Fri, Sep 21, 2018 13:16होमपेज › Kolhapur › रंकाळा प्रदूषणमुक्त ठेवण्याची महापालिकेचीच इच्छा नाही!

रंकाळा प्रदूषणमुक्त ठेवण्याची महापालिकेचीच इच्छा नाही!

Published On: Jul 04 2018 2:14AM | Last Updated: Jul 04 2018 12:38AMकोल्हापूर : प्रतिनिधी

रंकाळा तलाव स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्याची महापालिकेची प्रामाणिक इच्छा नाही, असे ताशेरे राष्ट्रीय हरित लवादाच्या पुणे खंडपीठाने मंगळवारी महापालिका प्रशासनावर ओढले. पुढील सुनावणी 16 जुलैला ठेवण्यात आली आहे. 

महापालिकेच्या वतीने सांगण्यात आले की, रंकाळा तलावाचे प्रदूषण होऊ नये यासाठी महापालिकेच्या वतीने अटोकाट प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून दुधाळी नाल्यावर 17 एम.एल.डी. क्षमतेचे सांडपाणी प्रक्रिया केंद्र बांधण्यात आले आहे. खंडपीठाच्या सूचनेनुसारच ते पूर्ण करण्यात आले आहे. परंतु, खंडपीठाने ते सर्व कागदोपत्री द्यावे, असे सांगितले. तसेच रंकाळा स्वच्छ व प्रदूषणमुक्त ठेवण्यासाठी आजपर्यंत काय उपाययोजना केल्या? यापुढे कोणत्या उपाययोजना करणार आहात? सध्या चालू असलेली कामे कधी पूर्ण करणार? यासह एकूणच अमृत योजनेतील कामासंदर्भात संपूर्ण तपशील असलेले अ‍ॅफिडेव्हिट दोन दिवसात सादर करण्याचे आदेशही खंडपीठाने महापालिका प्रशासनाला दिले. तसेच अ‍ॅफिडेव्हिट सादर न केल्यास जबर दंड ठोठावला जाईल, असा इशारा देत आम्ही आदेश दिल्यानंतर तुम्ही कामे करायची हे अशोभनीय आहे, असेही खंडपीठाने सुनावले. रंकाळाप्रकरणी सामाजिक कार्यकर्ते सुनील केंबळे यांनी राष्ट्रीय हरित लवादाकडे याचिका दाखल केली आहे. त्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे.