Sun, Aug 18, 2019 21:30होमपेज › Kolhapur › ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी सर्व घटकांची : डॉ. योगेश जाधव (video)

ग्रामीण विद्यार्थ्यांच्या स्वप्नांना बळ देण्याची जबाबदारी सर्व घटकांची : डॉ. योगेश जाधव (video)

Published On: Aug 21 2018 3:49PM | Last Updated: Aug 21 2018 3:49PMकोल्हापूर : प्रतिनिधी

ग्रामीण भागातील शाळांमध्ये सोयी-सुविधा नसतानाही जिद्द आणि मेहनतीच्या जोरावर विद्यार्थी प्रगती करीत आहेत. शालेय विद्यार्थी देशाचे आशास्थान आहेत. त्यांच्या स्वप्नांना व पंखांना उंच भरारी घेण्यासाठी बळ देण्याची जबाबदारी प्रत्येक समाज घटकाची आहे, असे प्रतिपादन दै.‘पुढारी’चे व्यवस्थापकीय संपादक आणि उर्वरित महाराष्ट्र वैधानिक विकास मंडळाचे अध्यक्ष डॉ. योगेश जाधव यांनी केले. 

रोटरी क्‍लब ऑफ इचलकरंजी टेक्स्टाईल सिटी यांच्या वतीने केर्ले येथे आयोजित कार्यक्रमात पन्हाळा तालुक्यातील अविकसित 26 शाळांमधील सुमारे 1560 विद्यार्थांना गणवेश वाटप  कार्यक्रमात ते बोलत होते. डॉ. जाधव यांच्यासह मान्यवरांच्या हस्ते धबधबेवाडी शाळेतील दहा विद्यार्थांना प्रातिनिधिक स्वरूपात गणवेश वाटप करण्यात आले. 

डॉ. जाधव म्हणाले,  शाळेत खूप काही शिकायला मिळते, त्याबरोबरच शाळेबाहेरील शाळाही महत्त्वाची आहे. वृत्तपत्रे, नियतकालिके ही ज्ञानाची भांडारे आहेत. त्याचे वाचन जगातील नव्या प्रवाहांची ओळख करून देण्यासाठी पूरक ठरत असल्याने विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद आयुष्यभर जोपासायला हवा. चित्रकला, संगीत, नृत्य, कला, क्रीडा यासारखे अनेक छंदही जोपासले पाहिजेत. ग्रामीण भागातील शाळांसमोर अनेक अडचणी आहेत.  याबाबत तत्कालीन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार यांच्यासमवेत बैठक घेऊन अडचणी जाणून घेतल्या. त्यांना छत्रपती शाहू महाराज अभियान गतीने राबविण्याची सूचना केली आहे. ग्रामीण भागातील शाळांच्या विषयात प्राधान्याने लक्ष घालून शासनास निधी द्यायला लावू.

देशातील 65 टक्के लोकसंख्या ग्रामीण भागात राहणारी असून विशेषत: त्यांच्या शिक्षणाकडे लक्ष देण्याची गरज आहे. नवी पिढी डिजिटल युगातील आहे. शिक्षणात आमूलाग्र बदल होत असून, कोणालाही हव्या त्या ठिकाणाहून शिक्षण घेता येणार आहे. त्यामुळे शिक्षण ही पैसेवाल्यांची मक्‍तेदारी राहणार नाही. स्पर्धेच्या काळात शिक्षकांना भूमिका बदलून अपडेट राहावे लागेल. आगामी काळात बरोजगारीचा मोठा प्रश्‍न उद्भवणार आहे. 8 वी, 9 वीच्या विद्यार्थ्यांना कौशल्य विकासाचे शिक्षण द्यावे लागेल. त्याअनुषंगाने पालक, शिक्षकांनी कार्यरत राहावे, असेही डॉ. जाधव म्हणाले.

जि.प. शिक्षण समिती सभापती अंबरिश घाटगे म्हणाले, जि.प. शाळा डिजिटल झाल्या आहेत.  निधीची कमतरता असली, तरी विद्यार्थ्यांना सोयी सुविधा पुरविल्या जात आहेत. बाबासाहेब पाटील-आसुर्लेकर म्हणाले, डोंगर कपार्‍यातील मुलांचे पालक हमाली, तोलाईचे काम करतात. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी विविध क्षेत्रांत ठसा उमटविला असून, अनेक विद्यार्थी प्रशासकीय सेवेत आहे.  रोटरीचे डिस्ट्रिक्ट गव्हर्नर संग्राम पाटील म्हणाले, देश घडविण्यासाठी तरुण पिढीकडे लक्ष दिले पाहिजे. त्याअनुषंगाने रोटरी क्‍लब उपक्रम राबवीत आहे.  जि.प. शिक्षण समिती सदस्य प्रियांका पाटील म्हणाल्या,  अपुर्‍या निधीमुळे विद्यार्थ्यांना सुविधा मिळत नाहीत. पालक, शिक्षक व सर्व घटकांच्या प्रयत्नातून या शाळांचा सर्वंकष विकास होईल. 

शिक्षक संजय काळे, भिवाजी काटकर यांनी मनोगत व्यक्‍त केले.  प्रास्ताविक धनेश बोरा यांनी केले. सूत्रसंचालन वैभव जाधव यांनी केले. रोटरीचे सचिव संदीप पाटणी यांनी आभार मानले. यावेळी रोटरीचे अध्यक्ष पन्‍नालाल डाळ्या, असिस्टंट गव्हर्नर शशिकांत खोत, प्रोजेक्ट चेअरमन मदनमोहन राठी यांच्यासह शिक्षक, विद्यार्थी, रोटरी क्‍लबचे पदाधिकारी उपस्थित होते.