Wed, Jul 17, 2019 10:35होमपेज › Kolhapur › कोल्हापुरात सेनेऐवजी राष्ट्रवादीचे नगरसेवक लागले गळाला

कोल्हापुरात सेनेऐवजी राष्ट्रवादीचे नगरसेवक लागले गळाला

Published On: Feb 13 2018 2:03AM | Last Updated: Feb 13 2018 3:28PMकोल्हापूर : सचिन टिपकुर्ले

 स्थायी समिती सभापतिपदासाठी आपल्या बाजूने मतदान करावे, यासाठी भाजप आघाडीने प्रथम शिवसेनेचा नगरसेवक फोडण्यासाठी गळ टाकला होता; पण सेनेच्या नगरसेवकाऐवजी राष्ट्रवादीचे नगरसेवकच गळाला लागल्याने भाजप आघाडीने स्थायी समिती सभापतिपदावर कब्जा केला. महापालिकेत काँग्रेस-राष्ट्रवादीची सत्ता असली, तरी भाजप आघाडीने गेल्या दोन वर्षांपासून  वेगवेगळी पदे मिळवण्यासाठी छुप्या हालचाली सुरू केल्या होत्या. गेल्या स्थायी समिती सभापतिपदाच्या निवडीत फोडाफोडीचे राजकारण करण्याचा भाजप आघाडीने प्रयत्न केला होता; पण यश आले नव्हते. केंद्र व राज्यात शिवसेनेला सोबत घेऊन सरकार कार्यरत आहे. जिल्हा परिषदेत शिवसेनच्या पाठिंब्याने भाजपने सत्ता मिळवली; पण  कोल्हापूर महापालिकेत शिवसेनेने भाजपला सोडून काँग्रेस-राष्ट्रवादीला दिलेली साथ ही पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या मनाला लागली आहे.

गेल्या वेळी स्थायी समिती सभापती निवडणुकीतच राष्ट्रवादीचे नगरसेवक फोडण्याच्या हालचाली सुरू होत्या. जोरदार फिल्डिंग लावण्यात आली होती; पण याची कुणकुण राष्ट्रवादीच्या नेत्यांना लागली. त्यामुळे भाजपचा डाव फसला. भाजपने आपला राज्यातील सहकारी पक्ष असणार्‍या शिवसेनेचा पाठिंबा मिळवण्याच्या हालचाली सुरू केल्या. स्थायी समितीमध्ये 16 जागांपैकी  काँग्रेसचे 5, राष्ट्रवादीचे 3, ताराराणी आघाडीचे 4 व भाजपचे 3 सदस्य आहेत. शिवसेनेचा एक सदस्य आहे. बहुमतासाठी 9 मतांची गरज असल्याने शिवसेनेने जरी भाजपच्या उमेदवाराला पाठिंबा दिला, तर चिठ्ठ्या टाकून सभापती निवड होणार होती. त्यामुळे हा धोका भाजपला नको होता. त्यामुळे सेनेचा एक सदस्य मिळण्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचा एक नगरसेवक फोडण्याचा निर्णय घेण्यात आला. यासाठी नाराज सदस्यांची चाचपणी सुरू झाली.  

भाजपकडून शिवसेना सदस्याला विचारणा झाली; पण पक्षीय पातळीवरचा हा निर्णय आहे. पक्ष सांगेल तो आदेश पाळू, असे त्याने स्पष्ट केले. त्यामुळे भाजप- ताराराणी आघाडीकडून राष्ट्रवादीच्या  नाराज नगरसेवकांना आपल्याकडे वळवण्याचा प्रयत्न सुरू झाला. अजिंक्य चव्हाण सुरुवातीपासून स्थायी समिती सभापतिपदासाठी इच्छुक होते. चव्हाण यांना पुढच्या टर्मला हे पद देण्याचे नेत्यांनी लेखी आश्‍वासन दिले; पण ते मान्य नसल्याने त्यांची नाराजी वाढत गेली.

नेमक्या याच संधीचा फायदा घेऊन भाजपने चव्हाण यांचे मत मिळवण्यात यश मिळवले.  एक सदस्य मिळाला तरी बहुमत मिळत नव्हते. भाजपकडून पुन्हा शिवसेनेला विचारणा झाली; पण अखेरच्या क्षणापर्यंत पक्षाकडून निर्णय न  आल्याने भाजपने पुन्हा राष्ट्रवादीतील सदस्यांवर जाळे टाकले. पक्षातील अंतर्गत खदखदीमुळे अफजल पिरजादेही नाराज होते. त्यामुळे  त्यांच्याशी संपर्क साधून त्यांनाही आपल्याकडे वळवण्यात भाजपने यश मिळवले. त्यामुळे शिवसेनेच्या सदस्यासाठी टाकलेल्या गळाला राष्ट्रवादी पक्षाचे नाराज नगरसेवक लागल्याने  भाजप ताराराणी आघाडीला  स्थायी समिती सभापतिपद मिळाले.