होमपेज › Kolhapur › सराफ लूट प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न

सराफ लूट प्रकरणातील संशयितांची नावे निष्पन्न

Published On: Feb 10 2018 1:31AM | Last Updated: Feb 10 2018 12:27AMकोल्हापूर : प्रतिनिधी

गुजरी कॉर्नर परिसरात मुंबईच्या सराफाला लुटण्यास आलेल्या संशयितांनी नवी कोरी कार वापरल्याचे तपासात पुढे आले. 25 जानेवारीला खरेदी केलेली ही कार कारमालकाकडून देवदर्शनास जाण्याच्या बहाण्याने मागण्यात आली होती. या कार मालकाला चौकशीसाठी ताब्यात घेण्यात आले आहे. या प्रकरणातील संशयितांची माहिती पोलिसांना मिळाली आहे.

पोलिसांनी सराफ कांतिलाल मेहता यांच्या दुकानातील कर्मचार्‍यांसह कोल्हापुरातील 25 ते 30 जणांकडे आतापर्यंत चौकशी केली आहे. तर पथके शिर्डी, मुंबई, रायगडमध्ये तपास करीत असल्याचे वरिष्ठ पोलिस सूत्रांनी सांगितले.

मुंबईचे सराफ कांतिलाल मेहता यांना बुधवारी (दि. 7) सकाळी सहाच्या सुमारास गुजरी कॉर्नरच्या मरूधर भवनसमोर चौघांनी मारहाण करून लुटले. यामध्ये 40 लाखांचे सोन्याचे दागिने घेऊन चोरटे कारमधून पसार झाले. गुन्ह्यात वापरलेल्या कारच्या मालकाचा शोध पोलिसांनी घेतला. त्याच्याकडे केलेल्या चौकशीत  25 जानेवारी रोजी कार खरेदी केल्याचे समोर आहे. तर त्यांच्याकडे चालक म्हणून येणार्‍या तरुणानेच ही कार देवदर्शनाला जातो, असे सांगून नेल्याचे पुढे आले.

कांतिलाल मेहता यांच्या दुकानात काम करणार्‍या काही कर्मचार्‍यांसह काम सोडून गेलेल्या कर्मचार्‍यांकडेही चौकशी सुरू आहे.