होमपेज › Kolhapur › सांगली-कोल्हापूर रस्ता ‘डेंजर’

सांगली-कोल्हापूर रस्ता ‘डेंजर’

Published On: Dec 26 2017 1:32AM | Last Updated: Dec 25 2017 8:59PM

बुकमार्क करा

जयसिंगपूर : सुरेश मेटकर

जयसिंगपूर शहरातून गेलेला सांगली-कोल्हापूर महामार्ग आणखीन किती निष्पापांचे बळी घेणार, असा सवाल नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. रविवारी रात्री निष्पाप सहा वर्षीय बालिकेचा टँकरच्या धडकेत बळी गेला. त्यानंतर नागरिकांतून रोष व्यक्त केला जात होता.

चौपदरीकरण कामाचा झालेला खेळखंडोबा, उड्डाणपुलाला विरोध यामुळे सध्या शहरातील हा महामार्ग शहरवासीयांना मृत्यूचा मार्ग ठरला आहे. जीव मुठीत घेऊन नागरिकांना महामार्ग ओलांडावा लागत आहे. 

चौपदरीकरण कामाला प्रशासकीय परवानगी मिळाल्यानंतर तमदलगे खिंड ते जयसिंगपूर मार्गे अंकली पूल आणि तमदलगे खिंड ते निमशिरगाव-जैनापूर मार्गे अंकली पूल हे दोन मार्गांचे दुपदरीकरण करण्यात आले; मात्र या कामाचा दर्जा निकृष्ट ठरला आहे. भूसंपादन, सेवामार्ग, उड्डाणपूल या कामांचा खेळखंडोबा झाला आहे. शहरात वाढलेल्या प्रचंड वाहतुकीकडे ना पोलिसांचे लक्ष आहे, ना लोकप्रतिनिधींचे. याचा फटका मात्र शहरवासीयांना बसला आहे. जीव मुठीत धरूनच शहरवासीयांना महामार्ग ओलांडावा लागत आहे. 

गेल्या पाच वर्षांत या महामार्गाचे काम एरंडाचे गुर्‍हाळ ठरले असताना अचानक हा मार्ग गेल्या वर्षी राष्ट्रीय प्राधिकरणाकडे वर्ग करण्यात आला. त्यामुळे रडतकढत सुरू असलेले कामही ठप्प झाले.  अंकली ते सांगली येथील शास्त्री चौकापर्यंत एका बाजूचे डांबरीकरण, तर दुसरीकडे खड्डे अशी अवस्था  आहे.  काम ऑक्टोबर 2014 पर्यंत पूर्ण  होणार होते.   दिवसभरात शंभरवेळा तरी महामार्गावर वाहतुकीची कोंडी होते; मात्र झाडाखाली उभे राहून बघण्यापलीकडे पोलिस काहीही करत नाहीत.