होमपेज › Kolhapur › बेरोजगार तरुणांची कोटीची फसवणूक; टोळीला अटक

बेरोजगार तरुणांची कोटीची फसवणूक; टोळीला अटक

Published On: Aug 17 2018 1:35AM | Last Updated: Aug 17 2018 1:35AMशिरोली एमआयडीसी : वार्ताहर

शासकीय वैद्यकीय खात्यात नोकरी लावतो, या आमिषाने बेरोजगार तरुणांची फसवणूक करणार्‍या टोळीला शिरोली एमआयडीसी पोलिसांनी अटक केली. त्यांच्याकडून दहा लाख रुपये रोकड व एक स्विफ्ट मोटार ताब्यात घेण्यात आली आहे. फसवणुकीचा आकडा सुमारे एक कोटीच्या घरात असून, फसवणूक झालेल्या तरुणांची संख्या ही चाळीसहून अधिक आहे, असे पोलिस उपअधीक्षक सूरज गुरव व सहायक पोलिस निरीक्षक परशुराम कांबळे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

विजय विलास चव्हाण (वय 42, रा. बहिरेवाडी, ता. पन्हाळा), हेमंत हणमंत पाटील, (27, रा. येडेमच्छिंद्र, ता. वाळवा), अधिक मारुती पाटील, (32), बजरंग रघुनाथ सुतार, (49, दोघे रा. ऐतवडे खुर्द, ता. वाळवा) भास्कर शाहू वडगावे, (45, रा. चिंचवाड, ता. करवीर), दिलीप हणमंत कांबळे, (45, रा. पाल, ता. भुदरगड) अशी अटक केलेल्यांची नावे असून मुख्य सूत्रधार सचिन हंबीरराव पाटील (वय 34, रा. वाटेगाव, ता. वाळवा) हा फरारी आहे.

हेमंत हणमंत पाटील व सचिन हंबीरराव पाटील यांनी फिर्यादी संभाजी बापू निकम (वय 42, रा. निकम गल्ली, संभापूर, ता. हातकणंगले) यांना विश्‍वासात घेऊन तुमच्या लोकांना आरोग्य खात्यात नोकरीला लावतो, असे सांगून प्रत्येकी चार लाख रुपये द्यावे लागतील, असे सांगितले. त्यापैकी दोन लाख अगोदर व दोन लाख ऑर्डर मिळाल्यानंतर द्या, असे सांगितले. फिर्यादी निकम यांना लोणावळा येथे नेऊन सचिन पाटील हा गोयल नावाचा शासकीय अधिकारी असल्याचे भासवून तो लोकांना शासकीय नोकरी लावत असल्याची ऑर्डर दाखवण्यात आली. या आमिषाला भुलून फिर्यादी व त्यांचे मित्र सुशांत पाटील (रा. मौजे तासगाव), तुषार पिष्टे (रा. केर्ले), अमन जमादार (रा. मिणचे), सुशांत दबडे, संदीप दबडे, विशाल दबडे (सर्व  रा. सावरवाडी, ता. करवीर) या सर्वांकडून प्रत्येकी दोन लाख असे एकूण चौदा लाख रुपये गोळा करून दिले. ही रक्कम घेऊनही नोकरी न देता उलट नोकरभरती काही कारणांमुळे थांबली आहे, असे सांगून फसवणूक करण्यात आली. काही तरुणांना बनावट ऑर्डर देऊन फसवण्यात आले. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे  तावडे हॉटेल परिसरात मध्यरात्री कारवाई करून या टोळीला अटक करण्या आली.