कोल्हापूर : प्रतिनिधी
सातबारा उतार्यावर नाव नोंदणीसाठी अडीच लाखांची लाच घेतल्याप्रकरणी अटकेत असलेल्या कागल तहसीलदारांसह दोन तलाठ्यांना अतिरिक्त सत्र न्यायाधीश (4) ए. एम. शेटे यांनी चार दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. तक्रारदाराने सादर केलेल्या मूळ अर्जाच्या जप्तीसह तपासकामी पोलिसांनी पोलिस कोठडीची मागणी केली होती.
तहसीलदार किशोर वसंतराव घाडगे (वय 44, रा. नागाळा पार्क), सुळकूड सज्जाच्या तलाठी शमशाद दस्तगीर मुल्ला (43) आणि एकोंडी सज्जाचा तलाठी मनोज अण्णासाहेब भोजे (42, रा. कसबा सांगाव, कागल) या तिघांना गुरुवारी अटक झाली. शुक्रवारी दुपारी तीनच्या सुमारास तिघांना जिल्हा न्यायालयात हजर करण्यात आले. सरकारी वकील ए. बी. आयरेकर यांनी, तक्रारदाराने नाव नोंदणी कामासाठी दिलेला मूळ अर्ज महत्त्वाचा पुरावा असल्याने तो जप्त करण्याकामी संशयितांना पोलिस कोठडी देण्यात यावी, अशी मागणी केली. तर आरोपींच्या वकिलांनी तहसीलदार यांचा तक्रारादाराशी थेट संबंध नसल्याचा युक्तिवाद केला. यावर सरकारी वकिलांनी सर्व प्रकरणाचे ऑडिओ संभाषण लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे उपलब्ध असल्याचे सांगत आरोपींच्या वकिलांचे म्हणणे खोडून काढले.
न्यायालयातून बाहेर नेताना शमशाद मुल्ला हिला भोवळ आली. नातेवाईकांनी तिला सावरून घेतले. पोलिसांनी गर्दीतून बाहेर नेत उपचारासाठी तत्काळ सीपीआर रुग्णालयात आणले. न्यायालय आवारात, रुग्णालयात गर्दी संशयितांना न्यायालयात आणण्यात आले असता नातेवाईक आणि मित्रपरिवाराने गर्दी केली होती. संशयितांना चार दिवसांची कोठडी देण्यात आल्याचे ऐकताच अनेकांनी काढता पाय घेतला. सीपीआर रुग्णालयात वैद्यकीय तपासणीवेळीही अनेक पंटरांची रेलचेल होती.