Thu, Jun 20, 2019 21:33होमपेज › Kolhapur › प्रॅक्टिस ‘ब’ने दिलबहार ‘अ’ला विजयासाठी झुंजविले

प्रॅक्टिस ‘ब’ने दिलबहार ‘अ’ला विजयासाठी झुंजविले

Published On: May 09 2018 1:55AM | Last Updated: May 09 2018 12:57AMकोल्हापूर : क्रीडा प्रतिनिधी

प्रॅक्टिस क्लब ‘ब’ संघाने बलाढ्य दिलबहार तालीम मंडळावर 2-0 अशा गोलफरकाची आघाडी मिळविली. सामना संपण्यास 10 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दोन्ही गोल दिलबहारकडून फेडण्यात आले. सामना 2-2 असा बरोबरीत झाल्याने टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. यात दिलबहारने प्रॅक्टिसवर 4-2 अशी मात केली. दुसर्‍या सामन्यात फुलेवाडी फुटबॉल क्रीडा मंडळाने उत्तरेश्‍वर तालीम मंडळाचा 4-0 अशा गोलफरकाने धुव्वा उडवत पुढील फेरीत प्रवेश केला. 

पाटाकडील तालीम मंडळ व डी. वाय. पाटील ग्रुपतर्फे कै. पांडबा जाधव स्मृती ‘सतेज चषक’ फुटबॉल स्पर्धा छत्रपती शाहू स्टेडियमवर सुरू आहे. मंगळवारी पहिल्या फेरीतील शेवटचे सामने झाले. दुपारच्या सत्रात दिलबहार ‘अ’ विरुद्ध प्रॅक्टिस ‘ब’ तर सायंकाळच्या सत्रात उत्तरेश्‍वर तालीम विरुद्ध फुलेवाडी क्रीडा मंडळ असे सामने झाले. 

अंतिम क्षणी ‘दिलबहार’ चार्ज...
बलाढ्य दिलबहार ‘अ’ संघाला प्रॅक्टिस ‘ब’ च्या खेळाडूंनी काट्याची टक्कर दिली. सामन्याच्या 7 व्या मिनिटालाच प्रॅक्टिसकडून रजत जाधवने गोल नोंदवत मध्यंतरापर्यंत 1-0 अशी आघाडी मिळविली. उत्तरार्धात 71 व्या मिनिटाला त्यांच्या रोहित भोसले याने दुसरा गोल नोंदवत आघाडी 2-0 अशी भक्कम केली. सामना संपण्यास 10 मिनिटांचा अवधी शिल्लक असताना दिलबहारने दोन्ही गोलची परतफेड केली. 73 व्या मिनिटाला निखिल जाधवने पहिला गोल फेडला. पाठोपाठ जादा वेळेत म्हणजेच 83 व्या मिनिटाला झालेल्या चढाईत प्रॅक्टिसच्या गोलक्षेत्रात हँडबॉल झाल्याने पंचांनी पेनल्टी स्ट्रोक दिला. यावर निखिल जाधवने बिनचूक गोल नोंदवत सामना 2-2 असा बरोबरीत केला. 

निकालासाठी टायब्रेकरचा अवलंब करण्यात आला. दिलबहारकडून पवन माळी, सचिन पाटील, निखिल जाधव, अनिकेत तोरस्कर यांचे स्ट्रोक यशस्वी ठरले. तर करण चव्हाण-बंदरे याचा स्ट्रोक फोल ठरला. उत्तरादाखल प्रॅक्टिसच्या सुमित कदम, चेतन डोंगरे यांनी गोल केले. तर रोहित भोसले, ओमकार भुरके यांचे स्ट्रोक अयशस्वी ठरले. यामुळे सामना दिलबहारने 4-2 असा जिंकत स्पर्धेतील आपले आव्हान कायम राखले. 

फुलेवाडीचा उत्तरेश्‍वरवर  एकतर्फी विजय
दुसर्‍या सामन्यात फुलेवाडी क्रीडा मंडळाने उत्तरेश्‍वर तालीम मंडळाचा 4-0 असा एकतर्फी पराभव केला. संकेत साळोखे याने चौथ्या, 27 व्या आणि 70 व्या मिनिटाला तीन गोल्सची नोंद केली. 61 व्या मिनिटाला शुभम साळोखेने चौथा गोल केला. त्यांच्या उमेश भगत, नीलेश ढोबळे, रोहित मंडलिक, सूरज शिंगटे यांनी उत्कृष्ट खेळ केला. त्यांच्या 7 ते 8 गोल्सच्या संधी वाया गेल्या. उत्तरेश्‍वरकडून स्वप्निल पाटील, ऋषीकेश सुतार, सुयश हांडे, प्रकाश संकपाळ, मयूर कदम यांनी गोल फेडण्यासाठी केलेले जोरदार प्रयत्न फुलेवाडीच्या भक्कम बचावाने फोल ठरविले. यामुळे एकाही गोलची परतफेड त्यांना करता आली नाही. 

सामनावीर आणि लढवय्ये...
सामनावीर : संकेत साळोखे (फुलेवाडी), अनिकेत तोरस्कर (दिलबहार अ)  
लढवय्ये : सुयश हांडे (उत्तरेश्‍वर), रोहित भोसले (प्रॅक्टिस ब). 

आजचे सामने...
प्रॅक्टिस क्लब ‘अ’ विरुद्ध पाटाकडील ‘ब’, दुपारी 2 वाजता. 
पाटाकडील ‘अ’ विरुद्ध 
नवज्योत गडहिंग्लज, 
4 वाजता. 

Tags : kolhapur, Satej Cup Football, Tournament