Sun, Jul 21, 2019 01:32होमपेज › Kolhapur › बाजार समितीच्या उलाढालीत १०० कोटींची वाढ

बाजार समितीच्या उलाढालीत १०० कोटींची वाढ

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 12:37AM कोल्हापूर : डी. बी. चव्हाण

कोल्हापूर शेती उत्पन्न बाजार समितीच्या यंदाच्या उलाढालीत 100 कोटींची वाढ झाली आहे. गतवर्षी 709 कोटी, 48 लाख, 1 हजार, 213 रुपये अशी उलाढाल झाली होती. यावर्षी 812 कोटी, 6 लाख, 30 हजार, 800 अशी वाढ झाली आहे. बाजार समितीच्या आवारात आलेल्या शेतीमालाला चांगला दर, पैशाची हमी, मालाचे चोख वजन यावर शेतकर्‍यांचा विश्‍वास बसल्याने हे शक्य झाले असल्याचे सांगितले जाते.  

व्यापारी, दलाल यांच्यातून शेतकर्‍यांची सुटका व्हावी, शेतकर्‍यांना आपला शेतीमाल स्वत: दर ठरवून त्याची विक्री करता यावी, यासाठी शासनाने दोन वर्षांपूर्वी शेतीमालावरील नियमन हटवले आहे. त्यामुळे शेतकर्‍यांना आपला माल मार्केट यार्डाच्या बाहेर कोठेही विक्री करता येतो, पण मार्केट यार्डात माल आणल्यास कायद्यानुसार त्याला सेस आकारणी करण्यासाठी शासनाने समितीला मुभा दिली आहे. शेतीमाल नियमनमुक्त झाला आहे, पण मार्केट यार्डाच्या बाहेरील व्यापारी व दलालाकडून होणारी लुबाडणूक यामुळे शेतकर्‍यांवर आता नियमनच बरे म्हणण्याची वेळी आली आहे. यामुळे शेतकरी शेतीमाल,भाजीपाला खुल्या बाजारात  घेऊन न जाता आता थेट बाजार समितीच्या आवारात येऊ लागला आहे.  

गूळही नियमन मुक्त आहे. पण गुळाच्याबाबतीतही तोच प्रकार शेतकर्‍यांच्या वाट्याला आला होता. अनेक व्यापारी वर्षोनुवर्ष शेतकर्‍याच्या गुर्‍हाळावर जाऊन गूळ खरेदी करतात आणि शेतकर्‍याला पैसे देतात. पण काही व्यापारी नियमन मुक्तीची संधी साधत गुर्‍हाळावर जाऊन शेतकर्‍यांचा गूळ खरेदी करत आहेत, पंधरा दिवसात पैसे देऊ असे सांगतात, आणि हंगाम संपेपर्यंत त्या शेतकर्‍यांचे पैसेच देण्यासाठी मागे फिरत नाहीत, असे प्रकार अनेक शेतकर्‍यांच्या बाबीबत घडले आहेत. चार वर्षापूर्वी गूळ उत्पादक शेतकर्‍यांकडून व्यापारी गूळ घेऊन गेले. ते व्यापारी परत पैसे देण्यासाठी शेतकर्‍यांकडे आलेच नाही, यानंतर त्या शेतकर्‍यांनी मार्केट कमिटीकडे तक्रार दिली. बाजार समितीने संबंधींत व्यापार्‍यांवर कारवाईचा बडगा उगारल्यावर व्यापारी पैसे देण्यासाठी तयार झाले. असे प्रकार फळे, कांदा, बटाटा या विभागातही घडले आहेत.यामुळे शेतकरीच आपला शेतीमाल बाजार समितीत आणून विक्री करु लागला आहे., यामुळे कोल्हापूर बाजार समितीच्या उलाढालीत गतवर्षीपेक्षा 100 कोटीने वाढ झाली आहे. यामुळे नियमन चालल पण बाहेरील खुल्या बाजारातील व्यापारी आणि दलाल नको अशी म्हणण्याची वेळ शेतकर्‍यांवर आली आहे.