Thu, Apr 25, 2019 13:27होमपेज › Kolhapur › विभागीय कार्यालय सक्षम होणार कधी?

विभागीय कार्यालय सक्षम होणार कधी?

Published On: Aug 31 2018 1:39AM | Last Updated: Aug 31 2018 12:05AMकोल्हापूर : विकास कांबळे

शहरातील नागरिकांच्या किरकोळ तक्रारींची तसेच प्रभागातील कामांची निर्गत स्थानिक पातळीवर व्हावी, या उद्देशाने सुरू करण्यात आलेली विभागीय कार्यालयातील अधिकारी कोणतेही काम घेऊन गेले की मुख्य इमारतींमधील अधिकार्‍यांकडे बोट दाखवत असल्याने ही कार्यालये सक्षम कधी बनणार, असा सवाल उपस्थित करण्यात येत आहे.

विभागीय कार्यालयांना अवश्यक असणारी आणि किरकोळ कामांसाठी लागणारे साहित्य उपलब्ध करून देत ही कार्यालये सक्षम बनवावीत, अशी मागणी करण्यात येत आहे.
शहराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे. त्यामुळे किरकोळ कामासाठी उपनगरातील नागरिकांना महापालिकेत यावे लागू नये म्हणून विभागीय कार्यालये स्थापन करण्यात आली. ताराराणी मार्केट, राजारामपुरी, शिवाजी मार्केट आणि गांधी मैदान अशी चार कार्यालये सुरू करण्यात आली. प्रत्येक विभागीय कार्यालयाकडे पंधरा ते वीस प्रभाग देण्यात आले. या कार्यालयांना स्वतंत्र अधिकारी व कर्मचारी वर्ग देण्यात आला. या विभागीय कार्यालयांमध्ये प्रभाग समिती देखील स्थापन करण्यात आल्या. येथील सभापतींना केबिन देण्यात आल्या. त्यामुळे ही कार्यालये सक्षम होतील, असे वाटत होते. मात्र, तसे झाले नाही. 

प्रभाग समितीच्या बैठका देखील गांभीर्याने होत नसल्याचे बोलले जाते. काही कामांसाठी नागरिक विभागीय कार्यालयातील अधिकार्‍यांकडे गेले की, येथील अधिकारी पहिले हे काम झटकण्याचा प्रयत्न करताना दिसतात. साधी गटर व ड्रेनेज तुंबल्याची तक्रारी घेऊन गेले तरी अधिकारी मशिन नसल्याचे सांगत मुख्य इमारतीतील अधिकार्‍यांकडे बोट दाखवतात. त्यामुळे नागरिकांना महापालिकेत जावे लागते. विभागीय कार्यालये सक्षम करण्यासाठी सहायक आयुक्‍त दर्जाचे अधिकार्‍यांकडे त्यांचा कार्यभार देण्यात आला. मात्र, ते देखील विभागीय कार्यालयाकडे अपवादानेच हजेरी लावत असल्याचे चित्र आहे.
ड्रेनेज तुंबले की ते साफ करण्यासाठी जेट मिशनचा वापर केला जातो. गेल्या वर्षापर्यंत संपूर्ण शहरासाठी हे एकच मशिन होते. आता त्यात वाढ करण्यात आली आहे. सध्या महापालिकेकडे चार मशिन आहेत. त्यापैकी एखादे नेहमीच नादुरुस्त असते. त्यामुळे ड्रेनेजचे काम सांगितल्यास विभागीय कार्यालयातील अधिकारी मशिनचे कारण सांगतात. तशीच अवस्था जीसीबीची आहे. महापालिकेकडे आठ जीसीबी असल्याचे सांगितले जाते. मात्र, एखाद्या कामासाठी  जेसीबी लागणार असल्याचे विभागीय कार्यालयाला सांगितल्यास हे अधिकारी थेट आमच्याकडे जेसीबी नाही, असे सांगून हात वर करतात. डंपर असेल, रोडरोलर असेल त्याबाबतही असाच प्रकार घडतो. त्यामुळे ड्रेनेज साफ करण्याचे मशिन, जेसीबी, डंपर व रोडरोलर अशी मशिनरी प्रत्येक विभागीय कार्यालयाला उपलब्ध करून द्यावी. ही सर्व सकाळपासून सायंकाळपर्यंत विभागीय कार्यालयाच्या ताब्यातच द्यावी. त्यामुळे किरकोळ तक्रारी या स्थानिक पातळीवरच सुटण्यास मदत  होईल.

जेसीबीसाठी मुख्यालयात धाव
विभागीय कार्यालयांना आवश्यक ती साधनसामुग्री उपलब्ध करून दिली जात नसल्याचे बोलले जाते. त्यामुळे येथील अधिकार्‍यांचाही दोष नाही. एखाद्या कामासाठी जेसीबीची आवश्यकता असली तरी त्याकरिता मुख्यालयातील अधिकार्‍यांकडे जावे लागते. विभागीय कार्यालये सक्षम करण्यासाठी त्यांना साधनसामुग्री देखील कायमस्वरूपी उपलब्ध करून देणे आवश्यक आहे.