोलन करीत पाठपुरावा सुरू ठेवला. याबाबत जिल्हाधिकारी अविनाश सुभेदार आणि पोलिसप्रमुख संजय मोहिते यांच्यासमोर बैठका झाल्या. गेल्याच आठवड्यात झालेल्या बैठकीत सोमवारी वर्क ऑर्डर देण्याचे आश्‍वासन देण्यात आले होते.

कांडगावे यांचा निषेध

वर्क ऑर्डर दिली का, याची माहिती घेण्यासाठी कृती समितीचे बाबा पार्टे, जयकुमार शिंदे, रमेश मोरे, सुनील पाटील, दिलीप माने, तानाजी पाटील, सुनील खिरुगडे यांचे शिष्टमंडळ सायंकाळी महामार्ग शाखेत गेले. तेथे कार्यकारी अभियंता कांडगावे हजर नव्हते. त्यामुळे संतप्त झालेल्या पार्टे आणि शिंदे यांनी त्यांचा निषेध करीत प्रभारी अधिकारी पन्हाळकर यांची भेट घेतली. पन्हाळकर यांनी आपण स्वतः सोमवारी वर्क ऑर्डर दिली असल्याचे सांगितले. त्याने शिष्टमंडळाचे समाधान झाले नाही. कार्यकारी अभियंत्यांनी वर्क ऑर्डर का दिली नाही, असा सवाल त्यांनी केला. यापूर्वी सुमारे दहा कोटी रुपयांचे काम झाले असून, उर्वरित काम तीन कोटी, पाच लाख 35 हजार 455 रुपयांचे असून आसमास कंपनीकडून दोन दिवसांत कामाला सुरुवात होईल, असे त्यांनी स्पष्ट केले. उपअभियंता संपत आबदार यांच्या देखरेखीखाली हे काम होणार आहे.

पुरातत्त्व खात्याची परवानगी नाही, म्हणून पर्यायी शिवाजी पुलाचे काम रखडले असताना तेथेच बोरिंग कसे मारले गेले, असा सवाल बाबा पार्टे यांनी उपस्थित केला. त्यावर पन्हाळकर यांनी यासंदर्भात आपल्याला माहिती नसल्याचे सांगितले. या विभागाचे उपअभियंता संपत आबदार असल्याचे त्यांनी सांगताच त्यांना फोन लावा, असे पार्टे यांनी सांगितले. फोनवर बोलताना पार्टे यांनी पूल बांधायला परवानगी लागते आणि बोरिंग मारायला परवानगी लागत नाही का, असा प्रश्‍न उपस्थित केला.