Sun, Jul 21, 2019 12:27होमपेज › Kolhapur › तलाठी भरतीवरील मर्यादेचे निर्बंध उठवले

तलाठी भरतीवरील मर्यादेचे निर्बंध उठवले

Published On: Dec 07 2018 1:50AM | Last Updated: Dec 07 2018 1:43AM
कोल्हापूर : अनिल देशमुख

राज्य शासनाने मेगाभरतीचा निर्णय घेतला आहे. त्यातच आता तलाठी आणि वन विभागातील चार पदांच्या भरतीवर घातलेले निर्बंध उठवले आहेत. या पदांच्या रिक्त जागांवर शंभर टक्के भरती करण्याचा निर्णय वित्त विभागाने गुरुवारी घेतला. यामुळे पदांची संख्या आणखी वाढणार आहे.

वेतनावरील खर्चाचा विचार करून, राज्य शासनाने वेळोवेळी भरती प्रक्रियेवर मर्यादा आणली होती. रिक्त पदांच्या जागेवर पूर्ण भरती करण्यास निर्बंध घालण्यात आले होते. यासह मंजूर पदांचा आढावा घेऊन सुधारित आकृतिबंध तयार करावा आणि तो मंजूर करून त्यानुसार पदभरती करावी, असेही आदेश 2 जून 2015 ते 15 जानेवारी 2016 या कालावधीत देण्यात आले होते. यामुळे रिक्त पदांच्या संख्येत वाढ होऊन त्याचा कामावर परिणाम होत होता.

नव्याने आकृतिबंध तयार करण्याचे आदेश दिल्याने पदे कमी होणार, असा समज झाला होता. याविरोधात कर्मचारी संघटनांनीही आंदोलनाची तयारी केली होती. या सर्व पार्श्‍वभूमीवर राज्य शासनाने 
शेतकर्‍यांना पायाभूत सुविधा पुरविण्यासाठी विविध विभागातील महत्त्वाच्या सेवांशी निगडित पदभरतीस मान्यता देण्याचा निर्णय वित्त विभागाने 16 मे 2018 रोजी घेतला होता. 

या पार्श्‍वभूमीवर आता वन विभागातील सहायक वनसंरक्षक, वनक्षेत्रपाल, वनरक्षक व सर्व्हेक्षक यांच्यासह महसूल विभागातील तलाठी पदाच्या भरतीवरील सर्व निर्बंध उठवण्यात आले आहेत. जुन्या आकृतिबंधानुसारच जी रिक्त पदे असतील, ती सर्व पदे भरण्यास वित्त विभागाने मान्यता दिली आहे. यापूर्वी रिक्त पदाच्या ठराविक प्रमाणातच भरतीसाठी मान्यता देण्यात येत होती. आता या निर्णयाने सर्वच रिक्त पदे भरली जाणार आहेत.