Thu, Jun 20, 2019 06:36होमपेज › Kolhapur › थेंबे थेंबे तळे साचे!

थेंबे थेंबे तळे साचे!

Published On: Feb 16 2018 1:52AM | Last Updated: Feb 15 2018 11:55PMकोल्हापूर : नसिम सनदी 

घरगुती व औद्योगिक ग्राहकांनी पाणीमीटर आपलेसे केले आहे, तर शेतकर्‍यांनीही बर्‍यापैकी ठिबकचा अवलंब सुरू केला आहे. शिवाय, पाटाचे जरी असले तरी जपूनच पाणी पाजण्यास सुरुवात केली आहे. पाणी वाचवण्याच्या या प्रयत्नाचा जिल्ह्यात सकारात्मक परिणाम दिसत असून पाणी वापरात लक्षणीय घट झाल्याचे दिसत आहे. गतवर्षीपेक्षा यावर्षी आतापर्यंत 1441 दशलक्ष घनफूट इतकी पाण्याची बचत झाली आहे. 

मागणीअभावी धरणांतून पाणी सोडणेही कमी झाल्याने गतवर्षीच्या तुलनेत सध्या 3.87 टीएमसी पाण्याचा अतिरिक्त साठा शिल्लक राहिला आहे. पाटबंधारे विभागाने मांडलेल्या पाण्याचा हिशेब अहवालातून हे जिल्ह्याचे सुखद चित्र समोर आले आहे. 

साधारपणे फेब्रुवारीपासून उन्हाच्या झळा जसजशा तीव्र होत जातील, तशी पाण्याचीही मागणी वाढत जाते. त्याप्रमाणेच धरणातून पाणी सोडण्याचे नियोजन पाटबंधारे विभागाकडून केले जाते. दोन-तीन वर्षांपासून जिल्ह्यात मान्सूनची अनियमितता असल्याने ऑक्टोबरपासूनच नदीतून पाण्याचा उपसा वाढत होता. धरणांतूनही पाणी सोडावे लागत होते; पण गेल्या वर्षी परतीचा पाऊस मान्सूनपेक्षाही जास्त बरसल्याने जिल्ह्यातील तलाव, धरणे तुडुंब भरून गेली आहेत. नोव्हेंबरपासून तुरळक प्रमाणात तर जानेवारीपासून नेहमीप्रमाणे पाणी सोडण्यास सुरुवात झाली. आतापर्यंत राधानगरी, दूधगंगा, तुळशी, कुंभी-कासारी या धरणांतून 4698 दशलक्ष घनफूट कालवे व बोगद्यांच्या माध्यमातून पंचगंगा, वेदगंगा, दूधगंगा या नद्यांत सोडले गेले आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये 6139 दशलक्ष घनफूट पाणी या चार धरणांतून नदीपात्रात सोडण्यात आले होते. वर्षभराची तुलना केल्यास धरणांतून 1441 दशलक्ष घनफूट पाणी कमी सोडले गेले आहे. 

आता उन्हाळा सुरू झाल्याने मार्चपासून मान्सून सुरू होईपर्यंत मागणी वाढत जाते. यात पिकांसाठी पाण्याची जास्त गरज असते. अतिपाण्याचे पीक असलेल्या उसाची पाण्याची गरज जास्त असते; पण अतिपाणी दिल्यास ऊस उत्पादनात घट येत असल्याचे तंत्र  शेतकर्‍यांनाही अवगत झाल्याने उसालाही मोजून- मापूनच पाणी दिले जात आहे. कमी असणार्‍या क्षेत्रात पाचटासह ठिबकचा वापर शेतकर्‍यांकडून प्राधान्याने केला जात आहे. अतिपाणी असणार्‍या ठिकाणी अजून पाटपद्धती असली तरी तेथेही ‘एक आड एक सरी’चा प्रयोग राबवण्याकडे शेतकर्‍यांचा कल दिसत आहे. कमी पाण्यात पिके घेण्याकडेही शेतकर्‍यांचा कल वाढत आहे.  

शेतीबरोबरच घरगुती व औद्योगिक पाण्यासाठी बर्‍यापैकी पाणीमीटर बसवल्याचा आणि पाणीपट्टीतही वाढ केल्याचा परिणाम पाण्याच्या वापरावर निर्बंध येण्यात होत आहे. जितके पाणी वापराल, तितके बिल येणार असल्याने नळांना चाव्या बसवण्यापासून ते जपून पाणी वापरण्याच्या बाबतीत नागरिक बर्‍यापैकी सजग झाल्याचे दिसत आहे.

 जूनपर्यंत पाणी आरामात पुरणार 
जिल्ह्यातील राधानगरी, तुळशी, वारणा, दूधगंगा या प्रमुख चार मोठ्या धरणांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत आजच्या घडीला 3.87 टीएमसी पाणीसाठा जादा शिल्लक आहे. गेल्यावर्षी फेब्रुवारीत या धरणांमध्ये 41.83 टीएमसी पाणीसाठा शिल्लक होता. तो आता 45.7 टीएमसी इतका आहे. एका टीएमसीमध्ये साधारणपणे दहा हजार हेक्टर क्षेत्रावरचे सिंचन होते, असे संशोधन सांगते. जिल्ह्यात उसाचे दोन लाख हेक्टर क्षेत्र वगळता उन्हाळी क्षेत्र पाच हजार हेक्टर इतकेच आहे. त्यामुळे शेतीसाठीच्या पाणीकपातीची वेळ यंदा येणार नाही. शिवाय, प्रत्येक धरणातील पिण्याच्या पाण्याचे आरक्षण गृहीत धरता, हे सध्याचे पाणी जूनपर्यंत आरामात पुरणार आहे.